Sunday, September 29, 2019

चिरतरुण सहजीवन

                                                              - शेखर श. धूपकर

खिडकीलगतच्या टेबलावर, कोपरावर हलका जोर देत आणि हनुवटी मुठीवर टेकवून आजोबा, आजीकडे एकटक बघत बसले होते. आजी मात्र डोळे मिटून स्वतःच्याच विश्वात रमल्या होत्या. आजोबांना वाटलं, जुनी गाणी गुणगुणत असेल कदाचित. पण आजी मात्र 'हा चावट माणूस विशीतही असाच बघायचा माझ्याकडे!', या चिंतनात स्तब्ध होत्या. हो! कारण त्या तेव्हा जशा लाजायच्या, तशाच आजही... त्यामुळे डोळे मिटून, त्या आजोबा झोपायची... किंवा पेंगायची वाट बघत गालातल्या गालात हसत होत्या.

खरं तर, यात फारसं नवीन असं काहीच नव्हतं. दुपारच्या जेवणानंतर शतपावली झाली की दोघांच्याही दिनाक्रमाचा आवडता वेळ होता हा! आजोबांनी निवृत्ती घेतली, तेव्हा आजींनी आपलं आयुर्वेदालय सुरू ठेवलं होतं. पण मुलीला नोकरी लागल्यावर तिनं हट्टानं दोघांनाही घरी बसवलं. साधारण  तेव्हापासून दोघांनी हा शांत संवादाचा प्रेमळ वेळ रोज जपला होता.

मानसीचं लग्न झाल्यापासून तसंही दोघांचं दैनंदिन जग एकमेकांपुरतंच मर्यादीत राहीलं होतं. पण दोघंही सुखी आणि आंनदी होती. दोघांनाही कसलीही व्याधी नव्हती; दुखणी नव्हती; की पथ्य नव्हती. त्यामुळे वर्तमानपत्र आधी कुणी वाचायचं, चहा आज कुणी करायचा, ज्येष्ठ नागरीक संघातल्या विवाद स्पर्धेत कुणाची बाजू अधिक दमदार होती, माधुरी जास्त सुंदर की गोविंदा अधिक पाचकळ, या आणि असल्या अनेक मतभेदांनी त्यांच्या भरलेल्या ताटात चटणी-लोणच्याची जागा घेतली होती. फारच विकोपाला जाणारी समस्या म्हणजे आईस्क्रीमचे फ्लेवर्स!!!

वस्तुतः, आजी-आजोबांच्या ह्या चिरतरुण सहजीवनाला, आयुष्यभर घट्ट दिलेल्या साथीचं तगडं पाठबळ होतं. कशाची कधी फारशी कमी नसली, तरी दोघांनीही वैयक्तिक उन्नतीसाठी खूप मेहनत घेतली होती. ती तशी घेताना आपल्यापेक्षा जास्त, आपल्या सहचाऱ्याला महत्त्व दिलं होतं. त्यामुळे पूरक विश्वास आणि सहचर्याच्या जोरावर उभयता आज मानाजोगतं आयुष्य जगत होते.

त्यांच्या ह्या रुळलेल्या दैनंदिनीत संध्याकाळचा फेरफटकाही न चुकणारा! घराबाहेर पडलं की दोन पावलं पुढे राहणारे आजोबा ज्या दिशेला निघतील, तिकडे आजींचीही पावलं वळतात. आजोबांच्या कधीकधी एकदम लक्षात येतं; आणि ते क्वचित थांबून आजींना सोबत येऊ देतात. आजी मात्र बऱ्याचदा स्वतःहूनच संथ पावलं टाकतात आणि आजही खात्री करून घेतात, की 'म्हातारा आपल्याला विसरला तर नाही ना!'. आजींच्या असल्या खोडसाळपणाला त्यांच्या लग्नाच्या आसपासचा काळ थोडा कारणीभूत होता. बाहेर पडले की तरुणपणीचे आजोबा तरातरा पुढे निघून जात. आजीच मग त्यांना हाक मारून किंवा तोंड फुगवून मागे ओढत. आजही आजोबा कायम दोन पावलं पुढेच असतात; पण त्यांना हाकेची गरज पडत नाही.

हा फेरफटका मारून येताना, परतणीच्या वाटेवर, पाणीपुरीवाल्याकडे बघून न बघितल्यासारखं करणाऱ्या आजींना, "चल, आज एकेक खाऊच!" म्हणत आजोबा अधूनमधून घेऊन जातात. "कॉलेजमधे असताना रोज संध्याकाळी खायचीस!" असं म्हणत ते आजींना वर आणखीन ऐकवतात. आजींना मात्र कोलेजमध्येही पाणीपुरीशी मतलब असे; आणि आजही ह्यांचे टोमणे फारसं परावृत्त करू शकत नाहीत.

चिंचेच्या आंबटगोड चटणीतला तो हवाहवासा वाटणारा चटकारा दोघांनीं आयुष्यात कित्येकवेळा अनुभवला होता. तिखट चटणी जशी चव यावी आणि आपल्यालाच वाटावं म्हणून थोडीशी घ्यावी; तशाच नको त्या आठवणी त्यांनी तोंडी लावायलाच ठेवल्या होत्या. थोडक्यात काय, तर पाचसहा दशकांच्या सहवासाने आजी-आजोबांचं सहजीवन हे एकमेकांवरच्या विश्वासाने चांगलंच मुरलं होतं आणि त्याने त्यांच्यामधल्या प्रेमाला विविध पैलूही दिले होते.

"तू डोळे मिटून त्या सेकंड ईयरच्या प्रणालीलाच आठवतोस ना रे अजून?", ह्या प्रश्नाने डुलकी तुटलेल्या आजोबांची एकदम हनुवटी सरकते आणि ते पटकन आजींना उतरतात, "छे गं! प्रणाली नव्हे... माया ती, माया...!"

- शेखर श. धूपकर