Sunday, May 27, 2012

जुनं ते...

(सुमारे वर्षभरापूर्वी 'अण्णां'वर एक लेख लिहिला होता. काम, अभ्यास, संसार आणि या सगळ्यांहून महत्त्वाचा म्हणजे आळस या कारणांमुळे त्यानंतर माझ्याकडून लेख लिहिलाच गेला नव्हता. पण मी लेख लिहावा, म्हणून मला प्रत्यक्ष, फोनवर किंवा ईमेलवर उद्युक्त करणा-या सगळ्यांच्या इच्छेला मान देऊन आज पुन्हा एकदा प्रयत्न करतो आहे. माझ्याकडून असेच आणि अधिक चांगले लेख लिहून घेण्याची जबाबदारी तुम्हा वाचकांची आहे. वाचत रहा. धन्यवाद!)


परवाच्या रात्री एका हॉटेलमध्ये 'मित्र-परिवारांसोबत' सहभोजनाचा आनंद घेत होतो. सुमारे सव्वा वर्षापूर्वी माझे 'दोनाचे चार' झाल्यापासून 'मित्र-परिवार' या शब्दद्वयीची व्याख्या जरा बदललीय. मित्रमंडळी किंवा मित्रमैत्रिणी इतकी साधीसरळ न राहता, ती व्याख्या आता 'केवळ परिवार असलेले मित्र' इतकी व्यापक झाली आहे. हो! म्हणजे 'काळ बदलला'चा अर्थ जसा 'काळानुरूप सगळं म्हणजे सगळं इकडचं तिकडे झालं' इतका व्यापक आहे, तितकाच तो बदलही व्यापक असतो. आणि नव्या काळातले असे बदल आपल्याला जुन्या काळाच्या आठवणींनी भावूक करत असतात

...असो! तर, आम्ही सहभोजनाचा आनंद लुटत होतो. एवढ्यात पलिकडच्या टेबलावर कोण्या अज्ञात भोजकाचा भ्रमणध्वनी खणखणू लागला. तो घंटाध्वनी अर्थात रिंगटोन परिचयाचा वाटून मेंदू जुन्या आठवणींच्या फडताळात शिरला. क्षणार्धातच मेंदूने आपण (अजूनही!) तरुण असल्याची खात्री करून देत या शोधाचा छडा लावला. कोण्या एकेकाळी दूरदर्शनवर लागणा-या संध्याकाळच्या सात वाजताच्या बातम्यांची शीर्षक-धून होती ती!

आता, खरंतर सातच्या 'त्या' बातम्या अजूनही प्रदर्शित होत असतीलही; पण 'दूरदर्शन' एवढी एकच वाहिनी असण्याचा जमाना गेला आता. ... असेच घडतात बदल! आणि आपण खापर फोडतो काळावर! तो बदलत नाहीच; बदलतो आपण आणि म्हणतो, "काळ किती बदलला!"!

तर, त्या रिंगटोननी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि तशी ती देतच राहिली. त्या काळात दूरदर्शन संचाला 'रिमोट कंट्रोल' नसे. अर्थात, निव्वळ आवाज कमी-जास्त करण्यासाठी त्याची गरजही भासत नसे. विविध वाहिन्यांवरून सासू-सुना (आणि आई-बहिणी!) काढण्याइतका जमाना पुढारलेला नव्हता तेव्हा. एकच वाहिनी, ती ही चोवीस तासांसाठी नाही, आणि त्यावर निखळ मनोरंजनाचे माफक कार्यक्रम, एवढीच दूरदर्शनची व्याप्ती होती. दर रविवारचा सिनेमा हे तर प्रमुख आकर्षण! बाकी रविवारी सर्वजण सकाळपासूनच दूरदर्शनसमोर बसत. बदललेल्या जमान्यात सध्या हे रोजचंच चित्र आहे. सुंदर गाण्यांच्या मोहक 'रंगोली'ने आणि रंगोलीचं सूत्रसंचालन करणा-या त्याहून अधिक मोहक हेमा मालिनीने रविवार उजाडत असे. नविन जमान्याला आश्चर्य वाटेल कदाचित, पण हेमा मालिनीची मोहकता आणि सौंदर्य तिच्या चेह-यावर  एकवटलेलं होतं. सहावारी साडीने संपूर्ण शरीर झाकल्यावर त्या पलिकडील मोहकतेला पुरेसा वाव मिळत नसावा कदाचित! बाकी त्यातली गाणीही काव्याला आणि संगीताला पूरक अशी असत. स्त्री-कलाकाराच्या कमीत-कमी कपड्यांत कवीच्या प्रतिभेचा तोकडेपणा झाकण्याचा प्रयत्न तेव्हा होत नसे. किंवा सर्वसामान्यपणे गाण्यांच्या चित्रीकरणांमधे त्या स्त्री-कलाकारांनीही आपली अब्रू स्वत:हून वेशीवर टांगून दिलेली नसे.

...असो! पुढे नाश्त्याला चार्ली चाप्लीन, लॉरेल-हार्डी, एखाद दोन कार्टून्स सोबतीला असत. अर्थात, देवादिकांना अकरा-बाराच्या सुमारास 'रामायण-महाभारता'तली पात्रे सादर करायची असल्यामुळे गणेश, हनुमान, भीम आदींनी स्वत:ची कार्टून्स होऊ दिलेली नव्हती. दुपारच्या जेवणानंतर एखादा मनोरंजक चित्रपट म्हणजे कुटुंबासाठी मेजवानी असे. हो! तेव्हा चिल्या-पिल्यांसोबत आणि आजी-आजोबांनाही रुचतील असेच चित्रपट प्रदर्शित होत असत. कुटुंबाची पांगापांग करण्याची वेळ आणणारे चित्रपट 'जुन्या' काळी सर्रास प्रदर्शित होत नसत.

