Monday, February 8, 2016

पुणे आणि पुणेकर 
- शेखर श. धूपकर

ब-याचदा 'पुणे' आणि 'पुणेकर' हा टीकेचा विषय असतो. 'पुणेरी पाट्या' या नावाखाली कुठलाही अतिस्पष्ट, उपरोधक अथवा खोचक मजकूर पसरवण्याचीही एक प्रथा सध्या रुजू झाली आहे. 'सदशिवपेठी' अशी एक सकारण पदवीही कित्येकांना दिली जाते. गंमत म्हणजे हा उपरोध करणारे जास्तीत-जास्त जण पुण्याबाहेरचे आणि तरीही येणकेणप्रकारेण पुण्याशी निगडीत असतात. मग उपरोधाची जबाबदारी फक्त पुणेकरांच्याच माथी का बरं मारली जाते? कदाचित हा वाहत्या मुळा-मुठेत हात धुवून घेण्याचा एक प्रयत्न असावा! बाकी, मुळा-मुठेला फारतर हात धुण्याएवढंच पाणी असल्यामुळे आणि त्यावरही वारंवार जलपर्णी साचत असल्यामुळे हा निव्वळ एक आड'मुठा' उपरोधच असावा!

मुळात, या पुण्यनगरीची अशी ओळख का व्हावी, हा पुण्यातल्या सम-विषम तारखांच्या पार्किंगइतकाच वादग्रस्त विषय आहे. कारण जगाच्या नकाशावर पुण्याला आज मोठं स्थान आहे. आता, तरीही पुण्यात पत्ता शोधणं हे फ़र्ग्युसन रस्त्यावर बुरखेधारी मुलींपैकी नेमकी आपली कन्यका शोधण्याइतकं कठीण आहे, ही बाब निराळी. पण न सापडणारे पत्ते हा दोष पुण्याचा नाहीच! जंगली महाराज रस्त्यावर उभं राहून 'जे. एम. रोड' शोधणा-यांना शोधूनही हाती लागेल ते काय? नारायण पेठेतून स्टेशनला जाताना 'शानिवारातून जा हो. बुधवाराची गल्ली टाळ' असा अनुभवी सल्ला ऐकल्यावर जर 'नक्की कसं जायचं' आणि 'कुठल्या वारी जायचं नाही' असले गावंढळ प्रश्न पडत असतील, तर तो पुण्याच्या पत्त्यांचा वाईटपणा ठरू नये. अहो! जिमखाना अस्तित्त्वात नाही म्हणून डेक्कनला 'गरवारे' म्हणणारे पुण्यात पत्ता काय शोधणार? आपल्या अज्ञानाचं खापर पुण्यावर न फोडणा-यांनीच पुण्यात बिनधास्त फ़िरावं.

बाकी पुण्यात बिनधास्त फ़िरायचं ते दुचाक्यांवर! पण कोथरुड-औंधकडच्या दुचाक्या ही "पुण्याच्या" व्हायला कधी कधी वेळ घेतात. त्या लक्ष्मी रस्त्यावर पोहोचताना शनिवारवाड्यापाशी किंवा विजय टोकिजपाशी पोहोचल्या की थबकतात. सौरभ गांगुलीने धावेचा कॉल कितीही विश्वासाने दिला असला, तरी दुस-या टोकाचा फलंदाज ज्या दुविधेत धाव घेण्यास सुरवात करे, तसली काहीशी अवस्था या दुचाकीस्वरांची या ठिकाणांवर होते. बाकी, पुण्यातल्या पेठांमधून बिनधास्त रपेट मारायला अतोनात आत्मविश्वास हवा. कारण ज्यावेळी तुम्ही रस्त्यावर लाल-हिरवे होणारे दिवे, 'मामा' नामक ट्राफिक पोलिस, रस्त्यावरची इतर वाहनं, कधीही रस्ता ओलांडणारे पुणेकर आणि कुठूनही आडवी येणारी कुत्री यांना पाहूनही न पाहिल्यासारखं करत गाडी पळवू शकता, तेव्हाच तुम्ही विना-परवाना पुण्यात गाड्या हाकण्याचा परवाना मिळवता. यानंतर ब्रेक ही तुमच्या वाहनाची एक निरुपयोगी बाब होऊन तुम्ही गाडी बिनधास्तपणे पळवू शकता. स्त्री-चालकांच्या मते देवाने शरीराला पाय जोडलेले असताना, गाडीला ब्रेकची तशी फ़ारशी गरज नसते. आणि अशी सगळी वैशिष्ट्य तुमच्यात असतील, तर तुम्ही 'पुणेकर' होण्यास पात्र आहात. 

