Sunday, August 28, 2011

"मी (विरुद्ध) अण्णा हजारे"

- शेखर श.धूपकर

        १५ ऑगस्टची 'सुट्टी' उपभोगून मी १६ तारखेला जेव्हा दूरदर्शन संच सुरू केला, तेव्हा 'अण्णा हजारेंच्या' अटकेची बातमी मेला समजली. मला रागच आला जरासा...; पण मग मी स्वत:ला शांत करत इतर कोणत्याही बातमीप्रमाणे ती ही पाहत चहा रिचवला. संध्याकाळपर्यंत मात्र माझ्यात जोष संचारला आणि मग 'मी अण्णा हजारे' लिहिलेली एक गांधीटोपी मिळवून मी माझ्यासारख्याच इतरांबरोबर 'रस्त्यावर उतरलो'.

        हा अनुभव वेगळाच होता. हो! म्हणजे दीडशे वर्ष आपल्यावर राज्य केलेल्या ब्रिटीशांच्या भूमीवर भारतीय क्रिकेटमधील वीर पानिपाताचा अनुभव घेत असताना देशातल्या रस्त्यांवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिरंगा फडकताना पाहणं, ही तशी ऐतिहासिक घटनाच होती. घटनेच्या त्या ऐतिहासिक मूल्यामुळेच असेल कदाचित; पण मला कसलं तरी स्फुरण चढलं होतं. ते देशभक्तीचंच असावं, असा तर्क लावून मी ही माझ्यासारख्याच इतरांनी दिलेल्या 'भारत माता की...' च्या घोषणेला 'जय' असं ओरडत होतो.

        त्या संध्याकाळच्या जोषामुळे आलेला थकवा नाही म्हणायला रात्री हाडांमधून जाणवत होता. निवांत झोप झाल्यावर मात्र अण्णांचा उपोषणाचा सुरु असलेला हट्ट पाहून मला पुन्हा जोम चढला. आज 'मी' कालच्या गांधीटोपीच्या जोडीला पांढराशुभ्र सदरा परिधान केला. ऑफिसातल्या आणखी चार-पाच जणांनाही 'मी' माझ्यासोबत 'रस्त्यावर ओढलं'. "जन लोकपाल" नामक कोण्या एका बिलाचं समर्थन आम्ही सगळे करत होतो.

        हे सगळंच इतकं सुखद होतं की, दिवसें-दिवस माझ्यातल्या देशभक्तीला निरनिराळ्या वाटा मिळू लागल्या होत्या. म्हणजे आज मेणबत्ती घेऊन मूक पदयात्रा, तर उद्या दुचाकीवरून फेरी; परवा भर चौकात धरणं, तर तेरवा मी चक्क दिल्ली गाठली. दिल्लीतलं वातावरण तर रोमांचकारी होतं. पहावं त्याच्या डोक्यावर गांधीटोपी आणि अंगात पांढरेशुभ्र सदरे! इथे कुणाला धर्म नव्हता की जात; भाषा नव्हती की प्रांत; पक्ष नव्हता की मतभेद! सगळेच भारतीय!!! अण्णांच्या नावाच्या या टोपीतली जादू ती घातल्याशिवाय अनुभवणं निव्वळ अशक्य आहे. 'मी अण्णा हजारे' या तीन शब्दांच्या उच्चारातली ताकदही ती न उच्चारलेल्याला कशी समजावी???

        'मी अण्णा हजारे' असं लिहिलेली ती टोपी डोक्यावरून काढून मी तिच्याकडे कुतूहलाने पाहू लागलो; आणि तेवढयात, विजेचा झटका बसावा, तसं माझं डोकं अचानक ठिकाणावर आल्याची जाणीव मला झाली. माझं कुटुंब, माझं ऑफिस, माझा पगार, तो वाढवण्याची माझी जिद्द, माझा आनंद, तो उपभोगण्याच्या माझ्या पद्धती या सर्वांची आठवण मला झाली आणि मी तडक घर गाठलं.

        दुसऱ्या दिवशी, डोक्यावर चढलेलं देशभक्तीचं खूळ (टोपीसकट) उतरवून मी दैनंदिनीत व्यस्त झालो. ऑफिसला जाताना झालेला उशीर कमी व्हावा, या प्रयत्नात कोणताही सिग्नल मी पाळला नाही. त्यापैकी एकावर वाहतूक-मामाने अडवल्यावर शंभराची नोट पटकन त्याच्या हातावर टेकवत मी केलेल्या चुकीची दुरुस्ती केली. (त्या नोटेवरच्या गांधींनीही त्यांची टोपी उतरवून ठेवलेली होतीच!) ऑफिसमध्ये पोहोचल्यावर पगार वाचवण्याच्या अपेक्षेने दोन(च) दिवस सुट्टी घेतल्याचा आव आणून उर्वरीत तीन दिवसांची रजा नोंदवली नाही. पुढे, परदेशगमनाच्या संधीच्या आनंदात, पासपोर्ट परीक्षणासाठी आलेल्या हवालदाराला दोनशे रुपयांची 'फी' मी 'खुशीने' दिली. परदेशाच्या प्रवासासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीवरचा कर चुकवावा, म्हणून त्या पावतीशिवायच खरेदी केल्या. दरवेळेप्रमाणे, नोंद नसलेल्या ग्यास-सिलिंडरसाठी तो आणून देणाऱ्या दूताचा खिसा मी 'तसाच' 'जड केला'... आणि, रात्रीच्या जेवणाच्या वेळी सरकारवर यथेच्छ टीका केली.

        थोडक्यात काय..., माझ्यातला 'मी' परत आल्याचा अनुभव घेत घेत देश, सरकार, व्यवस्था, यंत्रणा, जनता, भ्रष्टाचार (आणि बायको!) यांच्यावर तोंडसुख घेण्याचा परवाना मी परत मिळवला. बाकी, रात्रीच्या बातम्या पाहताना एक गोष्ट मला जरा खटकलीच... अण्णांची टोपी मात्र कोरीच होती!!!