तसा, जमाना झपाट्याने बदलण्यात दूरदर्शनच्या संचाने मोठा हातभार लावला असला, तरी जमान्यात झालेले बदल हे केवळ 'दूरदर्शन' या एकाच परिमाणावर मोजणं असयुक्तिक ठरेल. दैनंदिनी, सवयी, गरजा, छंद, आवडी-नावडी, उपलब्धता या बरोबरच चंगळवादाच्या व्याख्याही बदलत्या काळाने बदलून टाकल्या. 

दोन दिवस पाणी न आल्याने झालेला नाईलाज किंवा बाबांना कामाच्या ठिकाणी मिळालेली बढती यापलिकडे कोणत्याही कारणास्तव लहानपणी हॉटेलमध्ये जेवल्याचं मला आठवत नाही. आठ आण्यांची मेलडी किंवा फार तर फार तीन-चाकी सायकल ही घराबाहेर पडल्यावर बाबांकडे करण्याच्या हट्टाची परिसीमा होती. बाकी, 'आठ आणे' ही सुद्धा आठवणीत जमा झालेली एक बाब होऊन बसली आहे. कामावरून घरी येताना बाबांनी बांधून आणलेले प्रत्येकी दोन बटाटेवडे ही बालपणीच्या अत्यानंदाची ओळख होती.

अरुंद आणि कधीकाळी बांधलेले रस्ते, त्यावरून क्वचित कधीतरी फेरफटका मारणारी एस.टी.ची लाल बस, श्रीमंतांच्या सोयीसाठी इकडून-तिकडे करणा-या रिक्षा ही दळणवळणाची व्याख्या होती. कुटुंबात प्रत्येकी एक याप्रमाणे वाहनं बाळगणा-या आजच्या जमान्याला हा इतिहास कदाचित फारसा रुचणार नाही. घरात दूरध्वनीचीच जिथे वानवा, तिथे शाळकरी पोराकडे मोबाईल कुठून येणार?

शाळेत किंवा पुढे महाविद्यालयातही मुलांना फक्त मित्र आणि मुलींना फक्त मैत्रिणीच असत. गर्लफ्रेंड नसलेल्या दोघांना नाईलाजाने एकमेकांची सोबत तेव्हा द्यावी लागत नसे. परीक्षेचा निकाल, इतर एखादं यश किंवा मनाला लागलेली एखादी गोष्ट व्यक्त करण्याचं पाहिलं ठिकाण म्हणजे 'आई' असे. आपल्याला मिळालेल्या कोणत्याही भेट वस्तूवर आपल्या इतकाच आपल्या भावंडांचाही हक्क असे; आणि ती भेटवस्तू म्हणजे सामान्यात: खाऊच असे.

दुपारची झोपमोड करायला येणारा पोस्टमन आणि त्याने आणलेलं पत्र राग आणि वैतागापेक्षा आकर्षणाचे विषय होते. संध्याकाळचा तास-दीडतास हा मैदानावर थकून परत येण्यासाठी राखीव ठेवलेला असे. वाढदिवसाच्या दिवशी औक्षवण आणि आईने घरी केलेलं पक्वान्न ही तो दिवस साजरा करण्याची ज्ञात पद्धत होती. दिवे मालवून, मेणबत्त्या फुंकून अंधार करण्याऐवजी तुपाच्या निरांजनाचा प्रकाश वाढदिवसाचं मुख्य प्रयोजन होता. मैत्रीदिन, प्रेमदिवस, रोज डे असल्या संकल्पना तेव्हा अजून जन्म घ्यायच्या होत्या. रक्षाबंधनाला आवर्जून सुट्टी घेण्यापेक्षा शाळेत आपल्या हातावर किती जास्त राख्या आहेत, हाच स्पर्धेचा आणि अभिमानाचा भाग होता.


घरांच्या किमती,  पगारांच्या रकमा, सोन्या-चांदीचे भाव, पेट्रोल-डिझेलचे दर, नविन कपडे घरात येण्याची कारणं आणि त्यांच्या किंमती, मुंबईच्या लोकलची गर्दी, मुलींच्या अंगप्रदर्शनाचं प्रमाण, घटस्फोटांचे दर या आणि अशा कित्येक परीमाणांमध्ये पडलेल्या फरकाचा परिणाम बदललेल्या जमान्यात झालेला दिसतो. काळानुरूप झालेले हे बदल योग्य की अयोग्य अथवा आवश्यक की अनावश्यक हा निराळा विषय होऊ शकतो. पण असे बदल घडत राहतात आणि भविष्यातही ते दिसून येणारंच! महत्त्वाचा भाग असा आहे की, मोबाइलच्या 'त्या' रिंगटोनसारखं एखादं कारण आपल्याला आपल्यातच झालेल्या बदलांकडे वळून पाहण्यास उद्युक्त करतं; आणि भूतकाळाच्या त्या अलबमवरून अशी नजर फिरवून झाल्यावर स्मिताहास्याबरोबर आपल्या ओठांतून शब्द बाहेर पडतात... "काळ किती बदलला; नाही!!!"