Thursday, February 11, 2010

'बलसागर भारत होवो'... पण तो तसा करणार कोण?


२६ जानेवारी २०१० रोजी भारताने ६१ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. खरंतर, १५ ओगस्ट आणि २६ जानेवारी हे दिवस भारतात 'सुट्टी' म्हणून 'साजरे' होतात. बाकी, जबाबदारी म्हणून झेंडावंदनाची एक 'प्रथा' ब-यापैकी पाळली जाते. यंदा काश्मिरमध्ये ती ही धाब्यावर बसवली गेली. श्रीनगरच्या लाल चौकात या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकला नाही!

या (न घडलेल्या) घटनेची पुरेशी दखल प्रसारमाध्यमांनीही घेतली नाही... आणि 'सुज्ञ' म्हणवणा-या नागरिकांनीही तिकडे काणाडोळा केला. भारतीय प्रसारमाध्यमं कोणत्या घटनेची 'बातमी' करतील आणि कोणती बातमी कशी दडपवतील, हा एक (वेगळ्या) वादाचा मुद्दा आहे. 'प्रीती झिंटाने दिल्ली विमानतळाच्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवरून उडी कशी मारली' ही बाब अधोरेखित करणं, यातच लोकशाहीचा हा चौथा आधार धन्यता मानतो.

पण प्रसारमाध्यमांना या वागणुकीबद्दल पूर्णपणे जबाबदार धरता येणार नाही. 'मागणी तशी पुरवठा' हा अर्थशास्त्राचा नियमच आहे. ... आणि भारतीय नागरिकशास्त्र हे पूर्णपणे अर्थाशास्त्रावरच अवलंबून आहे.

... असो! 'न फडकलेला तिरंगा' हे घडून गेलेल्या घटनेतील अर्धसत्य आहे. काश्मीरच्या द-याखो-यात यंदा तिरंग्याच्या बरोबरीने किंवा तिरंग्याशिवाय दुसरा एक ध्वज फडकला. या ध्वजावर पांढ-या रंगात तीन उभ्या रेषा आणि साधारण नांगराच्या आकारासमान एक चिन्ह होतं. पण महत्त्वाचं म्हणजे, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा उग्र ध्वज फडकावला जाण्यामागचा हेतू जाणून घेण्यात देशातल्या सतर्क(!) जनतेला स्वारस्यही नव्हतं.
... कसं असणार म्हणा!!! 'एकाची दोन करण्यामध्ये' आंध्र प्रदेश गुंतला होता; 'मराठी - अमराठी' करण्यामध्ये मुंबई गर्क होती; चीनच्या सीमोल्लंघनाचा अनुभव अरुणाचल प्रदेश घेत होता. याशिवाय प्रांतिक, जातीय, भाषिक, लैंगिक तथा सामाजिक मतभेदांना खतपाणी घालण्याचं काम राजकीय समाज करत होताच! त्यात, या सर्व घटनांपासून 'अलिप्त' राहण्यासाठी सतत धडपड करणा-या सामान्य नागरिकाला काश्मिरमध्ये न फडकलेल्या तिरंग्यामध्ये अथवा फडकलेल्या भडक रंगाच्या कापडामध्ये स्वारस्य का बरं असावं? अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून येणारा काळा की गोरा याची कसोशीने माहिती मिळवताना आपल्या देशाच्या सिंहासनावर कोण बसणार याची तमाही न बाळगणा-या आम्हा भारातीयांकाडून षंढपणापलीकडे कसली बरं अपेक्षा केली जावी?

व्यवस्थेकडे बोटं दाखवणा-या व्यक्तींना दोष देण्यापेक्षा तशी बोटं दाखवण्याच्या वृत्तीला दोष दिल्यास या व्यवस्थेमध्ये बदल घडून येऊ शकतील. अर्थात, दोष देण्यापेक्षाही बदल घडवण्यावर जोर दिला जाण्याची अधिक आवश्यकता आहे.

