Monday, January 25, 2016

लग्न - एक चर्चा
                                                                                                                              - शेखर श. धूपकर

'लग्न' हा कायमच एक चर्चेचा विषय ठरत आलेला आहे. 'लग्न कसं करावं' यावर गहन चर्चा, 'कुणाशी करावं' यावर घरगुती चर्चा, 'कोणत्या पद्धतीनं करावं' यावर बौद्धिक चर्चा, 'कोणत्या मुहूर्तावर करावं' यावर शास्त्रपूर्ण चर्चा, 'किती खर्चात करावं' यावर व्यावहारिक चर्चा, 'करावं की करू नये' असली निरर्थक चर्चा…! एवढंच काय, पण 'लग्नानंतरचे परिणाम' वगैरे सापेक्ष चर्चा, 'नुकत्याच पार पडलेल्या  लग्नाबद्दल' आतल्या गोटातल्या चर्चा, 'मी तिला विचारायला जरा उशीरच केला', असली स्वगत चर्चा किंवा 'यांचं कसलं टिकतंय वर्षभर तरी!' यावर भविष्यवर्तक चर्चा… एकंदरीत काय, तर 'लग्न' म्हटलं, की चर्चा ही आलीच! इतिहासात डोकावून पाहिलं, तर पार पृथ्वीच्या जन्मापासूनच 'लग्न' हा चर्चेचा विषय राहिला असला पाहिजे. अखंड स्त्रीजातीसाठी तो फक्त विषयच नसून निमित्तही राहिला आहे. कारण अगणित चर्चांना तिथे वाव मिळतो. 'सासुबाई जरा खाष्टच दिसतात', 'जेवताना आम्हाला आग्रह करायला कुण्णी कुण्णी आलं नाही बुवा' किंवा 'जावयाच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली आहे की नुसतीच पातळ तार हो', 'अरे! तू ते हिरव्या घाग-यातलं पाखरू पाहिलंस का रे', 'ही दोघं अशी मिरवताहेत की लग्न नक्की कुणाचं आहे याबद्द्ल शंका वाटावी'… या आणि अशा कित्येक टोमण्यांनी चर्चा सुरु होतात; आणि सभागृह खाली करण्याच्या घंटेपर्यंत रुळ बदलत सुरूच राहतात.

इथे 'सभागृह रिकामी करण्याची घंटा' हा पुणेरी लग्नांमधला आहेराइतकाच महत्त्वाचा घटक आहे. ती टाळताही येत नाही आणि पाळतानाची कसरत चुकवताही येत नाही. मुळात 'पुण्याकडची लग्न' ही पुण्याइतकीच पुण्याबाहेरच्यांना टीकास्पद वाटतात. 'टेबलावर ठेवलेल्या रुखवताला' मराठवाड्याकडच्यांनी जर 'देवघेवीच्या वस्तू' म्हणून पाहिलं, तर कसं जमायचं हो? सांगली-कोल्हापूरकडून आलेल्या पाहुण्यांना पुण्याची लग्नं जेवणातल्या साखरेमुळे सपक लागतात. व-हाड-खानदेशकडे मिरवणूक आणि वरातीला जेवढं महत्त्व आहे, तेवढं पुण्यात वधु-वरांनाही नसतं!

बाकी, अखंड लग्नात वधुवरांना कोण मोजतं म्हणा! पुरेशा नोटा मोजून 'इकडे बघा' असं खेकसणा-या जन्माने पुण्याच्या फ़ोटोग्राफ़रला तेवढा त्या उभयतांमधे भलताच 'इंटरेष्ट' असतो. अल्बमकरता त्या द्वयांना व्यायामाचे जे धडे तो देत असतो, ते त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या आप्तेष्टांच्या करमणुकीचा विषय ठरतात. एकदा पाठीला पाठ लावून एकमेकांच्या हातात हात घातलेल्या नवदाम्पत्याला फ़ोटो काढून झाल्यावर सोडवायला तिघांना बरेच प्रयत्न करावे लागल्याच्या उदाहरणाचा मी स्वत: साक्षिदार राहिलो आहे.