इथे 'पुणेकर होणं' ही वारसाने, वास्तव्याने अथवा जन्माने येणारी बिरुदावली नाहीच मुळी! कुणीही पुणेकर होऊ शकतो. पु. लं. नी म्हटल्याप्रमाणे फक्त जाज्वल्य अभिमान हवा. पुणंही बाहेरच्यांना पुणेकर करून घेण्यास सदा उत्सुक असतं. जुनं आणि सनातन म्हणवलं, तरी ते बदलांसाठी कायम तयार असतं. मला सांगा, अप्पा बळवंत चौकाचा 'एबीसी' होऊ देणारं पुणं जुनाट कसं? गाडगीळ पुलाला 'झेड ब्रिज' या एकाच नावाने ओळखणारं पुणं सनातन कसं? दशकापूर्वी लहान मुलांसोबत कुटुंबांना बागडवणारी संभाजी बाग आज बालक्रीडा विसरून प्रणयक्रिडा अनुभवते, हा पुण्याच्या बदलाचा पुरावाच ठरवू नये का? त्यामुळे ऐतिहासिक पुण्याला विनाकारण हिणवण्याचा हा एक आपमतलबी प्रयत्न असवा.

याउलट पुण्याने जुन्या-नव्याची आदर्श सांगड नक्कीच घातलेली दिसते. ई-स्क्वेअरला गर्दी करणारं पुणं बालगंधर्वही 'हाऊसफ़ुल्ल' करतं. कुण्या 'के के' च्या 'झेड झेड' तालांवर थिरकणारं पुणं दरवर्षी 'सवाई गंधर्व'लाही उत्कट दाद देतं. जेवढा 'फिनिक्स मॉल' महत्त्वाचा, तेवढंच भारत नाट्य मंदीरही! बाकी जाऊ द्या, बुधवार पेठ आहे म्हणून पुण्यात मसाज सेंटर सुरूच झाले नाहीत की काय?

याहीपेक्षाही पुणं जेवढं कलासक्त आहे, तितकंच ते रसासक्तही आहे. 'पिझ्झा हट' दिवसाला जेवढ्या मिठ्या अनुभवत नसेल, त्यापेक्षा जास्त पंगती दुर्वांकूर दर तासाला उठवतं. नेवळ्यांची मिसळ जिथे काना-नाकातून धूर काढते, तिथेच सुकांता-श्रेयसचं गोडसर जेवणही मिटक्या मारत केलं जातं. जेवणानंतर 'शौकीन'ची पंधरापासून ते पाच हजार रुपयांपर्यंतची पानं तोंडं रंगवतात. सिंहगडावरचं पिठलं-भाकरी आणि मटका-दही कसंही असलं, तरी 'एक नंबर' म्हणत पुणं पोटभर जेवतं. विमाननगर, सेनापती बापट रस्ता आणि चांदणी चौकातल्या महागड्या खाणावळींमधे पुणं रात्रीचं जेवण तासंतास रिचवतं. हो ना! महागड्या झाल्या, म्हणून खाणावळींना 'हॉटेल्स' म्हणालं, तर ते पुणे कसलं? आता, गुडलक आणि वहुमन जर दशकानुदशकं इराण्यांची राहू शकतात, तर हॉटेल्स अजूनही खाणावळी का बरं नाही राहणार?

