Saturday, November 27, 2010

कसाब भाईना खत

श्रद्धांजली...
दोन वर्षांपूर्वी देशावर झालेल्या हल्ल्यात जीव गमावणा-या निरपराधांना आदरपूर्वक श्रद्धांजली... पुढील लेख (पत्र) हे कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने लिहिले गेले नसून, दुखावलेल्या भावना व्यक्त करण्याच्या हेतूने कागदावर उतरले आहे. देशाची अब्रू चव्हाट्यावर आणणा-या भ्रष्ट राजकारण्यांना शाब्दिक चपराक देण्याचा हा एक निष्फळ प्रयत्न आहे. त्या अब्रूची निंदा हल्लेखोर कशावरून करत नसतील???


----------------------------------------------------------------------------------------------------

                                                                      कसाब भाईना खत
वालेकुम अस्सलाम कसाब भाई,                                                                                नोव्हेंबर २६, २०१०

तुमची सगळी खैरीयत रहावी, यासाठी अल्लाकडे नमाज अदा केली आणि हे खत लिहायला बसलो. तशी तुमच्या खैरीयतीसाठी अल्लामियांसकट कोणीही फिकर करण्याची जरूरत नाही, याची आम्हाला जानकारी आहेच. एवढंच काय, आम्हाला तुमचा हेवाही वाटतो. आपण घडवून आणलेल्या हल्ल्याला आज दोन सालं पूर्ण झाली. गिरफ्तार होऊनही आपण आज सहीसलामत जिंदा तर आहातच; पण काफरांनी चालवलेली तुमची खातरदारी पाहून होणारी खुषी आम्ही शब्दांत नाही मांडू शकत.

तुम्ही अल्लाला अदा केलेला जिहाद त्याने मंजूर केल्याचीच ही निशाणी आहे. आजही आम्हाला तुमचं बचपन चांगलंच याद आहे. ज्या वयात हिंदुस्थानातील पोरं भविष्याची चिंता करत पढाईत वक्त जाया करतात, ज्या वयात अमेरिकेतली गोरी औलादं लौन्ढीयांच्या पाठीमागे शेपट्या घालतात, त्याच वयात तुम्ही नेक इराद्यांनी बंदुकी हाताळत होतात. त्या पर्वर्दीगाराची लाजवाब करामतच आहात तुम्ही. तुमच्यातली ही होशियारी आम्ही खूप आधीच हेरून ठेवली होती.

सचमे, समिन्दराच्या वाटेनं दोन महिने प्रवास करून त्या नापाक धर्तीपर्यंत जाणं, किती जिकिरीचं राहिलं असेल, याची आम्ही कल्पना करू शकतो. पण अल्लाच्या बंद्याला डर कसचं? मुंबैच्या त्या रेल्वे स्टेशनवरची सी.सी.टीव्ही.वर दिसलेली तुमची आत्मविश्वासभरी चाल सगळं काही बोलून गेली. बेछूट गोळीबार करत सुरु असलेली तुमची दौड पाकच्या भूमीवरची तुमची मोहोब्बतच दाखवून देत होती. गिरफ्तार होण्यापेक्षा मोक्षाचा मार्ग स्वीकारणं, तुम्ही पसंत केलं असतं, याची आम्हाला जाणीव आहेच. काफिरांच्या कत्तलीनेच आपल्याला जन्नत प्राप्त होते, हे सर्वात मोठं सच आहे. पण त्या जन्नतीपेक्षाही जादा अमिरी तुम्ही अनुभवता आहात. दर महिन्याला दोन करोड रुपये हिंदूस्थानी हुकुमत तुमच्या सुरक्षिततेसाठी खर्च करते, असं आम्ही ऐकून आहोत. कोण्या हवालदाराला परवा तुम्ही लगावलेली थप्पडही ऐकली आम्ही. तुमच्या या काबिलीयतीला आमचा बारबार सलाम!

खुलेआम सडकांवरून जरी तुम्ही तुमची दहशत गाजवू शकत नसलात, तरी कोर्टातला तुमचा गुरुर, तिथल्या हुकुमतीशी वागण्यातला तुमचा जुनून इन्शाल्ला आपल्या येणा-या नसलांसाठी आदर्श ठरत आहे. त्या पाटील आणि खडसेला दिलेलं तुमचं जवाब बेशक काबिले-तारीफ होतं. दोन सालं गुजरली, तरी तुम्हाला तुमच्या करतूतीचा पछतावा नाही, याची जाणीव तरी हिंदूस्थानला झाली! मागेच खरंतर त्या रामूनी तुमच्या जिंदगीवर फिल्म काढली असती; पण थोडक्यात माशी शिंकली. तसा, इतिहास गवाह आहे... काफरांची याददाज कमजोरच आहे जराशी! थोडेच दिवसात ते सगळं भूलून जातील. चाचा अफझल गुरूना सध्या कोणी गाली तरी देतं का? तसेच लोक तुम्हालाही भूलतील. कदाचित हुकुमतीने नेमलेले वकील, उज्ज्वल निकम, केस तुमच्या खातीर जिंकतीलही!

आम्ही इथे त्या वक्ताचा इंतजार करत आहोत. तुमच्या कदमांवर कदम ठेवू पाहणारे काफी नौजवान इथे बंदुका चालवायला शिकत आहेत. तुम्ही स्वत: त्यांना मार्गदर्शन करू शकाल, अशी अल्लाकडे प्रार्थना करतो. बाकी, मुंबईत याही वेळी आवामने दिये लावले; फुलं चढवली; आणि अशाच काही हरकती केल्या. काहींनी आसू ढाळले... तर काहींचे तेही सुकले होते. लेकीन, या सगळ्याचा आपल्या इराद्यांवर कोणताही असर होण्याचा सवालच येत नाही. जिहाद हाच मोक्षाचा मार्ग आहे. आणि तोच आपल्याला जन्नतीपर्यंत पोहोचवेल.

तुमच्या या कर्तबगिरीची मिसाल म्हणून आज संध्याकाळी इकठ्ठा नमाज ठेवली आहे. तीही अल्ला मंजूर करेल, अशी अशा करतो.

इंतकामची आग अशीच भडकत राहू द्यात. अगल्या साली, तुम्हीही या नमाजीत सामील व्हाल, हीच ख्वाईश...

खुदा हाफिज,
अब्दुल रहमान काझी
('अब्दुल रहमान काझी' हे नाव पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध लावला जाऊ नये. तसा तो प्रवृत्तीशी लावला जाऊ शकतो.)
(Credits: www.sbs.com for the only image in the post.)

Monday, November 1, 2010

पुन्हा एकदा!!!

ऑक्टोबर महिन्याची अखेर...
बुधवारचा दिवस... आणि मध्यान्हीचा सुमार...
रेंगाळलेल्या पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवळ होती खरी; पण उन्हाची तीव्रता त्या मखमलीलाही धुमसत होती. गारव्याऐवजी रखरखाटच अधिक होता. इतक्यात पश्चिमेकडनं घोंघावणारी एक वा-याची झुळूक आली. अशा रुक्ष वातावरणाला वा-याची ती झुळूक सुखावणारी असली; तरी तिचं ते घोंघावणं जरा उद्विग्नता वाढवणारं होतं.

पद्मावतीभोवती दोन प्रदक्षिणा घालूनही ही झुळूक काही शमत नव्हती. मधेच हुक्की आल्यावर ती सुवेळेच्या अंगाला लगट करत थोडी दूर जायची... आणि पुन्हा आल्या वाटेने परत फिरून बालेकिल्ल्याला फेर धरायची. तिचं असं बागडणं जरी अगदीच नवीन नसलं, तरी ते घोंघावणं जरा त्रासदायक वाटत होतं. वैतागून एक-दोनदा राजगडाने आळोखे-पिळोखे देत तिला फटकारून पाहिलं; पण त्या फटका-याने ती शेजारीच पसरलेल्या तोरण्याच्या बुधल्याला पिंगा घालून पुन्हा 'डोक्यात'(!) शिरायची.


ही काही आपल्याला स्वस्थ पडू देणार नाही, हे लक्षात आल्यावर राजगड तिच्यावर गुरकावलाच. पुरंदरापल्ल्याड माळरानावर जाऊन गोंधळ घालण्याची सूचना करूनही ती ऐकतच नाही म्हटल्यावर मात्र तो हात-पाय ताणून ताठ झाला. वा-याची गचांडी धरून दूर पूर्वेकडे भिरकावून देण्याचे क्रूर विचार त्याच्या मनात आले खरे; पण परगण्यात राजगडाचा दरारा होता. त्यामुळे सूचना किंवा फारफारतर धमकीवर त्याचं काम चालून जाई. हातघाईवर येण्याची वेळ उभ्या आयुष्यात राजगडावर कधी आलीच नाही!

