Sunday, May 29, 2011

दर्शन

                कोल्हापूरची महालक्ष्मी हे आमचं कुलदैवत. महिलांना गाभाऱ्यात नसलेल्या प्रवेशावरून नुकत्याच झालेल्या गदारोळाने मन अगदी सुन्न झालं आणि देवीच्या दर्शनाला जायचं मी ठरवलं. खरंतर, या उद्विग्नतेचा, महालक्ष्मी आमची कुलदेवता असण्याशी काडीचाही संबंध नव्हता. आणि महिलांच्या प्रवेशाबद्दलच बोलायचं, तर त्यांना तो मिळत नसे, हीच माझ्यासाठी 'बातमी' होती.

                ... तर, मी गाडी काढली आणि तडक कोल्हापूर गाठलं. शुक्रवारचं ऑफिस उरकून निघालो असल्यामुळे रात्री उशीर झाला होता. त्यामुळे, आता सकाळीच दर्शन होणार, हे निश्चित होतं. अस्वस्थतेमुळेच असेल कदाचित पण शांत झोप लागली नाही आणि पहाटे पावणे-पाच वाजता मी मंदिरात प्रवेश केला.

                सकाळी खूप लवकरची वेळ असल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. मंदिराच्या कमानीत असलेली सुरक्षा यंत्रणा गाढ झोपेत होती. मी वाकून पहिल्या पायरीला स्पर्श केला आणि मंदिरात प्रवेशकर्ता झालो. वर्षानुवर्ष येऊनही आज मी महालक्ष्मीचं मंदिर नव्यानेच पाहत होतो. गर्दी नाही; रेटारेटी नाही; रांग तोडणा-यांना शिवीगाळ नाही; उकाड्याचा त्रास नाही की कसला वैताग नाही. देवळातले ते दगडी खांब आणि त्यांवरचं कोरीवकाम प्रसन्नपणे ती शांतता उपभोगत होते. तरीही मी नेहमीच्याच वाटेने गाभा-यापर्यंत पोहोचलो.

                दरभेटीत देवीच्या इथून होणा-या दर्शनापेक्षा आजचं दर्शन खूपच वेगळं असणार, हे तर निश्चित होतं. मी जोडलेल्या हातांनी गाभा-यासमोर उभा राहिलो आणि थबकलोच! पुन्हा पुन्हा डोळे चोळून आणि स्वत:ला चिमटे काढून पाहिलं; पण नाही... गाभा-यात महालक्ष्मीच नव्हती!!! मला काहीच समजेना! सकाळची पूजा करायला आलेले पुजारी महोदय आपली पूजा सवयीप्रमाणे उरकत होते. पण ते जिची पूजा करत होते; तीच तिथे उपस्थित नव्हती. माझी बेचैनी कमी होण्याऐवजी शिगेला पोहोचली. त्याच मन:स्थितीत मी प्रदक्षिणा घातली; आणि मंदिरातून बाहेर पडू लागलो.

                इतक्यात मला कसलीतरी कुजबूज कानावर पडली. देवळात भिंतीलगत अंधारात एक आजीबाई काहीतरी पुटपुटत असल्याची जाणीव मला झाली. त्या मलाच तर काही म्हणत नाहीत ना, अशी शंका येऊन मी त्यांची विचारपूस केली. 'हेच माझं घर' असं त्या म्हणाल्या. रोज लाखोनी लोकं दर्शनाला येतात; पण त्यांच्याकडे लक्ष गेलेला मी पाहिलाच होतो, असं त्यांना वाटत होतं.

                मला परत जाण्याची घाईही नव्हती आणि अस्वस्थता काही केल्या कमी होत नव्हती. त्यामुळे मी न ठरवताच त्या आजींपाशी जाऊन बसलो होतो. न राहवून मी जेव्हा 'आत देवीच दिसली नाही', असं त्यांना म्हणालो; तेव्हा त्या नुसत्याच हसल्या. खरं होतं म्हणा!!! माझ्या अशा बोलण्यावर थट्टेशिवाय कोणीही काय प्रतिक्रिया दिली असती... मी ही जरा वेळ शांतच राहिलो.

                काही वेळाने आजीबाईच म्हणाल्या, "विठू, साई, भवानी असे सगळेच असतात रातच्याला इथं. आम्ही तशा फारशा गप्पा मारत नाही; पण सगळ्यांचीच दु:ख एकमेकांना ठाऊक आहेत. बोलणार तरी काय? आणि कोणाला? ... तो साई... लई श्रीमंती पाहतोय. आयुष्यभर फकीर म्हणून जगला; आणि आता... आता सोन्याशिवाय काहीच पहायला मिळत नाही, म्हणतो. भवानेला दहा वेळा इचारलं, तर लेकरं भेटायलाच येत नाहीत, एवढंच बोलते. त्यातल्या त्यात विठूचीच परिस्थिती आमच्यात बरी! श्रीमंती नाही पाहिली त्यानं फारशी; पण दारिद्र्यातही पुष्कळ प्रेम मिळालं त्याला..."

