Friday, January 14, 2011

जरा याद करो कुर्बानी....

माझा मित्र अमित मनोहर याने माकारासंक्रांतीच्या शुभेच्छा देताना २५० वर्षांपूर्वी याच दिवशी झालेल्या पानिपतच्या तुंबळ युद्धाची आठवण करून दिली. त्याच्या आवाहानाला प्रतिसाद म्हणून वाहिलेली ही आदरांजली... लांबलचक असली, तरी कृपया तीत सामील व्हा...


भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेल्या कित्येक सणांपैकी 'मकरसंक्रांत' हा एक! नोंद करून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, इतर सण हे तिथी (हिंदू कालगणने) नुसार साजरे होतात; पण 'संक्रांत' ही तारखे (जागतिक कालगणने) नुसार साजरी केली जाते. खरं पाहता, 'संक्रांत' हा फक्त भारतीय संस्कृतीशी निगडीत सणच नाही. दक्षिण अमेरिकेतील अतिप्राचीन मायन संस्कृतीतही सूर्याच्या मकर राशीत होणाऱ्या संक्रमणाला महत्त्व दिलं गेलेलं दिसून येतं. बाकी, लावणी - पेरणी - कापणी करणा-या शेतकऱ्याचा वर्षभराच्या मेहनतीनंतर उगवलेलं धान्य गोळा करण्याचा त्याचा हा दिवस!

या सगळ्या बरोबरच यंदाच्या संक्रांतीला ऐतिहासिक महत्त्वही आहे. मराठी भाषेत 'संक्रांत ओढवली' अथवा 'संक्रांत कोसळली' अशा आशयाच्या शब्दप्रयोगांचा जन्म होऊन आज २५० वर्षे पूर्ण झाली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपताच्या युद्धभूमीवर मराठ्यांनी पराभव पत्करला आणि अटकेपार पसरलेलं मराठा साम्राज्य, दिल्लीचं राजकीय तक्ख्त आणि अखंड भारताच्या अस्मितेवरच 'संक्रांत ओढवली'. पानिपताच्या रणभूमीवरचं ते युद्ध ही एखादी किरकोळ घटना नसून अखंड इतिहास होता.

या युद्धाची पार्श्वभूमी, संबंधित प्रत्येक घटना, निगडीत प्रत्येक व्यक्ती, खेळल्या गेलेल्या चाली, त्यांचे दूरगामी परिणाम आणि युद्धाचा निकाल हे सर्वच कांगोरे अतिशय आश्चर्यकारक आणि रोमांचकारी आहेत. महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष आमने-सामने उभ्या ठाकलेल्या दोनही बाजूंमध्ये परस्पर वैर असण्याचं काही कारणच नव्हतं. कोण्या नजीब खानाच्या सत्तेच्या हव्यासापायी अफगाण सेनानी अहमद शहा अब्दाली हिंदुकुश रांगा पार करून दिल्ली वर चाल करून आला. आणि इतर कोणीही त्याला दोन हात करायला समर्थ नसल्यामुळे दिल्लीला 'राजधानी' आणि अब्दालीला 'राष्ट्रसंकट' मानून पुण्याहून मराठे त्याच्या प्रतिकारासाठी उत्तरेला पोहोचले. एक प्रकारे हे युद्ध 'धर्म विरुद्ध राष्ट्र' असंही व्यक्त करता येईल.

भगव्या ध्वजाच्या अधिपत्याखाली या युद्धात मराठ्यांनी शौर्य गाजवलं खरं; पण अब्दालीच्या कपटाला ते पुरून उरलं नाही. कदाचित छत्रपतींच्या गनीमी काव्याचे पुरेसे धडे स्वाभिमानी पेशव्यांनी गिरवलेच नव्हते. त्यांना सामील झालेले सरदार हे निव्वळ देशभक्ती आणि मराठ्यांवर असलेली त्यांची निष्ठा या बाबींवर एकत्र आले होते. काही तर निव्वळ धाकामुळेही आले होते. त्यामुळे अब्दाली सारख्या मुरब्बी राजकारण्याचे डावपेच समजण्यास हे इतर सरदार असमर्थ होते. अधिक, त्यांचा स्वाभिमानही वेळोवेळी घातक ठरतंच होता. एवढंच कशाला, मोहिमेवर कूच करण्यापूर्वीची खुद्द शनिवारवाड्यातली खलबतंही स्वार्थ आणि घमेंडीने बरबटलेली होती. अटकेपार पराक्रम गाजवणारे राघोबादादा, पत्नी आनंदीबाईच्या शब्दांत गुरफटले. अब्दालीशी दोन हात करण्यासाठी अवास्तव फौज आणि अमाप पगार त्यांनी मागितला. अखेर नानासाहेबांना पेशव्यांचे दीवाण असलेल्या सदाशिव राव भाऊ आणि त्यांच्या दिमतीला कोवळा विश्वासराव पाठवावा लागला. युद्धात न उतरणा-या राघोबादादांमुळे अब्दालीच्या विजयाला एक प्रकारे सुरुवातच झाली होती.