डोक्याखाली हाताची उलटी घडी करून पडलेला तोरणाही वा-याची ही मस्ती बराच वेळ पाहत होता. राहून राहून त्यालाही या गोष्टीचं कुतूहल वाटतच होतं, की या राकट राजगडासमोर क्षुद्र वा-याची कसली ही मिजास! भल्या-भल्यांना चळाचळा कापायला लावणारा हा राजगड... त्यानं मनात आणलं, तर या वा-याला आजूबाजूला हुंदडणंही मुश्कील होईल. राजांचा लाडका म्हटल्यावर कोण त्याला डिवचण्याची हिंमत दाखवणार!!!

इतक्यात तो वारा संजीवनी माचीच्या वरच्या अंगानं सरळ बालेकिल्ल्य्यात शिरला आणि आतल्या आत विरूनही गेला. नाहीसं होण्यापूर्वी तो राजगडाच्या कानात काहीतरी कुजबुजला असावा; कारण त्यानंतर तो करारी गिरीदुर्ग असा काही आंतरमुख झाला, की काही क्षण झाडांनी सळसळाट थांबवला; पक्ष्यांनी किलबिलाट बंद केला; आसपासचे दोन-तीन ढग सूर्यासमोर येऊन विसावले; सावजाला शोधणा-या तिथल्या एका ससाण्यानेही परिस्थिती लक्षात घेऊन दक्षिणेकडे मोर्चा वळवला.

एवढ्यात, भानावर येत राजगडाने तोरण्याला साद घातली... 'आपला रायगड पुन्हा एकदा ढासळलाय रे! सतत रडतोय म्हणे!' आता मात्र तोरण्यालाही कळून चुकलं. घोंघावणा-या वा-याच्या मनातलं गूज त्या ताठ, स्वाभिमानी, निश्चल, निर्विकार आणि शक्तिशाली रायगडाची व्यथा सांगून गेलं होतं. खरं पाहता, या उत्तुंग जोडगोळीसाठी हे ही धक्कादायक नव्हतं. रायगड सध्या वरचेवर अश्रू ढाळतो, याची माहिती आणि त्यामागची कारणं त्यांना वारंवार मिळत असत.

आधल्याच दिवशी कुणी उत्साही सहयमित्र रायगडावर मुक्कामासाठी गेला होता म्हणे. सवयीप्रमाणे सूर्योदयाला दरबारात हजर राहून त्याने महाराजांना लवून मुजरा केला. पुढे बराच वेळ तो महाराजांच्या त्या मूर्तीकडे एकटक पाहत होता; कसलंतरी गा-हाणं मांडत होता; विनवण्या करत होता... "महाराज, तुम्ही परत या. परत या, महाराज. या ख-या अर्थाने 'दगडांच्या' देशाला पुन्हा एकदा तुमची गरज आहे. दासबोधातली वचनं विसरलेल्या या संतभूमीला एका कणखर नेतृत्वाची ओढ लागली आहे. पैशापायी या पुण्यभूमीचं इमान विकायला निघालेल्या नतद्रष्ट नेत्यांना वेसण घालायला परत या, महाराज. अहो, संरक्षणदलाच्या अखात्यारीतून सहकारी गृहसंस्थेतील घरं आपल्याच नातेवाईकांना भेट म्हणून देणारा भ्रष्टाचारी दुसरा-तिसरा कुणी नसून तुमच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे......". त्याला पुढं बोलवेना. तसा... त्याच्या शब्दांचा महाराजांवर कसलाही परिणाम होतंच नव्हता. कारण त्या मूर्तीमध्ये महाराज होतेच कुठे? समोर होती ती फक्त प्राणहीन मूर्ती! पण हे शब्द खुद्द रायगडाचं काळीज फाडत खोलवर रुतत गेले. त्याला राहवेना आणि त्याने अक्षरश: हंबरडा फोडला...

सहाजिक आहे हो! गेल्या काही वर्षात 'आप्त-स्वकीय' म्हणवून घेणा-या किंवा 'शिवप्रेमी' म्हणवणा-या स्वजनांनीच अशी काही वर्तणूक केली होती, की तीन शतकांहूनही अधिक काळ ताठ मानेनं उभ्या असलेल्या त्या किल्लेशानंही अखेर धीर सोडला होता. इतिहासात, महाराजांच्या पश्चात फितुरीनं झालेल्या हल्ल्याला त्या स्वाभिमानी रायगडानं असा काही प्रतिकार केला होता, की पराभवानंतरही बारा दिवस जळत होता तो; स्वराज्य तेवत होता तो! पण आज होत असलेली जनतेची ससेहोरपळ त्याला हिणवते आहे; राज्यकर्त्यांनी चालवलेला अतोनात भ्रष्टाचार त्याला रक्तबंबाळ करतो आहे; एकेकाळी सबंध चराचरसृष्टीची निष्ठा अनुभवणा-या त्याला वर्तमानातला नाकर्तेपणा आणि बेइमान दु:खी करतो आहे.

आणि या सगळ्यावर ताण म्हणून की काय, पण शिवराय सध्या रायगडावर वावरातच नाहीत! वावरतो, तो त्यांच्या मनातला सल... स्वराज्याची गाणी त्या दरबारात घुमतच नाहीत! घुमतात, ती फक्त दयनीय जनतेची गा-हाणी... सूर्याची सोनेरी किरणं त्या अजिंक्य सिंहासनावर नतमस्तक होतंच नाहीत! पाया पडतात, ती काही दुर्बल टाळकी...

आणि हे सगळं असंच्या असं माहीत असूनही, तिकडे तोरण्याने आपली बेलागता त्यागलेली नाही किंवा राजगडाने आपली अभेद्यता सोडलेली नाही. त्यांची निष्ठा कायम आहे! वेळ काढून गिर्यारोहणाला येणा-या असंख्य सहयप्रेमीना ते शिवचरित्र ऐकवतात; भूतकाळातले ते रोमांचकारी क्षण रंगवून रंगवून सांगतात; स्वराज्याची गळ घालतात; जिद्द-चिकाटीची शिकवण देतात.... त्यांना अजूनही आशा वाटते... रायगडाला पुन्हा एकदा जाग येईल... रायगडाला... पुन्हा एकदा जाग येईल...

Wednesday, October 20, 2010

टकलावर (न) रुळणारी शेंडी...

भारतीय शिक्षणव्यवस्था ही जगातल्या आर्थिक महासत्तांपेक्षा किंचित सक्षम मानली जाते. खरंतर, ही सक्षमता ब-यापैकी परीक्षापद्धती आणि अभ्यासक्रमावर अवलंबून असते. अव्वाच्या सव्वा अभ्यासक्रम आणि पाठांतराभिमुख परीक्षापद्धती ही भारतीय शिक्षणव्यवस्थेची दोन मूलभूत अंग आहेत. काहीही असो... या शिक्षणव्यवस्थेतून (देशा) बाहेर पडणारे विद्यार्थी तद्देशीय विद्यार्थ्यांपेक्षा वरचढ ठरतात खरे!

तर अशा या व्यवस्थेला कायम सक्षम ठेवण्यासाठी दर ठराविक वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात येतो. ही नक्कीच एक प्रभावी उपाययोजना आहे. हे बदल सामान्यात: जागतिकीकरणावर अवलंबून असतात. पण विचार करा, जागतिकीकरणाचा 'इतिहासा'सारख्या विषयावर कोणता परिणाम होत असेल! जे घडून गेलं, तो इतिहास...

पण नुकताच शालेय अभ्यासक्रमातला 'इतिहास बदलला' गेला... अगदी शब्दश:! छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांना इतिहासातून 'वगळण्यात' आलं. ज्या समर्थ रामदासांनी महाराजांना 'जाणता राजा' म्हणून उल्लेखलं, त्या समर्थांनी महाराजांना शिकवण दिल्याचं आपल्या वर्तमान 'इतिहासा'नं नाकारलं.

वस्तुत: 'इतिहासा'त बदल घडवले जातातही; पण ते पुराव्यांच्या आधारे! पूरक पुरावे उपलब्ध होईपर्यंत आपण हा इतिहास नाकारणं सयुक्तिक होणार नाही. उलट, आपल्याकडे इतिहासातले हे बदल जातींच्या आधारावर घडवले जाऊ लागले आहेत. दादोजी आणि समर्थ हे जातीने ब्राह्मण असल्यामुळे त्यांचा 'मराठा-सम्राट' शिवाजी महाराजांशी संबंध तोडण्यात आला. अरबी समुद्रामध्ये उभारल्या जात असलेल्या महाराजांच्या भव्य पुतळ्यापासून त्यांच्या या दैवतांची चित्रे दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

वस्तुत: ही उदाहरणे ब्राह्मण समाजाबद्दल असलेल्या तिरस्काराचं प्रतिनिधित्व करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या तिरस्काराचं मूळही इतिहासातच आहे. ब्राह्मणांनी वर्षानुवर्षे आपल्या बुद्धिमत्तेचा अवास्तव बडेजाव करत अन्य जातीतील लोकांना हीनदर्जाची वागणूक दिली. त्याचा वचपा आज काढला जातोय!

