Monday, November 1, 2010

पुन्हा एकदा!!!

ऑक्टोबर महिन्याची अखेर...
बुधवारचा दिवस... आणि मध्यान्हीचा सुमार...
रेंगाळलेल्या पावसाळ्यामुळे सगळीकडे हिरवळ होती खरी; पण उन्हाची तीव्रता त्या मखमलीलाही धुमसत होती. गारव्याऐवजी रखरखाटच अधिक होता. इतक्यात पश्चिमेकडनं घोंघावणारी एक वा-याची झुळूक आली. अशा रुक्ष वातावरणाला वा-याची ती झुळूक सुखावणारी असली; तरी तिचं ते घोंघावणं जरा उद्विग्नता वाढवणारं होतं.

पद्मावतीभोवती दोन प्रदक्षिणा घालूनही ही झुळूक काही शमत नव्हती. मधेच हुक्की आल्यावर ती सुवेळेच्या अंगाला लगट करत थोडी दूर जायची... आणि पुन्हा आल्या वाटेने परत फिरून बालेकिल्ल्याला फेर धरायची. तिचं असं बागडणं जरी अगदीच नवीन नसलं, तरी ते घोंघावणं जरा त्रासदायक वाटत होतं. वैतागून एक-दोनदा राजगडाने आळोखे-पिळोखे देत तिला फटकारून पाहिलं; पण त्या फटका-याने ती शेजारीच पसरलेल्या तोरण्याच्या बुधल्याला पिंगा घालून पुन्हा 'डोक्यात'(!) शिरायची.


ही काही आपल्याला स्वस्थ पडू देणार नाही, हे लक्षात आल्यावर राजगड तिच्यावर गुरकावलाच. पुरंदरापल्ल्याड माळरानावर जाऊन गोंधळ घालण्याची सूचना करूनही ती ऐकतच नाही म्हटल्यावर मात्र तो हात-पाय ताणून ताठ झाला. वा-याची गचांडी धरून दूर पूर्वेकडे भिरकावून देण्याचे क्रूर विचार त्याच्या मनात आले खरे; पण परगण्यात राजगडाचा दरारा होता. त्यामुळे सूचना किंवा फारफारतर धमकीवर त्याचं काम चालून जाई. हातघाईवर येण्याची वेळ उभ्या आयुष्यात राजगडावर कधी आलीच नाही!

डोक्याखाली हाताची उलटी घडी करून पडलेला तोरणाही वा-याची ही मस्ती बराच वेळ पाहत होता. राहून राहून त्यालाही या गोष्टीचं कुतूहल वाटतच होतं, की या राकट राजगडासमोर क्षुद्र वा-याची कसली ही मिजास! भल्या-भल्यांना चळाचळा कापायला लावणारा हा राजगड... त्यानं मनात आणलं, तर या वा-याला आजूबाजूला हुंदडणंही मुश्कील होईल. राजांचा लाडका म्हटल्यावर कोण त्याला डिवचण्याची हिंमत दाखवणार!!!

इतक्यात तो वारा संजीवनी माचीच्या वरच्या अंगानं सरळ बालेकिल्ल्य्यात शिरला आणि आतल्या आत विरूनही गेला. नाहीसं होण्यापूर्वी तो राजगडाच्या कानात काहीतरी कुजबुजला असावा; कारण त्यानंतर तो करारी गिरीदुर्ग असा काही आंतरमुख झाला, की काही क्षण झाडांनी सळसळाट थांबवला; पक्ष्यांनी किलबिलाट बंद केला; आसपासचे दोन-तीन ढग सूर्यासमोर येऊन विसावले; सावजाला शोधणा-या तिथल्या एका ससाण्यानेही परिस्थिती लक्षात घेऊन दक्षिणेकडे मोर्चा वळवला.

एवढ्यात, भानावर येत राजगडाने तोरण्याला साद घातली... 'आपला रायगड पुन्हा एकदा ढासळलाय रे! सतत रडतोय म्हणे!' आता मात्र तोरण्यालाही कळून चुकलं. घोंघावणा-या वा-याच्या मनातलं गूज त्या ताठ, स्वाभिमानी, निश्चल, निर्विकार आणि शक्तिशाली रायगडाची व्यथा सांगून गेलं होतं. खरं पाहता, या उत्तुंग जोडगोळीसाठी हे ही धक्कादायक नव्हतं. रायगड सध्या वरचेवर अश्रू ढाळतो, याची माहिती आणि त्यामागची कारणं त्यांना वारंवार मिळत असत.