असॊ… माझ्या बोलण्यातला हा अभिमान मी पक्का पुणेकर असल्याची साक्ष देतो. तरीही मी पुण्यात आजवर 'पुणेरी पाट्या' इतक्या सर्रास पाहिलेल्या नाहीत, जितक्या त्या सोशल मिडियामधे फिरताना दिसतात. खवट माणसं काय फक्त पुण्यातच राहतात होय! पण पु.लंनी म्हटल्या प्रमाणे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान मात्र पुण्यातच होऊ शकतो. त्यालाही कारण आहे. अपमान सोडा, पण मुंबईकराला जिथे बोलायलाच वेळ नसतो, तिथे तो कुणाच्याही वाकड्यात तरी काय शिरणार? बाकी मुंबईकराची मराठी ही बहुभाषांचं मिश्रण आहे. तिकडे सांगली-कोल्हापूरची मराठी रांगडी. आणि त्या रांगड्या मराठीचा लहेजा तिला गोडवा देऊन जातो. पण या रांगड्या गोड मराठीतून व्यक्त होणारे अपशब्द पुण्याला खटकतात. विदर्भाची मराठी ही अखंड भारतात 'हिंदी' या नावाने ओलखली जाते. त्यामुळे पुणेकर त्यांना बाद ठरवतात. खानदेशी मराठी ही खानदेशाशिवाय कुणालाही समाजात नाही. मराठवाड्याच्या मराठीवर अजूनही निजामाचा परिणाम जाणवतो. त्यामुळे पुणं मराठवाड्याला आजही पाण्यात राहतं. उरलं कोकण! ते पुण्याला तोडीस तोड. हजरजबाबीही आणि अत्यंत खवटही! पण स्वत:चा चाराचौघाताला अपमान टाळण्यासाठी दोघंही एकमेकांशी सांभाळून राह्तात. पण या फ़रकांमुळे भाषाप्रभू पुणं इतरांना मान देत नाही; याचा त्यांना अपमान वाटतो, एवढंच!

आत्तापर्यंत इतिहास झाला, भाषा झाली, स्वभाववैशिष्ट्यही झाली; म्हणून भूगोलाबद्दल बोलायचंच, तर सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या पुण्याला सिंहगडाचे कडे लाभलेत. आजच्या तारखेला पुणं या कडे-कपारींपलीकडे कुशी ओलांडून सर्व दिशांना फ़ोफ़ावतंय. हा बदलणारा भूगोल आहे. तरी मुळा-मुठा आणि पवना-इंद्रायणी वाट मिळेल तशा पुण्यातून वाहतात. पर्वती, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, चतु:श्रुंगीच्या माथ्यावरून आजही पुष्कळ हिरवं पुणं पहायला मिळतं. तरी पुण्याला निष्कारण हिणवलं जातं; टोचलं जातं.

आज पाताळेश्वराच्या लेणी गुफ्तगू करणा-या होतकरू प्रेमियुगुलांना जागा देतात; म्हणून भाडं मागत नाहीत! पुणं दिलदार आहे. क्यांपातून हिंडताना आपण पुण्यात सोडा, पण नक्की 'भारतातच आहोत ना', अशी शंका यावी, अशी वेशभूषा दिसते. यात तोकड्या वेशाची भूषाच अधिक जाणवते; पण म्हणून पुण्यानं टोकाची भूमिका घेतली नाही. दुपारी आवर्जून झोपण्याची ओळख असलेल्या पुण्याच्या कित्येक भागांमधे माहिती-तंत्रज्ञानातल्या कंपन्या आज रात्रीही झोपत नाहीत. गि-हाइकाच्या तोंडावर दुकान बंद करणारे चितळे जितके किलो चक्का तासाभरात विकतात, त्याच्या कित्येक पटीने बाकरवडी विदेशात पाठवतात. आळशी दुकानदार इतकी प्रगती कशी करू शकेल? जुन्या वाड्यांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या टोलेजंग इमारती आज पुण्याचा विकास दाखवतात. नव्या शिक्षणसंस्थांसोबत जुन्या भावेस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, हुजूरपागा आणि नूमवि विद्यार्थी आजही तसेच घडवतात. हे घडलेले विद्यार्थी देशोदेशी कीर्ती मिळवतात, पण पुणं सोडत नाहीत. भले-भले 'पुणेकर' जगणं विसरत नाहीत.