बरं! हा वचपा काढणारेही आजच्याच पिढीतले आहेत; आणि सहन करणारेही आजच्याच पिढीतले! म्हणजे, आजचा ब्राह्मण खालच्या जातीतील त्याच्या मित्राला घरात प्रवेश नाकारतही नाही; किंवा तो मित्रही ब्राह्मणाबरोबर जेवताना कोणतीही अवघडलेली मन:स्थिती अनुभवत नाही. मग बदला कसला? कोणी घ्यायचा? आणि का?

'ब्रह्म' जाणतो तो 'ब्राह्मण'! थोडक्यात, कोणताही ज्ञानी पुरुष हा 'ब्राह्मण' म्हणवला जाऊ शकतो. म्हणजेच, ब्राह्मण्य हे वारसा हक्कानेच मिळतं, असं नाही; तर तो इच्छा-शक्तीचा आणि प्रयत्नांचा भाग आहे. गळ्यात जानवं, डोक्यावर शेंडी, सकाळ-संध्याकाळी गायत्री मंत्राचा जप, ओठांवर संस्कृत सुभाषितांचा निवास, आहारामध्ये शुद्ध शाकाहारी घटक हीच जर ब्राह्मण्याची ओळख असेल; तर ही जातच आज अस्तित्वात नाही.

आणि, आडनावांमुळे ब्राह्मण झालेल्यांवर आज अन्याय आणि अत्याचार होणार असतील, तर समस्त ब्राह्मणसमाजाला त्याचं कसलंही सोयर-सूतक नाही. मुळात, ब्राह्मण हा आक्रमक नाहीच! त्याची ताकद त्याच्या मनगटात नसून, मेंदू हाच त्याचा एकमेव बळकट स्नायू आहे. ब्राह्मण मार खाईल, रडेल; पण तो कुणावरही हात उगारणार नाही. संमेलनात अथवा सभेत दोषारोपण करण्याची हुक्की आलीच, तर तो अन्य ब्राह्मणांनाच शब्दांचा मार देईल. कारण, आक्रमण आणि प्रतिकार असले शब्द त्याच्या हृदयाला भिडतच नाहीत.

गांधीहत्येनंतर ब्रह्मणांचीही कत्तल झालीच की; पण म्हणून त्याने कधी शस्त्र उचलले नाही; किंवा प्रतिकार केला नाही. अर्थात, पराक्रमी पेशव्यांचा अपवाद आपल्याला इथे वगळावा लागेल. त्यांनी शस्त्र उचलली खरी; पण पराक्रम गाजवला तो परकीय शत्रुंच्या विरोधात! पुढे, शालेय अभ्यासक्रमात असो अथवा सरकारी नोकरीमध्ये असो, कधी राखीव जागांची मागणी ब्राह्मणाने केली नाही. तो मूग गिळून गप्प राहिला. आजही तो गप्पच आहे आणि उद्याही तो गप्पच राहील.

आठ्याणव टक्के गुण मिळवूनही माझ्या मुलाला मनाजोगत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, याचं दु:ख करून घेतो, तो ब्राह्मण; पण जेमतेम उत्तीर्ण होऊनही हवा तिथे प्रवेश मिळवणा-या त्याच्या मित्राबद्दल त्याला असूया कधी वाटतच नाही. राखीव जागांच्या मुद्द्यांवरून पेटलेला देश पाहताना घरात लपून हळहळ व्यक्त करतो, तो ब्राह्मण; पण सरतेशेवटी त्याच्याच वाटच्या जागा आणखी कमी झाल्यावरही तो खचून जात नाही.

सदसद्विवेकाला पटलं, म्हणून ब्राह्मणाने शाकाहाराची बंधनं झुगारून दिली. लौकिकार्थाने काहीच महत्त्व न राहिल्यामुळे गळ्यातून जानवंही काढून ठेवलं. शेंडी हा तर कदाचित त्याच्याही विनोदाचाच भाग असेल. हा सर्व त्याग करूनही ब्राह्मणाने काहीच गमावलं नाही. पाणी नाका-तोंडाशी आल्यामुळे उद्या तो देशही सोडेल! सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ब्राह्मण्य म्हणजे ज्ञान... ज्ञान ही एक उर्जा आहे... आणि उर्जा म्हटलं की तिचा अंत अशक्य आहे. अर्थात ती रूप बदलते... ब्राह्मण देश बदलेल!

खरंतर हे सर्व विचार अशा प्रकारे मांडताना कुठलाही आनंद मला होत नाही; किंवा कसलीही प्रौढी गाजवण्याचा माझा उद्देश नाही. पण हे विचार एकांगी नसून त्यांवर विचार आवश्यक आहे; म्हणून ते मांडण्याचा हा अट्टाहास! अन्यथा 'भारत' हा लवकरच एका जबरदस्त उर्जेला गमावून बसेल आणि अन्य देशांत स्थाईक झालेले ब्राह्मण आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास रंगवून रंगवून सांगतील... अत्यंत 'पवित्र' हेतूने!!!

Tuesday, October 19, 2010

थोबाडपुस्तक

परवाच्या रविवारी दुपारी निवांत वेळ होता; म्हणून 'थोबाडपुस्तक' उघडलं आणि...
अरे! दचकलात ना?
हम्म्म्म... सहाजिक आहे.
'थोबाडपुस्तक' हा नेहमीसारखा शुद्ध आणि पारंपारिक मराठीत बोलायचा विषयच नाही; तर तो बोली मराठीत मांडण्याचा एक 'टॉपिक' आहे.

... तर ... परवाच्या 'सन्डे आफ्टरनून 'ला 'टाईमपास' म्हणून 'फेसबुक'(!!!) 'लॉगिन' केलं आणि 'वॉल' वरचे 'पोस्ट्स' बघत बसलो होतो. त्यापैकी काहींवर मी माझ्या (उपरोधक) 'कमेंट्स' टाकल्या, तर काही 'लाईक' केल्या. वास्तविक माझ्या 'फ्रेंड्सलिस्ट' मध्ये अडीचशे जण 'एडेड' आहेत. त्यामुळे 'फेसबुक'वर 'आक्टिव' रहायला मला पुरेशी कारणं 'अव्हेलेबल' असतात. नाही; कसंय... 'फेसबुक' हा जेवढा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तेवढाच तो करमणुकीचाही आहे.
उदाहरणार्थ, श्रीकांतने काल 'आय एम बोअर्ड' असं जाहीर केलं. आता यात मितालीला आवडण्यासारखं काय होतं कुणास ठाऊक; पण तिला ते 'लाईक' झालं खरं!

'फेसबुक'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाची हालचाल... माफ करा... 'आक्टिविटी' अगदी तारीख-वेळेसकट नोंदवली जाते. त्यामुळे, दोन वर्षांची लहान मुलगी असणा-या कमलेशने त्याचं स्व:चं 'प्रोफाईल' दहा तासांपूर्वी जेव्हा 'अप(टु)डेट' केलं, तेव्हा मला आलेलं 'नोटीफिकेशन' काहीसं असं होतं...
Kamlesh is married.
10 hours ago
माझं हसून हसून पोट दुखण्याची वेळ आली होती.

