Saturday, April 4, 2020

कोरोना विरोधात दिवे का लावायचे???


कोरोना विरोधात दिवे का लावायचे???
                                                           - शेखर श. धूपकर

आपण भारतीय कायमच बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध राहीलेलो आहोत. ह्या बुद्धिमत्तेने आपल्याला खुल्या केलेल्या वेगवेगळ्या उद्योगांमधील संधींचं आपण सोनंही करत आलेलो आहोत. पण ही बुद्धिमत्ता दुधारी तर नाही ना ठरणार, असा प्रश्न मला गेले काही दिवस पडू लागला आहे.
समस्त जगाला सध्या जेव्हा कोरोनाने घरी बसवलं आहे, तेव्हा तर आपल्या बौद्धिक विचारांना आणखीनच चालना मिळाली आहे. आणि सोशल मीडियाने त्या विचारांना एक खुलं व्यासपीठ दिलंय; ज्यामुळे प्रत्येकाचे विचार आणि प्रत्येकाच्या प्रत्येक विचारावर इतर प्रत्येकाचा वैचारीक उहापोह ह्याने तयार झालेल्या शृंखला कोरोनापेक्षाही जास्त गतिमान आणि धास्तावणाऱ्या ठरत आहेत.
माननीय पंतप्रधान मोदींनी दिवे मालवून लावायल्या सांगितलेल्या दिव्यांचा प्रकाश तर कित्येकांच्या डोक्यात इतका मोठा अंधार करून गेलाय की त्या अंधारात कोरोना टिकून राहणं अवघड होऊन बसलंय. काही जण ज्योतिषशास्त्राचा आधार घेत आहेत; तर काही जण संख्याशास्त्राचे दाखले देत आहेत. काहींना ह्यामध्ये अफाट आणि प्राचीन संस्कृती दिसते; तर काही जण त्याचा संबंध थेट ग्रह ताऱ्यांशी लावून मोकळे होतात. आणि मग ह्यावर विविधांगी विवाद सुरू होतात. त्यातून आधुनिकतेचा बडगा व्यक्त करणारे ही काही कमी नाहीत. अचानक दिवे बंद केल्यामुळे विद्युत भारनियंत्रणाची कशी तारांबळ उडेल, हे पटवून देणारेही काही निघाले. त्यांना 'अर्थ अवर'चा विसर पडला असावा. किंवा, दिवे बंद करायचे म्हणजे पंखे, फ्रीज आणि इतर उपकरणं बंद होण्याचा प्रश्न येत नाही, हे त्यांच्या लक्षात येत नसावं.
काहीजणांनी ह्या आवाहनाला सरळ सरळ मुर्खपणाचं ठरवून इतरही कोणी हे करणार नाही, असा निकाल देऊन टाकला. काहींना ह्यात 'आधी ध्वनी, आता प्रकाश' अशी श्रुंखला दिसली. ह्यावर होत असलेले उहापोहही अत्यंत वैचारीक भासतात.
एवढे सगळे विचार व्यक्त होत असताना फक्त माझीच बुद्धिमत्ता कमी दिसेल किंवा दिसणारच नाही, ह्या भीतीपोटी मी ही माझा विचार व्यक्त करायचं ठरवलं आहे. मोदीजी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान आहेत. त्यांनी जो काही विचार करून हे आवाहन केलं आहे, त्यावर उलटसुलट चर्चा न करता आपल्या नेत्याने सांगितलं आहे एवढ्याच कारणाने आपण ही क्रिया करू शकत नाही का? बरं; त्यातूनही, ज्यांना हे करायचं नाही, त्यांनी हे करू नये; आणि शांत बसावं. हवं तर घरातले दिवे सुरू ठेवून आणखी लावावेत. पण देशाच्या पंतप्रधानाला खरंखोटं ठरवण्याच्या नादात, सांगितलेल्या वेळेच्या आधी आणि नंतरचे दोन दिवस आपल्या अकलेचे तारे तोडणं किंवा प्रकाश पाडणं, ह्यामधे दवडू नयेत. पटलं तर करावं आणि नाही पटलं तर सोडून द्यावं. आपली अफाट बुद्धिमत्ता देशाच्या पंतप्रधानांची वैचारीक पातळी काढण्यासाठी किंवा पटवण्यासाठी खर्चू नये.
ही आपली माझी एक विनंती. न पटल्यास, ती ही सोडून देता येईलच किंवा ह्यावरही चर्चा करता येईलच! 😊

- शेखर श. धूपकर