                आजीबाई बोलत होत्या आणि मी मान डोलवत होतो. मधेमधे 'मी ऐकतोय' एवढं पटवून द्यायला हुंकार देत होतो. आजीबाईंना कदाचित बोलायला कुणीतरी हवं होतं; आणि मी 'आयताच गावल्यामुळे' त्यांना कंठ फुटला होता. मी मात्र अजूनही कसल्या तरी शोधात माझीच अस्वस्थता वाढवत होतो. बोलता बोलता आजीबाईंनी त्यांच्या हातातला अर्धा पेढा माझ्यापुढे केला; मी ही तो 'प्रसाद' म्हणून खाल्ला. पुन्हा त्यांच्या गप्पा आणि माझे हुंकार अशी जुगलबंदी काही काळ चालली.

                आता थोड्या वेळात उजाडणार, अशी जाणीव समोरच्याच झाडावरच्या चिमण्या करून द्यायला लागल्या होत्या. बाहेर कोणाची तरी चाहूलही लागायला लागली होती. 'आता आपण निघावं' असं मला वाटायला आणि अचानक आजीबाईंनी जागेवरून उठायला एकाच गाठ पडली. इतक्या वेळ अंधारात त्यांच्या चेह-यावरचे हावभावही नीटसे पहायला न मिळालेल्या मला त्यांनी नेसलेली हिरव्या रंगाची नेटकी साडी आश्चर्याचा धक्का देऊन गेली.

                "आताशा गर्दी व्हायला लागेल. मला जायला हवं.", असं काहीसं म्हणाल्या त्या. "तुझ्या सारखी खूप लेकरं येतात रोजच्याला; पण फारसं ध्यान मात्र कुणीच देत नाही", असा दिलासा त्यांनी पुन्हा एकदा मला दिला. मी ही त्यांच्या पायांना वाकून स्पर्श केला; तेव्हा "येत जा वरचे वर!", असं कळकळीनं म्हणाल्या त्या!!!

                मी पायात चपला घालेपर्यंत आजीबाई पुन्हा मंदिरात गेल्या होत्या. मी ही पुन्हा गाडीकडे वळालो. जेवणापर्यंत पुण्यात घरी पोहोचण्याचा हिशेब लावून मी दर्शनासाठी महादरवाजातून उलटा फिरलो आणि देवीला हात जोडून नमस्कार केला. महादरवाजातून थेट होणारं महालाक्ष्मीचं दर्शन मला सुखावून गेलं. इतक्या वेळची अस्वस्थता काहीशी कमी झाल्यासारखं वाटलं आणि मी एकदम गडबडलो.

                काही क्षण तिथूनच दर्शन घेत राहिल्यावर मात्र मी स्वत:शीच हसलो. हलक्या झालेल्या मनाने गाडीत येऊन बसलो आणि घराकडे निघालो. माझी नुसती अस्वस्थताच नाहीशी झाली नव्हती; तर तोपर्यंत न पडलेल्या कित्येक प्रश्नांची उत्तरं मिळाल्याची जाणीव मला झाली होती.

                पहाटे मला गाभा-यात देवी का दिसली नाही? तिने निघताना मला कसं काय दर्शन दिलं? आजीबाईंच्या नेटक्या हिरव्या साडीमागचं रहस्य काय? त्यांना नक्की कसली चिंता बोलकं करत होती? कुणाची तरी चाहूल लागताच त्या लगबगीनं मंदिराकडे का गेल्या? या प्रश्नांमध्ये 'त्या आजीबाई कोण होत्या?' या प्रश्नाचं उत्तर लपलेलं होतं. त्यांना रोज रात्री भेटायला येणारे विठू आणि साई हे पंढरपूर आणि शिर्डीचे होते, हे कोडंही आता उलगडलं होतं.

                एका अलौकिक समाधानाचा प्रत्यय मला जरी त्यावेळी येत होता; तरी एक खंतही जाणवत होती. आपण देवस्थानांकडे आज नक्की कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो? गाभा-यामध्ये खरोखरंच देवाने वास्तव्य करावं, इतकी प्रसन्नता असते का? 'देवावर श्रद्धा आणि त्याच्या अस्तित्त्वावर विश्वास ठेवतो', असं म्हणणारे किती जण देवाचं पावित्र्य जपतात? आपल्या आयुष्यात आदर्श जगतात?

                हे मला पडलेले प्रश्न आहेत; नव्हे... महालक्ष्मीने जाणीवपूर्वक विचारले आहेत. शोधुया सगळे मिळून त्यांची उत्तरं???