माझं हसून होतं न होतं, तेवढ्यात मला एक 'पिंग' आला. उजव्याबाजुच्या 'कॉर्नर'मध्ये एक 'पॉपप' दिसायला लागला. क्षमा नावाच्या माझ्या शाळेतल्या वर्गमैत्रिणीने मला 'ऑनलाईन' पाहून 'च्याट' करण्यासाठी 'हाय' केलं होतं. आता..., हा 'फेसबुक'चा खराखुरा फायदा आहे. इतर कोणत्याही प्रकारे संपर्कात नसलेल्या जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून काढण्याचं खात्रीलायक साधन म्हणजे 'फेसबुक'!
... तर, क्षमाच्या 'हाय'ला मीही पटकन 'हेलो'ने 'रिप्लाय' दिला. इथे क्षमाने आपलं 'डिस्प्ले नेम' 'क्षमा... To forgive' असं ठेवलं होतं, ही नमूद करण्यासारखी गोष्ट आहे.
'हाय-हेलो' नंतर रंगलेलं आमचं संभाषण काहीसं अशा प्रकारचं होतं...
क्षमा : वॉंत्सप???
मी : नथिंग स्पेशल. तू सांग.
क्षमा : सेम हिअर. टी.व्ही., 'फेसबुक' आणि थोडंफार 'कुकिंग' यातच फार 'बिझी' असते रे.
मी : चांगलंय! एकंदरीत तुझं चांगलं चाललंय!
(या माझ्या खोचक शे-यावर तिनं नुसताच एक 'स्माईली' पाठवला.)
मी : मग? शाळेतल्या इतर कोणाशी 'टच'मधे आहेस का?
क्षमा : हो. स्वाती, प्रणिता, अमित, प्रकाश आणि कोण-कोण आहेत माझ्या 'फ्रेंड्सलिस्ट'मधे. 'हाय-हेलो' होतच असतं.
मी : गुड...
क्षमा : वॉट एल्स? अमेरिका काय म्हणते?
मी : अमेरिका ठीक. सध्या थंडी पडायला लागलीये.
क्षमा : चल! यु आर सो नॉटी!!!
मी : (गप्प)!!!
(हे वाचून मी त्या थंडीपेक्षाही गार पडलो. काय 'रिप्लाय' द्यावा, हेच मला सुचत नव्हतं! एवढ्यात तिचाच खुलासा आला...)
क्षमा : सॉरी! राँग विंडो!
(अजूनही माझा अडकलेला अवंढा गळ्यातच होता. म्हणजे, ही बया इतर कोणाशीतरी (अ)'च्याट' करत होती.
पण म्हणून, 'त्या'चा चावटपणा + हिची चूक = मी नॉटी???)
क्षमा : अरे! निक ऑफिसमधून 'च्याट' करतोय.
(त्या तशा थंडीत आलेला घाम मी पुसून घेतला. तिच्या या वाक्याने मला जरा धीर आला. क्षमाचा नवरा निखील उर्फ निक त्याच्या ऑफिसमधून स्वत:च्या बायकोशी उगीचच चावटपणा करत होता.
आणि क्षमाच्या अनावधानाने मी 'नॉटी' ठरलो होतो.)
मी : ओ.के. कसा आहे निखिल?
क्षमा : एकदम फाईन!
(मी खरंतर इथेही 'नॉटी' याच उत्तराची अपेक्षा बाळगून होतो.)
आज त्याला रविवारचं ऑफिसला जावं लागलं. सो, आम्ही 'फेसबुक' वर 'टाईमपास' करतोय.
मी : ओह! कूल.
(मी अजूनही स्वत:ला च 'कूल' करण्यात मग्न होतो!)
क्षमा : बायदवे, तू व्हेगास ट्रीप केलीस का रे?
मी : नाही अजून.
क्षमा : अरे! जाऊन ये मग. 'बिंगो' नावाच्या तिथल्या कसिनोची 'ब्रांच' सद्ध्या पुण्यात उघडलीये. मस्त आहे.
(म्हणजे, पाश्चात्य संस्कृतीच्या असल्या 'फांद्या' आता आपल्याकडेही फोफावाताहेत. आणि त्यांचं गुणवर्णन मी इथे राहून ऐकतो आहे!)
मी : ओ.के.
क्षमा : बी.आर.बी.
(असं म्हणून क्षमा 'आयडल' झाली. इथे, 'बी. आर. बी.' चा फुल फॉर्म 'बी राईट ब्याक' असा असून 'आलेच हं!' इतका सोज्ज्वळ आहे, याची अज्ञानी वाचकांनी नोंद घ्यावी.)
.....
(सुमारे दहा मिनिटांनी क्षमा जी आली, तीच 'सी या' करायला!)
क्षमा : चाओं! सासुबाईना 'कुकिंग'मधे मदत हवी आहे. जाना पडेगा. टी.टी.एल.वाय!
मग, मीही 'शुअर' म्हणत तिला 'बा-बाय' केला.
इथे, 'टी.टी.एल.वाय' चा फुल फॉर्म 'तॉंक तु यु लेतर' असा आहे, हे सूज्ञांना सांगणे न लगे!

आमच्या दोघांच्या या संभाषणावरून हे सहज दिसून येतं की, 'फेसबुक'ची अशी स्वत:ची भाषा आहे. ती निव्वळ मराठी नाही, इंग्रजी नाही किंवा इतर कुठलीही नाही.
पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे 'फेसबुक' हे आता जीवनच होऊ लागलंय. 'फार्मविल'मधे शेती करून फावल्या वेळात ऑफिसचं काम(ही) करणारे पुष्कळ शेतकरी(!) मला ठाऊक आहेत.
जोडधंदा म्हणून 'कोफी-हाऊस' चालवून 'हौस' भागवणारे कित्येक महाभाग माझे मित्र आहेत. शरीराच्या कोणत्या भागावर तीळ आहे, यावरून तुमचाच स्वभाव ओळखणारे (वात्रट) ज्तोतिशी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच की!

या आणि अशा अनेक प्रकारांनी या 'फेसबुक'ने आपल्या पारंपारिक जीवनावर चांगलाच परिणाम केलाय. 'कब्जा मिळवलाय' हा कदाचित 'पर्फेक्ट' वाक्प्रचार ठरेल.
आता हेच पहा ना... नेहमी प्रमाणेच हा ही लेख शुद्ध मराठीत लिहिण्याची माझी मनापासून इच्छा होती. पण 'फेसबुक'चं भाषांतर 'थोबाडपुस्तक' केल्यावर माझी मीच माघार घेतली आणि हा लेख जमून आला...

Sunday, August 22, 2010

बाबा

"अरे... कशाला हवंय दर वेळी 'ए.सी.' चं तिकीट?"
बाबांचा हा प्रश्न मला काही रुचला नाही... अगदी नेहमीसारखाच!
वयाची सत्तावीस वर्ष नोकरीसाठी नेमाने डोंबिवली - सायन - डोंबिवली प्रवास केलेले माझे बाबा निवृत्तीनंतरही सतत कार्यमग्न असतात. माझ्याजवळ पुण्यात राहून ते शिकवण्या घेत असले, तरी पंधरा दिवसांतून एकदा मुंबईची चक्कर झाल्याशिवाय त्यांना राहवत नाही. हा प्रवास (त्यातल्या त्यात!) सुखकर व्हावा, म्हणून मी त्यांना 'ए.सी.' चं तिकीट काढून देतो. पुढे ते पाहिल्यावर होणारी आमची चर्चा (खरंतर वाद!) ही आईसाठी नेहमीचीच झालेली आहे. 'तीन तासांचा नेहमीचा प्रवास इतका खर्चिक कशाला करायचा?' हा बाबांचा प्रश्न आणि त्यानंतर फिरणारं माझं डोकं, हे एक समीकरणच होऊन बसलंय...

खरंतर, हा आणि असे इतर बरेच प्रश्न हे बाबांच्या विचारांचं आणि प्रवृत्तीचं सुतोवाच करत असतात. आणि माझे बाबा (कदाचित!) जगातल्या तमाम 'बाबा' समाजाचं (!) प्रतिनिधित्त्व करत असतात.

विचार करा... कायम खस्ता खाऊन पैनपै वाचवून आमच्यासाठी आयुष्य जगलेल्या बाबांना निवृत्तीनंतरही स्वत:च्या सुखासीन आयुष्याचे वेध लागू नयेत का? स्वार्थ - मोह - लोभ ही बहुदा सामान्य व्यक्तिमत्त्वाला लागणारी कीड आहे; पण त्यातल्या असामान्य नात्याला लागणारी नव्हे!

दसरा-दिवाळी आली म्हणून न जाणे कोणकोणत्या प्रकारे पैसे साठवून नवीन कपडे घेऊन देणारे बाबा, फक्त शेकड्यात असली, तरी त्याकाळच्या पगाराला जड वाटणारी आमची शाळेची फी हसतहसत भरणारे बाबा, 'मी अभ्यास करावा' म्हणून 'निकालानंतर सायकल घेऊन देईन' असं वाचन देणारे बाबा, ठरल्यापेक्षा चार गुण कमी मिळाले, तरी ती घेऊन देणारे बाबा, आम्हाला काही कमी पडू नये, म्हणून शाळेशिवाय घरच्या घरी मुलांच्या शिकवण्या घेणारे बाबा, 'ब्याट' म्हटलं की ती घेऊन देणारे, 'ट्रीप' म्हटलं की 'जा' म्हणणारे आणि काही न मागता सुद्धा ब-याचदा काही ना काही घेऊन देणारे बाबा... आज स्वत:च्या आरामदायी प्रवासापेक्षा मला होणा-या खर्चाची जास्त काळजी करतात.

