Wednesday, October 20, 2010

टकलावर (न) रुळणारी शेंडी...

भारतीय शिक्षणव्यवस्था ही जगातल्या आर्थिक महासत्तांपेक्षा किंचित सक्षम मानली जाते. खरंतर, ही सक्षमता ब-यापैकी परीक्षापद्धती आणि अभ्यासक्रमावर अवलंबून असते. अव्वाच्या सव्वा अभ्यासक्रम आणि पाठांतराभिमुख परीक्षापद्धती ही भारतीय शिक्षणव्यवस्थेची दोन मूलभूत अंग आहेत. काहीही असो... या शिक्षणव्यवस्थेतून (देशा) बाहेर पडणारे विद्यार्थी तद्देशीय विद्यार्थ्यांपेक्षा वरचढ ठरतात खरे!

तर अशा या व्यवस्थेला कायम सक्षम ठेवण्यासाठी दर ठराविक वर्षांनी अभ्यासक्रम बदलण्यात येतो. ही नक्कीच एक प्रभावी उपाययोजना आहे. हे बदल सामान्यात: जागतिकीकरणावर अवलंबून असतात. पण विचार करा, जागतिकीकरणाचा 'इतिहासा'सारख्या विषयावर कोणता परिणाम होत असेल! जे घडून गेलं, तो इतिहास...

पण नुकताच शालेय अभ्यासक्रमातला 'इतिहास बदलला' गेला... अगदी शब्दश:! छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांना इतिहासातून 'वगळण्यात' आलं. ज्या समर्थ रामदासांनी महाराजांना 'जाणता राजा' म्हणून उल्लेखलं, त्या समर्थांनी महाराजांना शिकवण दिल्याचं आपल्या वर्तमान 'इतिहासा'नं नाकारलं.

वस्तुत: 'इतिहासा'त बदल घडवले जातातही; पण ते पुराव्यांच्या आधारे! पूरक पुरावे उपलब्ध होईपर्यंत आपण हा इतिहास नाकारणं सयुक्तिक होणार नाही. उलट, आपल्याकडे इतिहासातले हे बदल जातींच्या आधारावर घडवले जाऊ लागले आहेत. दादोजी आणि समर्थ हे जातीने ब्राह्मण असल्यामुळे त्यांचा 'मराठा-सम्राट' शिवाजी महाराजांशी संबंध तोडण्यात आला. अरबी समुद्रामध्ये उभारल्या जात असलेल्या महाराजांच्या भव्य पुतळ्यापासून त्यांच्या या दैवतांची चित्रे दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

वस्तुत: ही उदाहरणे ब्राह्मण समाजाबद्दल असलेल्या तिरस्काराचं प्रतिनिधित्व करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या तिरस्काराचं मूळही इतिहासातच आहे. ब्राह्मणांनी वर्षानुवर्षे आपल्या बुद्धिमत्तेचा अवास्तव बडेजाव करत अन्य जातीतील लोकांना हीनदर्जाची वागणूक दिली. त्याचा वचपा आज काढला जातोय!

बरं! हा वचपा काढणारेही आजच्याच पिढीतले आहेत; आणि सहन करणारेही आजच्याच पिढीतले! म्हणजे, आजचा ब्राह्मण खालच्या जातीतील त्याच्या मित्राला घरात प्रवेश नाकारतही नाही; किंवा तो मित्रही ब्राह्मणाबरोबर जेवताना कोणतीही अवघडलेली मन:स्थिती अनुभवत नाही. मग बदला कसला? कोणी घ्यायचा? आणि का?

'ब्रह्म' जाणतो तो 'ब्राह्मण'! थोडक्यात, कोणताही ज्ञानी पुरुष हा 'ब्राह्मण' म्हणवला जाऊ शकतो. म्हणजेच, ब्राह्मण्य हे वारसा हक्कानेच मिळतं, असं नाही; तर तो इच्छा-शक्तीचा आणि प्रयत्नांचा भाग आहे. गळ्यात जानवं, डोक्यावर शेंडी, सकाळ-संध्याकाळी गायत्री मंत्राचा जप, ओठांवर संस्कृत सुभाषितांचा निवास, आहारामध्ये शुद्ध शाकाहारी घटक हीच जर ब्राह्मण्याची ओळख असेल; तर ही जातच आज अस्तित्वात नाही.

आणि, आडनावांमुळे ब्राह्मण झालेल्यांवर आज अन्याय आणि अत्याचार होणार असतील, तर समस्त ब्राह्मणसमाजाला त्याचं कसलंही सोयर-सूतक नाही. मुळात, ब्राह्मण हा आक्रमक नाहीच! त्याची ताकद त्याच्या मनगटात नसून, मेंदू हाच त्याचा एकमेव बळकट स्नायू आहे. ब्राह्मण मार खाईल, रडेल; पण तो कुणावरही हात उगारणार नाही. संमेलनात अथवा सभेत दोषारोपण करण्याची हुक्की आलीच, तर तो अन्य ब्राह्मणांनाच शब्दांचा मार देईल. कारण, आक्रमण आणि प्रतिकार असले शब्द त्याच्या हृदयाला भिडतच नाहीत.

गांधीहत्येनंतर ब्रह्मणांचीही कत्तल झालीच की; पण म्हणून त्याने कधी शस्त्र उचलले नाही; किंवा प्रतिकार केला नाही. अर्थात, पराक्रमी पेशव्यांचा अपवाद आपल्याला इथे वगळावा लागेल. त्यांनी शस्त्र उचलली खरी; पण पराक्रम गाजवला तो परकीय शत्रुंच्या विरोधात! पुढे, शालेय अभ्यासक्रमात असो अथवा सरकारी नोकरीमध्ये असो, कधी राखीव जागांची मागणी ब्राह्मणाने केली नाही. तो मूग गिळून गप्प राहिला. आजही तो गप्पच आहे आणि उद्याही तो गप्पच राहील.