थोडक्यात सांगायचं तर इतक्या अष्टपैलू पुण्याला आणि तितक्याच हरहुन्नरी पुणेकरांना अकारण हिणवणं असयुक्तिक आहे. अनादी काळापासून ज्ञानदानाचं कार्य अविरत करत आलेल्या या पुण्यनगरीला उणं असं काहीच नाही. हजरजबाबी आणि रोखठोक असली, तरी ही नगरी कधी आपल्या टिकेवर रुसली नाही किंवा ती करणा-यांवर हिरमुसली नाही. आपल्यातले बदल तिनं, जुनं टिकवत सुरूच ठेवलेत. आणि ती ते कायम ठेवेल. मुद्दा एवढाच की अशा गुणवान पुण्याची आणि पक्क्या पुणेकरांची मस्करी करतच रहायचं की त्यांचा कित्ता इतरांनीही गिरवायचा! ज्याचा त्याचा प्रश्न आहे… सच्चा पुणेकर स्पष्ट बोलतो, उपरोधही करतो; पण फुकट सल्ले देण्यात वेळ दवडत बसत नाही. असॊ… रविवार दुपारच्या वामकुक्षीची वेळ झाली असल्यामुळे मी आटोपतं घेतो.

धन्यवाद.

Monday, January 25, 2016

लग्न - एक चर्चा
                                                                                                                              - शेखर श. धूपकर

'लग्न' हा कायमच एक चर्चेचा विषय ठरत आलेला आहे. 'लग्न कसं करावं' यावर गहन चर्चा, 'कुणाशी करावं' यावर घरगुती चर्चा, 'कोणत्या पद्धतीनं करावं' यावर बौद्धिक चर्चा, 'कोणत्या मुहूर्तावर करावं' यावर शास्त्रपूर्ण चर्चा, 'किती खर्चात करावं' यावर व्यावहारिक चर्चा, 'करावं की करू नये' असली निरर्थक चर्चा…! एवढंच काय, पण 'लग्नानंतरचे परिणाम' वगैरे सापेक्ष चर्चा, 'नुकत्याच पार पडलेल्या  लग्नाबद्दल' आतल्या गोटातल्या चर्चा, 'मी तिला विचारायला जरा उशीरच केला', असली स्वगत चर्चा किंवा 'यांचं कसलं टिकतंय वर्षभर तरी!' यावर भविष्यवर्तक चर्चा… एकंदरीत काय, तर 'लग्न' म्हटलं, की चर्चा ही आलीच! इतिहासात डोकावून पाहिलं, तर पार पृथ्वीच्या जन्मापासूनच 'लग्न' हा चर्चेचा विषय राहिला असला पाहिजे. अखंड स्त्रीजातीसाठी तो फक्त विषयच नसून निमित्तही राहिला आहे. कारण अगणित चर्चांना तिथे वाव मिळतो. 'सासुबाई जरा खाष्टच दिसतात', 'जेवताना आम्हाला आग्रह करायला कुण्णी कुण्णी आलं नाही बुवा' किंवा 'जावयाच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली आहे की नुसतीच पातळ तार हो', 'अरे! तू ते हिरव्या घाग-यातलं पाखरू पाहिलंस का रे', 'ही दोघं अशी मिरवताहेत की लग्न नक्की कुणाचं आहे याबद्द्ल शंका वाटावी'… या आणि अशा कित्येक टोमण्यांनी चर्चा सुरु होतात; आणि सभागृह खाली करण्याच्या घंटेपर्यंत रुळ बदलत सुरूच राहतात.