मला खात्री आहे, थोड्या फार फरकाने सगळे 'बाबा' असंच वागत असणार. मातृत्वाला जशी भावनिक गुंतागुंतीची झालर असते, तशी पितृत्वाला ती कर्तव्याची असावी... पण अव्यक्त!
'अव्यक्त' अशासाठी की ती कर्तव्यपूर्ती निरपेक्षपणे सुरू असते. कुणाकडेही कसलीही वाच्यता न करता...!
मुलाला आईशी जोडणा-या नाळेच आणखी एक टोक देव आपल्याला दिसू देत नाही. 'स्वामी तिन्ही जगांचा...' म्हणत आईला देवघरात नेऊन ठेवणारे कवीही वडिलांकडे थोडं दूर्लक्षच करतात. कामावरून उशीरा घरी आल्यावर उशाशी बसून डोक्यावर हात फिरवणारे बाबा आपल्यालाही ब-याचदा उमजत नाहीतच की!

आपल्याला आयुष्यात करावी लागलेली धडपड आपल्या मुलाला किंवा मुलीला करावी लागू नये म्हणून झटणारे आणि तरीही आपल्याला न लाभलेलं सुखासीन आयुष्य त्याला लाभावं, यासाठी प्रार्थना करणारे बाबा हे कोणत्याही दैवतापेक्षा नक्कीच सरस ठरतात.

मला गंमत तर या गोष्टीची वाटते की, ज्या आपल्या मुलासाठी बाबा एवढे श्रम करत असतात, त्याच्या प्रगतीचे आनंददायक क्षण त्यांना प्रत्यक्ष क्वचितच अनुभवता येत असतात. त्याने उच्चारलेला पहिला शब्द, टाकलेलं पाहिलं पाऊल, मिळवलेलं पाहिलं यश, त्याच्या शाळेचा पहिला दिवस या सगळ्याचं कौतुक बाबांनाही असतंच की! पण कामावरून घरी आल्यावर आईच्या डोळ्यांतून ते पाहत असताना दिवसभराचे श्रम विसरणार नातं म्हणजे 'बाबा'!

मुलीसाठी घोडा होणारे बाबा ती लग्नघरी निघाल्यावर हळवे होत नसतील कशावरून? निघताना 'आधी आईच्या पाया पड' म्हणत पटकन डोळे टिपताना त्यांनाही विरह जाणवत असेलच ना!
... पुरूष असल्याची जाणीव म्हणा, पितृत्वाची भूमिका म्हणा किंवा आपोआप घडून आलेला कर्तव्यदक्ष, करारी आणि जबाबदार पालक म्हणा... वरवर कधीकधी निष्ठूर वाटणारा 'बाबा' किती पोलादी आयुष्य जगत असतो...!

नात्याने घडवून आणलेला स्वभाव असेल किंवा आयुष्यभराची लागलेली सवय असेल, 'बाबा' बाहेरून पोलादीच राहणार. आपल्यालाच त्या आतल्या हळव्या झ-याची जाणीव करून घेतली पाहिजे. त्यांना खर्चिक वाटेल...; विनाकारण वाटेल...; पण आपणच त्यांना त्या सुखासीन आयुष्याची ओळख करून दिली पाहिजे. आपण लहानपणी केलेले हट्ट त्यांनी पुरवले. मग आता ते करत नसलेले हट्ट आपण पुरवून त्यांना आनंद का बरं नाही द्यायचा?

'पोरानं अमेरिका फिरवून आणलं आम्हाला', असं जगाला भरभरून सांगणारे माझे बाबा, मी अमेरिकेला निघालो होतो, तेव्हा म्हणाले होते, "जर्मनीला जायचं स्वप्न पाहिलं होतं एके काळी. तू अमेरिकेला जाऊन पूर्ण करतोयस हो रे!" ...
त्यांना मी नुसताच वाकून नमस्कार केला होता तेव्हा...; पण मनाशी मात्र पक्कं केलं होतं, 'बाबा जर्मनीला जाणं, हा आपला हट्ट आहे आता.'
... अर्थात, प्रत्येक विमानाला 'ए.सी.' हा असतोच! त्यामुळे तेव्हा वाद होणार नाही, याची मात्र मला पक्की खात्री आहे...

- शेखर श. धूपकर
(Shekhar S Dhupkar)

Sunday, June 20, 2010

माझा पहिला विमानप्रवास...


मूल गर्भात असताना मातेनं केलेल्या विचारांचा त्या नवजात अर्भकाच्या स्वभावावर फार मोठा ठसा उमटतो, असं म्हणतात. अभिमन्यूला जन्मापूर्वीच चक्रव्यूहात शिरण्याची विद्या ज्ञात होती; अशी कथा महाभारतातही नमूद आहे. अगदी याच धरतीवर विचार करायचा, तर माझ्या आईने माझ्या जन्माच्या वेळी 'भटकंती', 'केल्याने देशाटन' असलेच कार्यक्रम पाहिले असावेत... किंवा बाबांनी रोज कामावरून घरी आल्यावर आईला आपल्या 'डोंबिवली - सायन - डोंबिवली' प्रवासाचे किस्से अगदी रंगवून रंगवून सांगितले असावेत... कारण, त्याशिवाय फिरण्याची एवढी हौस मला आणखी कुठून येणार?

पुढे, जसा मी आई-वडिलांच्या हातावेगळा झालो, तसा केलेला कोणताही प्रवास हा कधीच योग्य रस्ता किंवा रूळ सोडून केल्याचं माझ्या स्मरणात नाही. थोडक्यात, पंचविशीपर्यंतचे सर्व प्रवास हे भूमार्गानेच झाले. आणि जमीन सोडून झालेला पहिला प्रवास म्हणजे माझी 'अमेरिकास्वारी'! पण त्यामुळे अमेरिकेला निघताना अमेरिकेपेक्षा महत्त्व ज्या विमानाने तिथं जाणार, त्या विमानालाच अधिक होतं. गंमत म्हणजे, विमानतळात प्रवेश करताना मंदारने मला आवर्जून "खिडकीतून हात बाहेर काढू नकोस रे!" अशा शब्दात निरोप दिला होता.

माझ्या मते, 'खिडकी' हा प्रवासाचा अविभाज्य घटक आहे. अगदी ऑनलाईन तिकीट खरेदी करतानाही आपण खिडकीजवळच्या जागेला प्राधान्य देतो. स्वाभाविक आहे म्हणा हे अगदी...! मुंबईच्या लोकलने नित्य प्रवास करणा-यालाही 'खिडकीची सीट' म्हणजे अगदी 'आजि म्या ब्रह्मच' वाटते. त्यामुळे कधी नव्हे ती खिडकीची जागा रिकामी असतानाही ती न मिळवणारा इसम हा 'दैव देतं अन कर्म नेतं' या उक्तीचं अथवा प्रेमभंगाचं उत्तम उदाहरण असू शकतो.

तर अशा या मनुष्यस्वभावाला अपवाद नसलेला मीही खिडकीची जागा मिळावी, म्हणून मनोमन प्रार्थना करत होतो. माझा लंडनपर्यंतचा प्रवास रात्रीच्या अंधारात होणार होता; तर त्या पुढचा दिवसा-उजेडी! त्यामुळे 'भारत - जपान - भारत' अशा विमानप्रवासाचा (दांडगा) अनुभव असलेल्या मानसीने मला 'लंडन - अमेरिका' विमानात खिडकीची जागा देण्याची विनंती करण्याबद्दल सूचना केली होती. रात्रीच्या प्रवासात खिडकीचा तसा (!?) काहीच उपयोग नाही; असं मतही तिने ठामपणे मांडलं होतं. कदाचित 'देशोदेशीचा अंधार एकसारखाच दिसतो' हा त्या ठाम मातामागाचा निकष असावा.

प्रत्यक्ष, या सर्व सूचनांवर माझ्यातल्या भ्याड व्तक्तीमत्त्वाने जोरदार मात केली आणि कसलीही विनंती न करता मिळालेले पासेस मुकाट हातात घेउन मी विमानाकडे माझी वाट मोकळी केली. जेट कंपनीच्या त्या भव्य विमानात प्रवेश केल्यावर मी सर्वप्रथम माझी जागा शोधण्याच्या कामी लागलो. आणि जागांवरील क्रमांकांपेक्षा ती दाखवणा-या त्या हवाई - सुंद-यांकडेच अधिक लक्ष गेल्यामुळे माझी जागा 'चुकवून' मी आणखी पुढे गेलो. माझ्या या चुकीची जाणीव माझ्याच चेहे-यावर स्पष्टपणे वाचलेल्या त्यापैकी एका (हवाई) सुंदरीने मला माझी (योग्य) 'जागा' (!) दाखवून दिली. प्रवाशांचा पाणउताराही इतक्या हसतमुखाने केला जाऊ शकतो; याचा अनुभव मी त्या रात्री घेतला. तीन बाय तीन बाय तीन अशी बैठकव्यवस्था असलेल्या त्या विमानात मला मधोमध जागा मिळाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या खिडक्या सारख्याच अंतरावर असल्याच्या विचाराने मी आनंद (!) मानून घेत होतो.