पेशव्यांच्या मोहिमेची आखणीही जेमतेमच होती. गंमत म्हणजे, उत्तरेची मोहीम असल्यामुळे काशीयात्रा होईल, या कल्पनेने महाराष्ट्रातून बायका - पोरांसह कुटुंबच्या कुटुंब सोबतीला होती. सैन्यापेक्षा ही पिलावळ सांभाळणं जिकिरीचं काम होत होतं. थोडक्यात, युद्धावर निघालेल्या सैन्याइतकंच काशीयात्रेला निघालेल्या संप्रदायाचं स्वरूप त्या चळवळीला आलं होतं. या काफिल्याच्या राहण्या-खाण्याची सोय वाटेत लागणा-या गावांकडून अपेक्षित होती. त्यामुळे, काही ठिकाणी मराठी सैन्याचा जसा यथायोग्य पाहुणचार झाला, तशीच काही ठिकाणी आबाळही झाली. शिवाय मुला-माणसांबरोबर हत्ती, घोडे, गाय-बैल असा समुदायही होताच. सुमारे एक लक्ष सैन्य आणि तीस हजारांहून अधिक प्राणीवर्ग एवढा लवाजमा घेऊन पेशवे दिल्लीच्या दिशेने निघाले होते. चंबळचं खोरं आणि त्या पुढचा भूप्रदेशही मराठी सैन्याला नवखा होता. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि त्यांच्याशी झुंजण्यासाठी आवश्यक माहिती मराठ्यांकडे नव्हतीच!

याउलट जीवाच्या भीतीने स्थानिक अब्दालीच्या फौजांना, वाटेत, उत्तम पाहुणचार देत होते. जिथे तो मिळत नव्हता, तिथे तो लुबाडून मिळवण्याइतक्या अफगाण फौजा क्रूर नक्कीच होत्या. पोटातल्या भुकेपासून सर्व प्रकारच्या शारीरिक भुका भागवत दुराणी फौजा दिल्लीच्या दिशेने निघाल्या होत्या. वाटेत लहान-मोठे सरदार आपापल्या तुकड्यांसह येऊन त्यांना सामील होत होते. समृद्धीला कुठे तुटवडाच नव्हता.

इकडे, पंजाब प्रांतात कुंजपु-यापर्यंतचा प्रदेश अंमलात आणून मराठी सैन्याने दिल्लीच्या दिशेने मोर्चा वळवला. भर पावसाळ्यात वाट तुडवणं मराठी सैन्यासाठी त्रासदायक ठरत होतं. पावसाळा ओसरल्यावरही उत्तरेच्या नद्या दुथडी भरून बाहत होत्या. पंजाब जिंकून अब्दाली पाठीशी येऊन पोहोचल्याची वार्ता मिळाल्यावर मात्र भाऊ थबकले. त्यातच पुण्याहून युद्ध लवकरात लवकर उरकण्याचे सूचना वजा आदेश भाऊवरचा ताण वाढवत होते. अखेर अब्दालीला दिल्लीच्या वाटेवरच अडवण्याचा निश्चय करून भाऊंनी सोनपत - पानपतचा प्रदेश निवडला. भाऊंची ही चाल अब्दालीच्या चांगलीच पत्थ्यावर पडली. दक्षिणेला यमुनेच विस्तृत खोरं, पूर्वेकडे नजीब आणि शुजा उद्दौलाच सैन्य आणि पश्चिमेकडून खुद्द अहमद शहा अब्दाली अशा कात्रीत मराठी सैन्य सापडलं. आणि १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपताच्या त्या रणभूमीवर तुंबळ युद्ध सुरू झालं.