खरंतर, हे विचार लिहायला-वाचायला सोपे असतीलही; पण अनुसरण करायला ते नक्कीच सोपे नाहीत. कारण... बदल घडवून आणायचा, म्हणजे नक्की काय करायचं? हा मूलभूत प्रश्न आहे. पण तो दिशाहीनता दाखवतो! 'मी एकटा काय करणार?' ... हा प्रश्न निव्वळ मानसिक हतबलता व्यक्त करतो. व्यवस्था आणि समाज हे एकार्थी व्यक्तींवरच अवलंबून असतात. पण त्यात संघटनेला अधिक महत्त्व आहे. आता, रोज संध्याकाळी ६:३० वाजता भगव्या ध्वजासमोर 'दक्ष'(!) अवस्थेत प्रणाम केला, म्हणजे आपण 'संघटित' झालो का? या गोष्टीवर विचार आवश्यक आहे. काही लाख लोकांनी एखाद्या सकाळी 'माराथोन' म्हणून एकत्र धावलं म्हणजे समाज संघटित झाला नाही... किंवा व्यवस्था सबळ झाली नाही.

२६ नोव्हेंबर नंतर १५ दिवसांनी काही मेणबत्त्या लावून आपण फक्त आपल्या उदासीनतेचं जाहीर प्रदर्शन करत असतो. मुंबईच्या लोकल्समधील स्फोटांमध्ये जीव गमावणा-या हजारो निरपराधांना बर्षभराने श्रद्धांजली वाहून आपण आपल्यातील दुर्बलतेला चालना देत असतो. एवढंच काय पण, रस्त्यावर सुरु असलेली मारामारी चुकवून दुस-या बाजूने जाताना किंवा ती सभोवताली उभ्याने पाहताना आपण आपल्या निर्लज्जपणाचा कळसच करत असतो.

जेवढं द:ख त्या संकटांच होत नाही, त्याहून जास्त त्याला सामोरं जाण्याच्या आपल्या पद्धतीचं होतं. पण ही परिस्थिती बदलणार का? ... सध्यातरी या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच द्यावं लागेल. कारण सकारात्मक निकालांसाठी सकारात्मक पवित्रा आवश्यक असतो. आणि तो आपण घेणार कसा? ... इतर देशांमध्ये आपण जसे जबाबदार, सतर्क, शिस्तबद्धपणे जगतो, तसे जर आपण आपल्याच देशात जगलो, तर कदाचित हे शक्य होऊ शकेल. इतर देशांची संपन्नता ही त्या-त्या देशांच्या नागरिकांच्या वर्तणुकीवर अवलंबून असते. कदाचित आपल्या बेजबाबदार वर्तणुकीवरही ती तितकीच अवलंबून असते. याचाच अर्थ, आपल्या देशातल्या ज्या-ज्या गोष्टींना आपण नावं ठेवतो, त्या-त्या सुधारण्याची जबाबदारीही आपलीच आहे.

कोणाच्याही एकट्याच्या वागण्याने व्यवस्था सुधारणार नाही, हे मान्य; पण तसं वागल्यामुळे इतरांना दोष देण्याची नैतिक पात्रता योग्य वागणा-याला मिळेल तर जरूर! आणि या गोष्टीच्या जाणीवेतून इतरांनीही योग्य वागणूक अवलंबली, तर व्यवस्थाही सुधारू शकेल.

... आता, कदाचित हा लेख लिहायचा इथेच संपवून, तुमच्याच मनातले विचार वाचायला दिल्याचं श्रेय मी मिळवू शकेन. तसा तो वाचून तुम्ही त्या वास्तवाकडे पुन्हा एकदा सहजपणे दुर्लक्ष कराल, यातच या लेखाचं यशही लपलेलं आहे. कारण, आपल्यातील दुर्बलतेचं आणि बेजबाबदारपणाचं ते आणखी एक बोलकं उदाहरण असेल. पण वाचकांपैकी एखाद्यापर्यंत जरी या लेखाचा गाभा पोहोचल्याच त्याच्या कृतीतून दिसून आलं, तरी या लेखामागच्या विचारांचं नक्कीच सार्थक होईल. शेवटी काय हो... भ्याडपणातूनच आशावादाचा जन्म होतो. आणि मी पूर्णपणे आशावादी आहे. मात्र खरी भीती आहे ती, समाज संघटित नसल्याची; देश एकसंध नसल्याची; मनामनावर अजूनही राज्य करू पाहणा-या परक्या संस्कृतीची! ... आणि आज एका राज्यात राष्ट्रध्वजाव्यतिरिक्त फडकलेल्या गनिमी पारतंत्र्याची...!!!

- शेखर श. धूपकर

(Shekhar S Dhupkar)