पुढे... ठरलेल्या वेळेनुसार त्या विमानाने उड्डाण केले. लक्ष दिव्यांच्या सोनेरी प्रकाशामध्ये न्हाऊन निघालेल्या मायानगरीचं ते 'विहंगम' दर्शन तितकंच विलोभनीय होतं. उजव्या खिडकीला बसून अशाही वेळी टाय-कोटातील एका सद्गृहस्थाच्या झोपेची मला मनोमन कीव (की चीड?) आली. आठ-दहा हजार फुटांवर पोहोचल्यावर त्या हवाई-सुंद-यांची लगबग पुन्हा सुरू झाली. गंमत म्हणजे, तशी लगबग करणा-यांमध्ये काही पुरुषही होते. 'हवाई - सुंदरी' सारखा 'त्या' पुरुषांना नक्की कोणता पूरक शब्द असावा, असा एक प्रश्न मला तेवढ्यात चाटून गेला.

त्यातलाच एक जण हातातल्या चिमट्याने पांढ-या सुतारफेण्या वाटत असल्याचं माझ्या ध्यानात आलं. ते नक्की काय असावं, हे समजण्यापूर्वीच तो माझ्यासमोर स्मितहास्य करत उभा राहिला. ते (त्याच्या हातातलं) स्वीकारावं की नाकारावं, हे न कळून मी ही त्याला प्रति-स्मित केलं. पण तेवढ्याने समाधान न झालेल्या त्याने तो चिमटा माझ्या "आता मुकाट घेतूस; की... ... ..." इतक्या नजीक आणला. नाईलाजाने मग मी ही त्यातली सुतारफेणी स्वीकारली. माझ्या दोन बाजूंना दोन सत्तरी ओलांडलेले आजोबा बसले होते. त्यांची नक्कल करण्याचं मी मनाशी पक्कं केलं. परंतू, डावीकडचे आजोबा निद्रादेवीची आराधना करत होते; तर उजवीकडचे माझ्याकडे माझ्याइतक्याच 'ढ' आणि आशाळभूत चेहे-याने पाहत होते. तेवढ्यात मला पुढच्या रांगेतील एक गो-या काकू तो पांढरा पदार्थ उलगडून (स्वत:च्या) चेहे-यावर थापत असल्याचे लक्षात आले. अहो! कोमट पाण्यात बुचकळलेल्या टॉवेलच्या घड्या होत्या त्या...! ... मग, लगेच मोठ्या हुशारीने त्या गूढाची उकल मी उजव्या आजोबांना करून दिली आणि त्यांचे आशीर्वाद मिळवले.

आम्ही दोघंही त्या दिव्यातून बाहेर पडतो न पडतो, तो च आणखी एक दिव्य समोर उभे ठाकले. पण, हे दिव्य स्वत: भलतेच मोहक होते. त्यामुळे, तिने ग्लासातून नक्की काय आणले असावे, या (चावट!) प्रश्नानेच माझा घसा कोरडा पडला. पण यावेळी मात्र परिणामांचा विचार न करता त्या मोहक हातांनी (ग्लासातून) पाजलेले ते सोडा-लेमन मी गोड मानून रिचवले. त्यानंतरचा काही वेळ मात्र 'पुढे काय?' हे कोडं सोडवण्यात गेला. समोरच्या चलत-नकाशाने सध्या आपण पाकिस्तान-अफगाणिस्तान असल्या उन्मत्त राष्ट्रांवरून उडत असल्याचे निर्देष दिले. त्यामुळे, 'मुकाट झोपावे' असा एक सुज्ञ विचार माझ्या मनात डोकावून गेला. पण ही राष्ट्रे जगात कुणालाच स्वस्थ झोपू न देण्यात पटाईत असल्यामुळे मी ही 'जागते रहो' करत स्वस्थ बसून होतो.

इतक्यात, समोरच्या सीटच्या मागच्या बाजूला असलेल्या स्क्रीनवर आपण आपल्या आवडीचे मराठी-हिंदी चित्रपट पाहू शकतो, असा शोध मला लागला. नुकताच प्रदर्शित झालेला 'साडे-माडे-तीन' हा चित्रपट मी निवडला. एवढ्यात जेवणाचं ताट माझ्या समोर आलं. काबूलच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे-तीन वाजता चित्रपट पहात जेवण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग! एरवी जेवताना टी.व्ही. न लावण्याचा कायदा घरी कडकपणे पाळला जातो.

थोड्याच वेळात, त्या जेवणामुळे मला झोप येऊ लागली; आणि सुमारे चार तासांच्या आराधनेनंतर मी डोळे उघडले, तेव्हा नकाशा जर्मनीपाशी पोहोचला होता. बाहेर भयाण काळोख आणि डाव्या आजोबांची झोप यांना क्षणाचीही उसंत नव्हती. मी मात्र नियमाने उठून प्रातर्विधी - मुखप्रक्षाळण वगैरे उरकून घेतले. काही क्रिया जमिनीपासून अकरा हजार फूट उंच अवकाशात करण्यात खरंच मोठी मजा आहे, तुम्हाला सांगतो...!

माझा दिवस जरा लवकरच उजाडल्याची जाणीव चेहे-यावर जराही दिसू न देता, एका हवाई - सुंदरीने माझ्या न्याहारीची सोय केली. त्यावेळी अकरा हजार फुटांखाली रशियाची जमीन असल्याचं नकाशा दाखवू लागला होता. 'खरं-खोटं' करण्याचा प्रश्नच इथे उद्भवत नव्हता. दहा फूट दूर खिडक्यांमधून बाहेर काळोखाशिवाय काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे खालचा भूभाग रशियाचाच असावा, अशी मी स्वत:चीच समजूत काढून दिली.

काही वेळाने बाहेर तांबडं फुटू लागलं; सहप्रवाशांच्या झोपा पूर्ण होऊ लागल्या; नकाशावर लंडन 'दिल्ली अब दूर नाही' च्या आवाक्यात जाणवू लागलं. आणि खरोखरच काही वेळात त्या महाकाय यंत्राने जमिनीच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.

वस्तुत: अंधारात झालेला हा प्रवास पुरेसा मनोरंजक होता. तो अजिबात रटाळ वाटला नाही. पुढे हिथ्रो विमानतळावर चार तासांच्या विश्रांतीनंतर अमेरिकेच्या विमानात माझा प्रवेश झाला. योगायोगाने मला खिडकीची जागा मिळाली होती. त्यामुळे विमान उड्डाणाच्या वेळी लंडनची काही लोभस दृश्ये नजरेत साठवता आली. पण त्यानंतरचा प्रवास मात्र अतिशय कांटाळवाणा वाटला. सहप्रवाशांची कांती आणि खिडकीबाहेरील दृश्ये अति-उजळपणामुळे रुक्ष भासली. या रटाळपणावर मात करण्याकरता मी पु.लं. च्या 'अपूर्वाई' मध्ये मान घातली. गोठलेला अथांग अटलांटिक महासागर पार करता करता अपूर्वाईचं आणखी एक पारायण घडून आलं.

पुढे अमेरिकेच्या हद्दीत आल्यावरही पांढरा शुभ्र भूभाग आणि त्याला छेदत जाणारे लांबच लांब रस्ते दृष्टीस पडत होते. बोस्टन, न्युयोर्क, वॉशिंगटन डी. सी. असली माहितीतली नावं पार करत त्या विमानाने 'राली' च्या दिशेने मार्गक्रमण सुरी ठेवलं. पावसाळी हवामानामुळे जमिनीवर उतरण्यास आमच्या विमानाला उशीर झाला खरा; पण पुढील काही क्षणातच समृद्ध, श्रीमंत, मोहक अशा या अमेरिकेमध्ये माझं पाहिलं पाऊल पडलं...

- शेखर श. धूपकर
(Shekhar S Dhupkar)

Wednesday, May 19, 2010

लग्न-'गाठी' (आणि गुंते!)