पराक्रमी पेशव्यांचा हल्ला दुराणी तोफांना नामोहरम करू लागला. इब्राहीम खान गारद्याच्या लांब पल्ल्याच्या शंभरांहून अधिक तोफा शत्रूला अक्षरश: भाजून काढत होत्या. नागपूरकर भोसल्यांच्या सहाय्याने पेशव्यांच्या तुकड्या अफगाण फौजेच्या नाकी दम आणत होत्या. मध्यान्हीच्या आसपासच अब्दालीच्या फौजांना आपला पराभव जाणवू लागला होता. पूर्वेला बडोद्याच्या गायकवाडांच्या आणि इंदूरकर होळकरांच्या तुकड्या शुजाशी लढा देत होत्या. ग्वाल्हेरचे शिंदे नजीब खानाच्या रोहिल्यांना घायाळ करत होते. नजीबाची भूतकाळातली फितुरी आणि आजच्या युद्धातला बचावात्मक पवित्रा शिंद्यांना आणखी हिंस्र बनवत होता. जिंकण्याची ईर्ष्या त्यांना आणि पर्यायाने गायकवाड-होळकरांना मुघल सैन्यात खोलवर घेऊन गेली आणि युद्धाचं पारडं फिरण्यास इथेच सुरुवात झाली.

शिंदे-होळकर घेरले गेले. तिकडे, गारद्याच्या प्रभावी परंतू अवजड तोफा हलवणे मुश्कील होत चालले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदाशिव राव भाउंनी आणि विश्वासरावांनी स्वत:ला युद्धात झोकून दिले. ते पाहाताच अब्दालीने आपल्या नव्या दमाच्या फौजा रणांगणात उतरवल्या आणि भाऊ तथा विश्वास मारले गेल्याची अफवा मराठा सैन्यात उठवून दिली. आधीच थकलेल्या मराठी सैन्याने ही बातमी ऐकून धीर सोडला. हातातली शस्त्र टाकून पराक्रमी सैन्याने पळ काढला. त्यामुळे चेव चढलेल्या दुराणी-मुघलांनी एकेक मावळा कापून काढला. भाऊ त्या धुमश्चक्रीत बेपत्ता झाले; तर विश्वासाराव मारले गेले. कित्येक महिन्यांची मेहनत काही तासांत वाया गेली आणि मराठी साम्राज्य, हिंदुस्थानी तख्त तथा देशाची एकात्मता यांवर संक्रांत कोसळली.

जरी हा पराभव जिव्हारी लागणारा असला, तरी हा इतिहास बोलका आहे... खूप काही सांगून जाणारा आहे. नफा-तोट्याचा हिशेब मांडायचा झालाच, तर अमाप तोटा आणि माफक नफाही त्यातून हाती लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अखंड हिंदुस्थान एका ध्वजाखाली एकत्र आला होता. त्या आधीच्या कित्येक शतकांत असं घडलं नव्हतं! काहीही संबंध नसताना पेशवे पुण्याहून निव्वळ राष्ट्र-संरक्षणासाठी दिल्लीच्या मदतीला धावले ... महाराष्ट्राच्या घराघरातून बाल-तरुण-वृद्ध या मोहिमेवर गेले... त्यांनी आपल्या छात्यांचे कोट केले... प्राणांच्या आहुती दिल्या... मोहिमेवर जाताना वाटेत कोणतेही अत्याचार केले नाहीत. आपापसातले वाद-विवाद विसरून अथवा तात्पुरते बाजूला ठेवून शत्रूशी प्रतिकार केला...

इतिहासकारांच्या मते यमुनेच्या काठी अब्दालीची वाट पाहणारं मराठा सैन्य बारा किलोमीटर लांब पसरलं होतं. घरा-घरातून त्या रणभूमीवर लढायला गेलेली ही राष्ट्रनिष्ठा नक्कीच बरंच काही देऊन जाणारी आहे. आणि हे युद्ध इतकं घनघोर होतं की, मराठ्यांनी सत्तर हजारांहून अधिक सैन्य गमावलं खरं; पण अब्दालीला त्यानंतर पुन्हा तो भारतात येऊनही जिंकण्याची ताकद शिल्लक ठेवली नाही. संस्कृती आणि देशाच्या बचावासाठी धावून गेलेल्या त्या विविध जाती-पंथ-धर्मातील लोकांना आज आपण आदरांजली वाहूया.

इथे आदरांजली म्हणजे मौन किंवा अश्रूंची अपेक्षा नाही; तर त्याच संस्कृतीचे आणि त्याच राष्ट्राचे घटक म्हणून आपणही आपल्यातल्या जाती-पंथ-धर्मांना तिलांजली देऊन एकत्र येऊया. आपल्याला युद्ध करण्याची गरज नाही किंवा प्राणांची आहुती देण्याचीही नाही; पण देशाची एकात्मता आणि अस्मिता अबाधित राखण्यासाठी आपण एकसंध तरी राहू शकतो!!!

- शेखर श. धूपकर