बरं… लग्नात केवळ फ़ोटोग्राफरच आक्रमक असतात असंही नाही. लग्न 'लावण्याची' मुख्य जबाबदारी ही गुरुजींची असते. शाळेत 'स्कोरिंग' साठी घेतलेली संस्कृत आणि लग्नात श्लोकपठण करणा-या गुरुजींची संस्कृत यात तेवढाच फरक आहे, जेवढा तो लग्नात मुलाकडच्यांनी केलेल्या मागण्या आणि मुलीकडच्यांनी त्या पुरवण्यामध्ये असतो.

या मागण्या खरंच गूढ असतात! 'आम्हाला काही नको' असं म्हणणारी मंडळी 'बरं झालं, आपण मंगळसुत्राबरोबर पाटल्याही केल्या; नाही तर ही अगदीच रिकाम्या हाती उभी राहिली असती' असं खुसपुसतात. 'मुलाला व्यसनं नसावीत' अशी अपेक्षा ठेवणा-या वधुपित्यांना कित्येकदा आपली कार्टी तिच्या ऑफिसच्या पार्टीमधे आचमनं करते, याची जाण नसते. अशा गोष्टींची ठोस अथवा अर्धवट माहिती असलेल्या आप्त-नातलगांना लग्नविधींच्या वेळी आपापसात किस्से सांगण्यात वेळ घालवता येतो.

लग्नविधी हे तर कित्येकांच्या वादाचाच मुद्दा असतात. मंगलाष्टकांनंतर अक्षता टाकल्या म्हणजे 'लग्नं लागलं' अशी उपस्थितांची समजूत असते. गुरुजी मात्र 'कन्यादाना'लाच 'लग्न' म्हणतात. सप्तपदी आणि फेरे हे करवल्यांनी नटखट हसत उगीचच एकमेकींना टाळ्या देण्यासाठी ठेवलेल्या पद्धती असाव्यात. वराने लग्नाच्या दिवशी वधूला सूर्य का दाखवायचा असतो आणि त्यानिमित्ताने प्रत्यक्षात ती दोघं आपापसात काय बोलतात, हे संशोधनाचे विषय ठरू शकतात. कित्येक विधींमधे फोटोग्राफर गुरुजींनाच मंत्र म्हणण्यापासून ब्रेक देतो. सूनमुखाच्या वेळी त्या आरशाचा कोन असा काही धरावा लागतो की ती वरमाय, गालातल्या गालात खुश होणारा तो वर आणि आरशात पहावं की पाण्यात, अशा गुंतागुंतीत अडकलेली ती सौभाग्यकांक्षिणी हे कोणाकोणाची नजर चुकवत असतात, कोण जाणे!

हे सगळे विधी उरकतात, अक्षतारुपी आशीर्वाद दिले जातात आणि मग सुरु होते, ती धावपळ! ही धावपळ म्हणजे खरोखर धावापाळच असते. प्रत्येकजण वधुवरांना भेटण्याच्या रांगेत जास्तीत जास्त पुढे पोहोचण्याचा आटापिटा करतो. त्यात अपयशी ठरणारे बरेच जण मग रांगेत पुढचा नंबर मिळवलेल्यांमधे आपल्या ओळखीचा मासा गळाला लावायचा प्रयत्न करतात. यातले काही जण अर्ध्या दिवसात लग्न आटोपून पुन्हा ऑफिसमध्ये हजेरी लावणार असतात; तर काही जण पुन्हा आतल्या गोटातल्या चर्चा पुढे सुरु ठेवणार असतात. बाकीचे सर्व जण मात्र वधुवरांना आशीर्वाद देण्याची औपचारिकता पूर्ण करून आपल्या जिभेचे चोचले पुरवायला जेवणात काय काय असेल, या विचारानेच आपली भूक वाढवत असतात.