इथे 'सभागृह रिकामी करण्याची घंटा' हा पुणेरी लग्नांमधला आहेराइतकाच महत्त्वाचा घटक आहे. ती टाळताही येत नाही आणि पाळतानाची कसरत चुकवताही येत नाही. मुळात 'पुण्याकडची लग्न' ही पुण्याइतकीच पुण्याबाहेरच्यांना टीकास्पद वाटतात. 'टेबलावर ठेवलेल्या रुखवताला' मराठवाड्याकडच्यांनी जर 'देवघेवीच्या वस्तू' म्हणून पाहिलं, तर कसं जमायचं हो? सांगली-कोल्हापूरकडून आलेल्या पाहुण्यांना पुण्याची लग्नं जेवणातल्या साखरेमुळे सपक लागतात. व-हाड-खानदेशकडे मिरवणूक आणि वरातीला जेवढं महत्त्व आहे, तेवढं पुण्यात वधु-वरांनाही नसतं!

बाकी, अखंड लग्नात वधुवरांना कोण मोजतं म्हणा! पुरेशा नोटा मोजून 'इकडे बघा' असं खेकसणा-या जन्माने पुण्याच्या फ़ोटोग्राफ़रला तेवढा त्या उभयतांमधे भलताच 'इंटरेष्ट' असतो. अल्बमकरता त्या द्वयांना व्यायामाचे जे धडे तो देत असतो, ते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या आप्तेष्टांच्या करमणुकीचा विषय ठरतात. एकदा पाठीला पाठ लावून एकमेकांच्या हातात हात घातलेल्या नवदाम्पत्याला फ़ोटो काढून झाल्यावर सोडवायला तिघांना बरेच प्रयत्न करावे लागल्याच्या उदाहरणाचा मी स्वत: साक्षिदार राहिलो आहे.

बरं… लग्नात केवळ फ़ोटोग्राफरच आक्रमक असतात असंही नाही. लग्न 'लावण्याची' मुख्य जबाबदारी ही गुरुजींची असते. शाळेत 'स्कोरिंग' साठी घेतलेली संस्कृत आणि लग्नात श्लोकपठण करणा-या गुरुजींची संस्कृत यात तेवढाच फरक आहे, जेवढा तो लग्नात मुलाकडच्यांनी केलेल्या मागण्या आणि मुलीकडच्यांनी त्या पुरवण्यामध्ये असतो.

या मागण्या खरंच गूढ असतात! 'आम्हाला काही नको' असं म्हणणारी मंडळी 'बरं झालं, आपण मंगळसुत्राबरोबर पाटल्याही केल्या; नाही तर ही अगदीच रिकाम्या हाती उभी राहिली असती' असं खुसपुसतात. 'मुलाला व्यसनं नसावीत' अशी अपेक्षा ठेवणा-या वधुपित्यांना कित्येकदा आपली कार्टी तिच्या ऑफिसच्या पार्टीमधे आचमनं करते, याची जाण नसते. अशा गोष्टींची ठोस अथवा अर्धवट माहिती असलेल्या आप्त-नातलगांना लग्नविधींच्या वेळी आपापसात किस्से सांगण्यात वेळ घालवता येतो.

लग्नविधी हे तर कित्येकांच्या वादाचाच मुद्दा असतात. मंगलाष्टकांनंतर अक्षता टाकल्या म्हणजे 'लग्नं लागलं' अशी उपस्थितांची समजूत असते. गुरुजी मात्र 'कन्यादाना'लाच 'लग्न' म्हणतात. सप्तपदी आणि फेरे हे करवल्यांनी नटखट हसत उगीचच एकमेकींना टाळ्या देण्यासाठी ठेवलेल्या पद्धती असाव्यात. वराने लग्नाच्या दिवशी वधूला सूर्य का दाखवायचा असतो आणि त्यानिमित्ताने प्रत्यक्षात ती दोघं आपापसात काय बोलतात, हे संशोधनाचे विषय ठरू शकतात. कित्येक विधींमधे फोटोग्राफर गुरुजींनाच मंत्र म्हणण्यापासून ब्रेक देतो. सूनमुखाच्या वेळी त्या आरशाचा कोन असा काही धरावा लागतो की ती वरमाय, गालातल्या गालात खुश होणारा तो वर आणि आरशात पहावं की पाण्यात, अशा गुंतागुंतीत अडकलेली ती सौभाग्यकांक्षिणी हे कोणाकोणाची नजर चुकवत असतात, कोण जाणे!