एखाद्या विषयावर लिखाण करायचं, म्हणजे त्याआधी विचारांची बैठक हवी. सूज्ञपणे... विचारांची परिपक्वता ही अनुभवांवर अवलंबून असते. थोडक्यात काय तर, प्रवासवर्णन हे एखाद्या ठिकाणाला भेट दिल्यावर नोंदवलेल्या अनुभवांचा गोषवारा असतं; किंवा राजकीय दंगलींची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष झळ सोसल्यानंतर उत्स्फुर्तपणे मांडलेले विचार अधिक प्रभावी असतात.
आता या सगळ्याचा अर्थ असा नक्कीच नाही की, प्रत्येक लिखाण हे कोणत्या-ना-कोणत्या अनुभवांचच प्रतीक असावं. शाळेमधे शिकताना 'रेल्वेच्या फलाटाच मनोगत' स्वानुभवातून लिहिणं निव्वळ अशक्य आहे. अशावेळी येतो, तो कल्पना-विलास!
पण म्हणून, लिखाण हे फक्त अनुभवांची व्यक्तता किंवा कल्पनाविलास या दोन प्रकारांतच मोडावं का?

खरं सांगायचं तर, लिखाण हे विचारांचं व्यक्तरूप असतं. अशा विचारांना नियमांच्या चौकटीत बसवता येत नाही; तयार साच्यांतून घडवता येत नाही किंवा तो न करता स्वस्थही बसता येत नाही. माझ्या या लिखाणाचा गाभा हा मी न घेतलेल्या अनुभवांचा आहे. त्यामुळे तो परिपक्व नसेलही कदाचित, पण उत्स्फूर्त नक्कीच आहे. अगदी स्पष्टच सांगायचं, तर 'लग्न' या विषयावर माझे विचार व्यक्त करण्याची हिंमत करायचं मी ठरवलं आहे. (लग्नानंतर हिंमतही उरत नाही आणि आपण काही ठरवूही शकत नाही; असं 'अनुभवी' पुरूष सांगतात!)

'लग्न जमवणं' ही दिर्घप्रक्रीया आहे. काहीजण बालपणीच सुरू करतात, अशा अर्थाने नाही म्हणते मी! पण, अगदी 'चट मंगनी, पट बिहा' सुद्धा बऱ्याच विचारांती घडून येत असतात. आता या विचारप्रक्रियेमध्ये कोणकोण सामील असतं? ... या प्रश्नाचं उत्तर कालखंड, भूगोल, संस्कृती अशा कित्येक परिमाणांवर अवलंबून असतं.
अर्थात, प्रेमविवाहाला यातली कोणतीच परिमाणं परिणामकारक ठरताना दिसत नाहीत. मुळात, 'प्रेमविवाह' हा या लेखाचा भाग असूच शकत नाही. "त्याने तिला पाहिलं, तिने त्याला पाहिलं; त्यानंतर लगेच (?) त्या दोघांना ते एकमेकांसाठी जन्मल्याचा साक्षात्कार झाला... आणि घरचा विरोध झुगारून (किंवा मोडून काढून) त्यांनी लग्न केलं", हे सांगायला लांबलचक लेखाची गरज ती काय!!! अर्थात पहिल्या भेटीत (किंवा नजरभेटीत) ज्यांना असा साक्षात्कार होत नाही; त्यांना तो एकमेकांची आर्थिक आणि शारीरिक परिस्थिती पाहून लवकरच होतो, हे नमूद करण्याची गरज नक्कीच नाही. (त्यात, 'आर्थिक परिस्थिती' ही पुरुषात बघण्याची बाब असते; हे सूज्ञांनी समजून घ्यावे.) ... असो! थोडक्यात, प्रेमविवाहाच्या बाबतीत विचारप्रक्रियेला कमीत कमी महत्त्व असतं; कारण विचार न करता ठरलेली बहुतेक लग्न या प्रकारात मोडतात, असं माझं आपलं एक अननुभवी परंतू प्रांजळ मत आहे.

पारंपारिक विवाहपद्धतीमध्ये कित्येक विचार आणि तो करणारे गुंतलेले असतात. यामध्ये ज्याचं लग्न, त्यांना प्राथमिक भूमिका बजावायला मिळतेच असं नाही. मुळात या प्रकारच्या लग्नामध्ये बरेच जण विचार करत असतात खरे; पण त्या उमेदवारांच्या विचारांना योग्य न्याय मिळतोच, असंही नाही.
हा सूर तक्रारीचा वाटत असला, तरी जी लग्न जाती, पोटजाती, कुंडली अथवा मंगळ - अमंगळ आदी अनाकलनीय तत्त्वांवर अवलंबून असतात; त्यांना पूर्ण समर्थन करणंही, तितकंच अनाकलनीय ठरेल. वयामध्ये फारसा फरक नसावा; दोघांचं शिक्षण एकमेकांना पूरक असावं; खाण्या-पिण्याचा तथा राहणीच्या सवयी ढोबळमानाने एकसारख्या असाव्यात, या आणि अशा विचारांची खोली स्वागतार्ह असली, तरी अशा सर्व परिमाणांवर बाजी मारणारा एखादा होतकरू वर (तितक्याच!) होतकरू वधूला पूरक असेल किंवा पसंत करेलच, असं नाही.
आता, समोरून अशी नापसंती येणं, म्हणजे आपल्यात अथवा आपल्या कुलोत्पन्नात काही वावगं आहे, या विचाराने अस्वस्थ होण्याचं काहीच कारण नाही. समोरची व्यक्ती 'जीवनाचा साथीदार' म्हणून आपल्याला मंजूर असेल, तरी त्या व्यक्तीचे विचार तसे असतीलच, असं नाही. पण त्यापेक्षाही अशा एकाहून अधिक नकारांमुळे घरांमध्ये निर्माण होणारे ताणतणाव हे या महत्त्वाच्या निर्णयाला मारक ठरू शकतात.

दोन पिढ्यांपूर्वीची लग्नव्यवस्था आजएवढी गुंतागुंतीची नसेलच कदाचित... आट्यापाट्या खेळणा-या मुलांची लग्न भातुकली खेळणा-या मुलींशी ठरत म्हणे... अगदी आपल्या आधीच्या पिढीतही किती मुली उच्चशिक्षित होत्या किंवा लग्न ठरेपर्यंत भल्यामोठ्या पगारांच्या नोक-या करत होत्या? किती टक्के मुलं स्वत:चं राहतं घर, गाडी, एखादी परदेशवारी अशी स्वत:ची ओळख करून देत होती?

वरचे प्रश्न हे कोणत्याही गाढ्या अभ्यासांती विचारले गेले नसले, तरी आजच्या लग्नपद्धतीमध्ये झालेले अतोनात बदल, आधीच्या पिढ्या 'आमच्यावेळी असं नव्हतं' असं म्हणत कबूल करतील. मुळात महिना २०-२५ हजार रुपये मिळवणा-या आजच्या उच्चशिक्षित आणि पुढारलेल्या मुली आपला नवरा आपल्या एखाद पाऊल पुढे असावा, अशा विचाराच्या असतात. त्यासाठी आवश्यक असलेला वयातला फरकही ब-याचदा त्यांना मान्य नसतो.
माझे हे विचार म्हणजे एकांगी आरोप वाटत असले, तरी एकाच वयात समान शिक्षण घेऊन नोकरीला लागलेल्या दोन व्यक्तींमध्ये कितपत फरक असू शकेल?

याशिवाय सध्या मुलींच्या भावी सासू-सास-यांबद्दलही अटी असतात म्हणे! थोडक्यात काय... तर भावी साथीदाराबद्दलच्या अपेक्षा अवास्तव होत चालल्या आहेत. त्यांना पुन्हा जाती-पोटजातींच्या अटींची साथ आहेच. त्यापुढे इतक्या गाळण्यांतून यश मिळवलेले उमेदवार एकमेकांना पसंत करतीलच, असं नाही. कुणाला साथीदाराची व्यसनं मान्य नसतात; तर कुणाला राहणी... कुणाला समोरच्याच्या भूतकाळातील प्रेमभंग रुचत नाही; तर कुणाला भविष्यातील स्वप्ने...
याशिवाय दोन्ही कुटुंबांतून मान आणि अपेक्षांच्या अपेक्षा ठेवणारे असतातच. थोडक्यात काय, तर लग्नपद्धतीमध्ये अडथळेच फार दिसतात!
वरील सर्व मुद्दे हा कदाचित एकांगी दृष्टिकोण असेलही; पण विचारांना परिपक्वता ही अनुभवांतूनच येते. पण या बाबतीत मात्र अनुभवांनंतर फेरविचाराला जागा नाही.
त्यामुळे आई-वडील आणि थोरांच्या अनुभवांचा फायदा उमेदवारांना करून दिला जावा. त्याचवेळी अवास्तव आणि निरर्थक गाळण्या दूर करून डोळसपणे लग्नसंस्थेकडे बघितले जावे. शेवटी काय हो... रक्ताचं नसूनही सर्वात जवळचं नातं असतं हे... त्याच्या घडणीमध्ये अडथळ्यांपेक्षा मार्गदर्शनाची भूमिका व्यक्त व्हावी. आणि इच्छा मात्र एकच... अनुभव घेण्यापूर्वी केलेला हा एक निव्वळ कल्पनाविलास ठरू नये; तर तो वस्तुस्थितीतही उतरावा...