तर अशी ही रांग आशीर्वाद देत आणि फ़ोटो काढून घेत जेवणाच्या पंगतीत परिवर्तीत होते. आणि मग निरोप घेऊन आपापल्या संसारात रुजूही होते. वधुवरांची पंगतही मग उखाणे घेत आणि घास भरवत पार पडते. पुढे लक्ष्मीपूजनानंतर विरहाश्रू अनावर  होतात. 'उद्या फोन करीनच' असं म्हणत मुलीची आई आपले डोळे पुसत, आपला मेकअप बिघडला तर नाही ना, याची हळूच खात्री करून घेते. मुलीचे वडील 'कार्टी सासरी काय दिवे लावते', या चिंतेने तिला घट्ट बिलगतात. वरमाय आजपासून आपली सुट्टी झाल्याचा आनंद स्तब्ध चेहे-याआड लपवून ठेवते. मुलाचे वडील 'दिवटं मार्गी लागलं', या समाधानात आपल्या सारखाच आता तोही संसारी झाल्याचे आविर्भाव व्यक्त करतात. स्वत: वधू परंपरेप्रमाणे रडत असते आणि आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय, याची कल्पना नसलेला नवरदेव आतल्या आत फुटत असलेले लाडू गिळून आपल्या विवाहीतेला धीर देत असतो.

हो! म्हणजे त्या भोळ्याला आपल्या भविष्याची जराही जाणीव नसते. युगानुयुगं चर्चा होऊनही कित्येकांना न सुटलेल्या या 'लग्न' नामक कोड्यात तो कसा  गुरफ़टणार, याचा अंदाजही त्याला आलेला नसतो. आणि आत्तापर्यंत आजूबाजूला होत असलेल्या चर्चा संपून आपण न संपणा-या संभाषणात भाग घेत आहोत; सुरु होण्यापूर्वीच वादात आपण यापुढे कायम शाब्दिक माघार घेणार आहोत, या वास्तवापासून तो अजूनही काही इंच दूर असतो. अर्थात, 'संसार' नामक एका अपरिचित आयुष्यात तावून-सुलाखून निघण्यासाठी तो जणू उडीच घेत असतो…


17 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. Ek number Shekhar... Thoroughly enjoyed reading... Kaay lihitos rao... - Shweta M

    ReplyDelete
  3. Nice Minute and Mejor Observations.....

    ReplyDelete
  4. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  5. Quite nice observation &easy &simple language to understand.very true

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot for appreciation. But unfortunately, I could not recognize you.

      Delete
  6. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  7. एकंदरितच लग्न चर्चा आणि लग्न सोहळा यात घडणारा घटनाक्रम आणि साधारण पणे असलेला सामाजिक दृष्टिकोन चांगला मांडला आहे. आणि लिखाण नक्कीच एखाद्या पुणेकरच्या हातचच असावं याच धाटणितल आहे यात शंका नाही. शेवटचे दोन परिच्छेद सोडले तर एकंदरित अनुभव छान होता. शेवटच्या दोन परिच्छेदांमधे हिरमोड झाल्याशिवाय राहत नाही. कदाचित विषयावर थोडा सामाजिक प्रकाशझोत अपेक्षित होता.
    सर्वसाधारणतः मुलगी सासरी जाणं हां मार्मिक विषय, पण तो प्रकार आणि त्यात गुंतलेली कौटुम्बिक निरानिराळ्या स्तरावरची मानसिक उलाढाल ही पुन्हा मिश्किल पण खोचक पणेच (परत पक्क्या पुणेकराला शोभेल) अशीच मांडली आहे आणि 'भोळा' या कल्पने मागचा एकांगी विचारही.
    असो, मुळातच लग्न ही संकल्पना त्या so called "भोळ्या"ला कितपत आत्मसात आहे हाही एक गहन आणि न सुटणारा प्रश्नच आहे म्हणा, अर्थात so called "भोळी"ही याला अपवाद नाहीच.
    बाकी वाचनाचा अनुभव छान होता.
    पुढील लिख़ाणाकरता शुभेच्छा.

    - प्राची खैरनार.

    ReplyDelete
    Replies
    1. Khallaas aahe mi Prachi.
      Vaachak ase asaavet. Sameekshaa hi poorak aani tichi maandani hi yogya.

      Would continue to write only to seek your comments. Really appreciate. Thank you.

      Delete
  8. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  9. Masta. Majja ali vachayla. Continue writing.

    ReplyDelete