हे सगळे विधी उरकतात, अक्षतारुपी आशीर्वाद दिले जातात आणि मग सुरु होते, ती धावपळ! ही धावपळ म्हणजे खरोखर धावापाळच असते. प्रत्येकजण वधुवरांना भेटण्याच्या रांगेत जास्तीत जास्त पुढे पोहोचण्याचा आटापिटा करतो. त्यात अपयशी ठरणारे बरेच जण मग रांगेत पुढचा नंबर मिळवलेल्यांमधे आपल्या ओळखीचा मासा गळाला लावायचा प्रयत्न करतात. यातले काही जण अर्ध्या दिवसात लग्न आटोपून पुन्हा ऑफिसमध्ये हजेरी लावणार असतात; तर काही जण पुन्हा आतल्या गोटातल्या चर्चा पुढे सुरु ठेवणार असतात. बाकीचे सर्व जण मात्र वधुवरांना आशीर्वाद देण्याची औपचारिकता पूर्ण करून आपल्या जिभेचे चोचले पुरवायला जेवणात काय काय असेल, या विचारानेच आपली भूक वाढवत असतात.

तर अशी ही रांग आशीर्वाद देत आणि फ़ोटो काढून घेत जेवणाच्या पंगतीत परिवर्तीत होते. आणि मग निरोप घेऊन आपापल्या संसारात रुजूही होते. वधुवरांची पंगतही मग उखाणे घेत आणि घास भरवत पार पडते. पुढे लक्ष्मीपूजनानंतर विरहाश्रू अनावर  होतात. 'उद्या फोन करीनच' असं म्हणत मुलीची आई आपले डोळे पुसत, आपला मेकअप बिघडला तर नाही ना, याची हळूच खात्री करून घेते. मुलीचे वडील 'कार्टी सासरी काय दिवे लावते', या चिंतेने तिला घट्ट बिलगतात. वरमाय आजपासून आपली सुट्टी झाल्याचा आनंद स्तब्ध चेहे-याआड लपवून ठेवते. मुलाचे वडील 'दिवटं मार्गी लागलं', या समाधानात आपल्या सारखाच आता तोही संसारी झाल्याचे आविर्भाव व्यक्त करतात. स्वत: वधू परंपरेप्रमाणे रडत असते आणि आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय, याची कल्पना नसलेला नवरदेव आतल्या आत फुटत असलेले लाडू गिळून आपल्या विवाहीतेला धीर देत असतो.

हो! म्हणजे त्या भोळ्याला आपल्या भविष्याची जराही जाणीव नसते. युगानुयुगं चर्चा होऊनही कित्येकांना न सुटलेल्या या 'लग्न' नामक कोड्यात तो कसा  गुरफ़टणार, याचा अंदाजही त्याला आलेला नसतो. आणि आत्तापर्यंत आजूबाजूला होत असलेल्या चर्चा संपून आपण न संपणा-या संभाषणात भाग घेत आहोत; सुरु होण्यापूर्वीच वादात आपण यापुढे कायम शाब्दिक माघार घेणार आहोत, या वास्तवापासून तो अजूनही काही इंच दूर असतो. अर्थात, 'संसार' नामक एका अपरिचित आयुष्यात तावून-सुलाखून निघण्यासाठी तो जणू उडीच घेत असतो…