- शेखर श धूपकर
(Shekhar S Dhupkar)

Thursday, February 11, 2010

'बलसागर भारत होवो'... पण तो तसा करणार कोण?


२६ जानेवारी २०१० रोजी भारताने ६१ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. खरंतर, १५ ओगस्ट आणि २६ जानेवारी हे दिवस भारतात 'सुट्टी' म्हणून 'साजरे' होतात. बाकी, जबाबदारी म्हणून झेंडावंदनाची एक 'प्रथा' ब-यापैकी पाळली जाते. यंदा काश्मिरमध्ये ती ही धाब्यावर बसवली गेली. श्रीनगरच्या लाल चौकात या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकला नाही!

या (न घडलेल्या) घटनेची पुरेशी दखल प्रसारमाध्यमांनीही घेतली नाही... आणि 'सुज्ञ' म्हणवणा-या नागरिकांनीही तिकडे काणाडोळा केला. भारतीय प्रसारमाध्यमं कोणत्या घटनेची 'बातमी' करतील आणि कोणती बातमी कशी दडपवतील, हा एक (वेगळ्या) वादाचा मुद्दा आहे. 'प्रीती झिंटाने दिल्ली विमानतळाच्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवरून उडी कशी मारली' ही बाब अधोरेखित करणं, यातच लोकशाहीचा हा चौथा आधार धन्यता मानतो.

पण प्रसारमाध्यमांना या वागणुकीबद्दल पूर्णपणे जबाबदार धरता येणार नाही. 'मागणी तशी पुरवठा' हा अर्थशास्त्राचा नियमच आहे. ... आणि भारतीय नागरिकशास्त्र हे पूर्णपणे अर्थाशास्त्रावरच अवलंबून आहे.

... असो! 'न फडकलेला तिरंगा' हे घडून गेलेल्या घटनेतील अर्धसत्य आहे. काश्मीरच्या द-याखो-यात यंदा तिरंग्याच्या बरोबरीने किंवा तिरंग्याशिवाय दुसरा एक ध्वज फडकला. या ध्वजावर पांढ-या रंगात तीन उभ्या रेषा आणि साधारण नांगराच्या आकारासमान एक चिन्ह होतं. पण महत्त्वाचं म्हणजे, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा उग्र ध्वज फडकावला जाण्यामागचा हेतू जाणून घेण्यात देशातल्या सतर्क(!) जनतेला स्वारस्यही नव्हतं.
... कसं असणार म्हणा!!! 'एकाची दोन करण्यामध्ये' आंध्र प्रदेश गुंतला होता; 'मराठी - अमराठी' करण्यामध्ये मुंबई गर्क होती; चीनच्या सीमोल्लंघनाचा अनुभव अरुणाचल प्रदेश घेत होता. याशिवाय प्रांतिक, जातीय, भाषिक, लैंगिक तथा सामाजिक मतभेदांना खतपाणी घालण्याचं काम राजकीय समाज करत होताच! त्यात, या सर्व घटनांपासून 'अलिप्त' राहण्यासाठी सतत धडपड करणा-या सामान्य नागरिकाला काश्मिरमध्ये न फडकलेल्या तिरंग्यामध्ये अथवा फडकलेल्या भडक रंगाच्या कापडामध्ये स्वारस्य का बरं असावं? अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून येणारा काळा की गोरा याची कसोशीने माहिती मिळवताना आपल्या देशाच्या सिंहासनावर कोण बसणार याची तमाही न बाळगणा-या आम्हा भारातीयांकाडून षंढपणापलीकडे कसली बरं अपेक्षा केली जावी?

व्यवस्थेकडे बोटं दाखवणा-या व्यक्तींना दोष देण्यापेक्षा तशी बोटं दाखवण्याच्या वृत्तीला दोष दिल्यास या व्यवस्थेमध्ये बदल घडून येऊ शकतील. अर्थात, दोष देण्यापेक्षाही बदल घडवण्यावर जोर दिला जाण्याची अधिक आवश्यकता आहे.

खरंतर, हे विचार लिहायला-वाचायला सोपे असतीलही; पण अनुसरण करायला ते नक्कीच सोपे नाहीत. कारण... बदल घडवून आणायचा, म्हणजे नक्की काय करायचं? हा मूलभूत प्रश्न आहे. पण तो दिशाहीनता दाखवतो! 'मी एकटा काय करणार?' ... हा प्रश्न निव्वळ मानसिक हतबलता व्यक्त करतो. व्यवस्था आणि समाज हे एकार्थी व्यक्तींवरच अवलंबून असतात. पण त्यात संघटनेला अधिक महत्त्व आहे. आता, रोज संध्याकाळी ६:३० वाजता भगव्या ध्वजासमोर 'दक्ष'(!) अवस्थेत प्रणाम केला, म्हणजे आपण 'संघटित' झालो का? या गोष्टीवर विचार आवश्यक आहे. काही लाख लोकांनी एखाद्या सकाळी 'माराथोन' म्हणून एकत्र धावलं म्हणजे समाज संघटित झाला नाही... किंवा व्यवस्था सबळ झाली नाही.

२६ नोव्हेंबर नंतर १५ दिवसांनी काही मेणबत्त्या लावून आपण फक्त आपल्या उदासीनतेचं जाहीर प्रदर्शन करत असतो. मुंबईच्या लोकल्समधील स्फोटांमध्ये जीव गमावणा-या हजारो निरपराधांना बर्षभराने श्रद्धांजली वाहून आपण आपल्यातील दुर्बलतेला चालना देत असतो. एवढंच काय पण, रस्त्यावर सुरु असलेली मारामारी चुकवून दुस-या बाजूने जाताना किंवा ती सभोवताली उभ्याने पाहताना आपण आपल्या निर्लज्जपणाचा कळसच करत असतो.

जेवढं द:ख त्या संकटांच होत नाही, त्याहून जास्त त्याला सामोरं जाण्याच्या आपल्या पद्धतीचं होतं. पण ही परिस्थिती बदलणार का? ... सध्यातरी या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच द्यावं लागेल. कारण सकारात्मक निकालांसाठी सकारात्मक पवित्रा आवश्यक असतो. आणि तो आपण घेणार कसा? ... इतर देशांमध्ये आपण जसे जबाबदार, सतर्क, शिस्तबद्धपणे जगतो, तसे जर आपण आपल्याच देशात जगलो, तर कदाचित हे शक्य होऊ शकेल. इतर देशांची संपन्नता ही त्या-त्या देशांच्या नागरिकांच्या वर्तणुकीवर अवलंबून असते. कदाचित आपल्या बेजबाबदार वर्तणुकीवरही ती तितकीच अवलंबून असते. याचाच अर्थ, आपल्या देशातल्या ज्या-ज्या गोष्टींना आपण नावं ठेवतो, त्या-त्या सुधारण्याची जबाबदारीही आपलीच आहे.

कोणाच्याही एकट्याच्या वागण्याने व्यवस्था सुधारणार नाही, हे मान्य; पण तसं वागल्यामुळे इतरांना दोष देण्याची नैतिक पात्रता योग्य वागणा-याला मिळेल तर जरूर! आणि या गोष्टीच्या जाणीवेतून इतरांनीही योग्य वागणूक अवलंबली, तर व्यवस्थाही सुधारू शकेल.

... आता, कदाचित हा लेख लिहायचा इथेच संपवून, तुमच्याच मनातले विचार वाचायला दिल्याचं श्रेय मी मिळवू शकेन. तसा तो वाचून तुम्ही त्या वास्तवाकडे पुन्हा एकदा सहजपणे दुर्लक्ष कराल, यातच या लेखाचं यशही लपलेलं आहे. कारण, आपल्यातील दुर्बलतेचं आणि बेजबाबदारपणाचं ते आणखी एक बोलकं उदाहरण असेल. पण वाचकांपैकी एखाद्यापर्यंत जरी या लेखाचा गाभा पोहोचल्याच त्याच्या कृतीतून दिसून आलं, तरी या लेखामागच्या विचारांचं नक्कीच सार्थक होईल. शेवटी काय हो... भ्याडपणातूनच आशावादाचा जन्म होतो. आणि मी पूर्णपणे आशावादी आहे. मात्र खरी भीती आहे ती, समाज संघटित नसल्याची; देश एकसंध नसल्याची; मनामनावर अजूनही राज्य करू पाहणा-या परक्या संस्कृतीची! ... आणि आज एका राज्यात राष्ट्रध्वजाव्यतिरिक्त फडकलेल्या गनिमी पारतंत्र्याची...!!!

- शेखर श. धूपकर

(Shekhar S Dhupkar)