आठ्याणव टक्के गुण मिळवूनही माझ्या मुलाला मनाजोगत्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, याचं दु:ख करून घेतो, तो ब्राह्मण; पण जेमतेम उत्तीर्ण होऊनही हवा तिथे प्रवेश मिळवणा-या त्याच्या मित्राबद्दल त्याला असूया कधी वाटतच नाही. राखीव जागांच्या मुद्द्यांवरून पेटलेला देश पाहताना घरात लपून हळहळ व्यक्त करतो, तो ब्राह्मण; पण सरतेशेवटी त्याच्याच वाटच्या जागा आणखी कमी झाल्यावरही तो खचून जात नाही.

सदसद्विवेकाला पटलं, म्हणून ब्राह्मणाने शाकाहाराची बंधनं झुगारून दिली. लौकिकार्थाने काहीच महत्त्व न राहिल्यामुळे गळ्यातून जानवंही काढून ठेवलं. शेंडी हा तर कदाचित त्याच्याही विनोदाचाच भाग असेल. हा सर्व त्याग करूनही ब्राह्मणाने काहीच गमावलं नाही. पाणी नाका-तोंडाशी आल्यामुळे उद्या तो देशही सोडेल! सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ब्राह्मण्य म्हणजे ज्ञान... ज्ञान ही एक उर्जा आहे... आणि उर्जा म्हटलं की तिचा अंत अशक्य आहे. अर्थात ती रूप बदलते... ब्राह्मण देश बदलेल!

खरंतर हे सर्व विचार अशा प्रकारे मांडताना कुठलाही आनंद मला होत नाही; किंवा कसलीही प्रौढी गाजवण्याचा माझा उद्देश नाही. पण हे विचार एकांगी नसून त्यांवर विचार आवश्यक आहे; म्हणून ते मांडण्याचा हा अट्टाहास! अन्यथा 'भारत' हा लवकरच एका जबरदस्त उर्जेला गमावून बसेल आणि अन्य देशांत स्थाईक झालेले ब्राह्मण आपल्या मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास रंगवून रंगवून सांगतील... अत्यंत 'पवित्र' हेतूने!!!

8 comments:

 1. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 2. या ठिकाणी ‘शिवाजीचे गुरू कोण?’ या प्रश्नाच्या संदर्भात शहाजी विरुद्ध दादोजी कोंडदेव किंवा जिजाबाई विरुद्ध दादोजी कोंडदेव असा वाद घालणे व्यर्थ होय. शिक्षक या नात्याचे स्थान वेगळे आहे. दादोजी कोंडदेव यांच्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील योगदानाचा "अनुल्लेख" योग्य होणार नाही.
  Here I don't mean that just because he was a "brahmin" they omitted his name,but I really think that he was teacher to "Chatrapati" and nobody can take that credit away from him,no matter who he was,Brahman or anybody..
  I dont know when this country will come out of the cast system?? WHEN????

  ReplyDelete
 3. @ Shweta, as I had said before, India will throw away caste system, when the admission form for a Jr. KG student does not ask his/her caste!

  @ Vandana, Yes!!!

  ReplyDelete
 4. छान झाला आहे लेख. जातीव्यवस्तेवर जितके बोलू तितके कमीच. कारण भारतात तो एक राजकारणी विषय आहे. तो संपला तर राजकारणच संपेल.
  जेव्हा आपल्या समाजात जातीवरून reservations करण्यात आले तेव्हा ते कालांतराने कमी कमी व्हायला हवे होते. पण त्याच्या अगदी उलट होत चालले आहे. ते दिवसेन दिवस वाढतच चालले आहे.
  ह्यावर उपाय सध्या तरी काहीच दिसत नाहीये. कदाचित लोकांनीच जात लावणे सोडले तर थोडाफार फरक पडेल.

  ReplyDelete
 5. लेख नक्कीच एकांगी नाहीये .. ब्राह्मण्य केवळ जन्माने येत नाही.. तर ज्ञानाने येत हा मुद्दा खूप महत्वाचा आणि पुनः पुन्हा सांगावा असा आहे ..
  पण ब्राह्मण खचून जात नाही वगैरे मुद्दे थोडे पटत नाहीयेत.. आज बाव्व्हांशी ब्राह्मण एकत्र आले.. आणि शाळा , कॉलेज च्या वयातील मुले असतील .. तर "आपला जानव आड येत ना... ","शेंडी च दिसते अजून .." या अर्थी संवाद सर्रास ऐकू येतात..
  त्यावेळी तू लिहिलेली परिस्थिती खरच असावी असा वाटता.. म्हणजे.. आहे त्या reservations मुळे खचून न जाणारा ब्राह्मण वर्ग तयार होण्याची आवश्यकता आहे...

  ReplyDelete
 6. अगदी बरोबर गिरीजा...
  ब्राह्मणांना ही जाणीव नक्कीच बोचते.
  पण हे बोलून ब्राह्मण नुसतेच हताश होत नाहीत. तर उपलब्ध परिस्थितीतून पूरक पर्याय शोधून काढतात. हताशपणा मनाला चाटून जातो; कृतींमध्ये दिसून येतो; पण परिणामांमध्ये बदलत नाही.
  असो... सकारात्मक दृष्टीकोणातून लेख वाचल्याबद्दल आभार.

  ReplyDelete