आधल्याच दिवशी कुणी उत्साही सहयमित्र रायगडावर मुक्कामासाठी गेला होता म्हणे. सवयीप्रमाणे सूर्योदयाला दरबारात हजर राहून त्याने महाराजांना लवून मुजरा केला. पुढे बराच वेळ तो महाराजांच्या त्या मूर्तीकडे एकटक पाहत होता; कसलंतरी गा-हाणं मांडत होता; विनवण्या करत होता... "महाराज, तुम्ही परत या. परत या, महाराज. या ख-या अर्थाने 'दगडांच्या' देशाला पुन्हा एकदा तुमची गरज आहे. दासबोधातली वचनं विसरलेल्या या संतभूमीला एका कणखर नेतृत्वाची ओढ लागली आहे. पैशापायी या पुण्यभूमीचं इमान विकायला निघालेल्या नतद्रष्ट नेत्यांना वेसण घालायला परत या, महाराज. अहो, संरक्षणदलाच्या अखात्यारीतून सहकारी गृहसंस्थेतील घरं आपल्याच नातेवाईकांना भेट म्हणून देणारा भ्रष्टाचारी दुसरा-तिसरा कुणी नसून तुमच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे......". त्याला पुढं बोलवेना. तसा... त्याच्या शब्दांचा महाराजांवर कसलाही परिणाम होतंच नव्हता. कारण त्या मूर्तीमध्ये महाराज होतेच कुठे? समोर होती ती फक्त प्राणहीन मूर्ती! पण हे शब्द खुद्द रायगडाचं काळीज फाडत खोलवर रुतत गेले. त्याला राहवेना आणि त्याने अक्षरश: हंबरडा फोडला...

सहाजिक आहे हो! गेल्या काही वर्षात 'आप्त-स्वकीय' म्हणवून घेणा-या किंवा 'शिवप्रेमी' म्हणवणा-या स्वजनांनीच अशी काही वर्तणूक केली होती, की तीन शतकांहूनही अधिक काळ ताठ मानेनं उभ्या असलेल्या त्या किल्लेशानंही अखेर धीर सोडला होता. इतिहासात, महाराजांच्या पश्चात फितुरीनं झालेल्या हल्ल्याला त्या स्वाभिमानी रायगडानं असा काही प्रतिकार केला होता, की पराभवानंतरही बारा दिवस जळत होता तो; स्वराज्य तेवत होता तो! पण आज होत असलेली जनतेची ससेहोरपळ त्याला हिणवते आहे; राज्यकर्त्यांनी चालवलेला अतोनात भ्रष्टाचार त्याला रक्तबंबाळ करतो आहे; एकेकाळी सबंध चराचरसृष्टीची निष्ठा अनुभवणा-या त्याला वर्तमानातला नाकर्तेपणा आणि बेइमान दु:खी करतो आहे.

आणि या सगळ्यावर ताण म्हणून की काय, पण शिवराय सध्या रायगडावर वावरातच नाहीत! वावरतो, तो त्यांच्या मनातला सल... स्वराज्याची गाणी त्या दरबारात घुमतच नाहीत! घुमतात, ती फक्त दयनीय जनतेची गा-हाणी... सूर्याची सोनेरी किरणं त्या अजिंक्य सिंहासनावर नतमस्तक होतंच नाहीत! पाया पडतात, ती काही दुर्बल टाळकी...

आणि हे सगळं असंच्या असं माहीत असूनही, तिकडे तोरण्याने आपली बेलागता त्यागलेली नाही किंवा राजगडाने आपली अभेद्यता सोडलेली नाही. त्यांची निष्ठा कायम आहे! वेळ काढून गिर्यारोहणाला येणा-या असंख्य सहयप्रेमीना ते शिवचरित्र ऐकवतात; भूतकाळातले ते रोमांचकारी क्षण रंगवून रंगवून सांगतात; स्वराज्याची गळ घालतात; जिद्द-चिकाटीची शिकवण देतात.... त्यांना अजूनही आशा वाटते... रायगडाला पुन्हा एकदा जाग येईल... रायगडाला... पुन्हा एकदा जाग येईल...

2 comments:

  1. Ekkk Number...Boss...maja ali vachun...keep writing :) Will post something new frm my side soon

    ReplyDelete
  2. Thank you Amit.
    I have started following your blog now. :-)

    ReplyDelete