Sunday, August 22, 2010

बाबा

"अरे... कशाला हवंय दर वेळी 'ए.सी.' चं तिकीट?"
बाबांचा हा प्रश्न मला काही रुचला नाही... अगदी नेहमीसारखाच!
वयाची सत्तावीस वर्ष नोकरीसाठी नेमाने डोंबिवली - सायन - डोंबिवली प्रवास केलेले माझे बाबा निवृत्तीनंतरही सतत कार्यमग्न असतात. माझ्याजवळ पुण्यात राहून ते शिकवण्या घेत असले, तरी पंधरा दिवसांतून एकदा मुंबईची चक्कर झाल्याशिवाय त्यांना राहवत नाही. हा प्रवास (त्यातल्या त्यात!) सुखकर व्हावा, म्हणून मी त्यांना 'ए.सी.' चं तिकीट काढून देतो. पुढे ते पाहिल्यावर होणारी आमची चर्चा (खरंतर वाद!) ही आईसाठी नेहमीचीच झालेली आहे. 'तीन तासांचा नेहमीचा प्रवास इतका खर्चिक कशाला करायचा?' हा बाबांचा प्रश्न आणि त्यानंतर फिरणारं माझं डोकं, हे एक समीकरणच होऊन बसलंय...

खरंतर, हा आणि असे इतर बरेच प्रश्न हे बाबांच्या विचारांचं आणि प्रवृत्तीचं सुतोवाच करत असतात. आणि माझे बाबा (कदाचित!) जगातल्या तमाम 'बाबा' समाजाचं (!) प्रतिनिधित्त्व करत असतात.

विचार करा... कायम खस्ता खाऊन पैनपै वाचवून आमच्यासाठी आयुष्य जगलेल्या बाबांना निवृत्तीनंतरही स्वत:च्या सुखासीन आयुष्याचे वेध लागू नयेत का? स्वार्थ - मोह - लोभ ही बहुदा सामान्य व्यक्तिमत्त्वाला लागणारी कीड आहे; पण त्यातल्या असामान्य नात्याला लागणारी नव्हे!

दसरा-दिवाळी आली म्हणून न जाणे कोणकोणत्या प्रकारे पैसे साठवून नवीन कपडे घेऊन देणारे बाबा, फक्त शेकड्यात असली, तरी त्याकाळच्या पगाराला जड वाटणारी आमची शाळेची फी हसतहसत भरणारे बाबा, 'मी अभ्यास करावा' म्हणून 'निकालानंतर सायकल घेऊन देईन' असं वाचन देणारे बाबा, ठरल्यापेक्षा चार गुण कमी मिळाले, तरी ती घेऊन देणारे बाबा, आम्हाला काही कमी पडू नये, म्हणून शाळेशिवाय घरच्या घरी मुलांच्या शिकवण्या घेणारे बाबा, 'ब्याट' म्हटलं की ती घेऊन देणारे, 'ट्रीप' म्हटलं की 'जा' म्हणणारे आणि काही न मागता सुद्धा ब-याचदा काही ना काही घेऊन देणारे बाबा... आज स्वत:च्या आरामदायी प्रवासापेक्षा मला होणा-या खर्चाची जास्त काळजी करतात.

मला खात्री आहे, थोड्या फार फरकाने सगळे 'बाबा' असंच वागत असणार. मातृत्वाला जशी भावनिक गुंतागुंतीची झालर असते, तशी पितृत्वाला ती कर्तव्याची असावी... पण अव्यक्त!
'अव्यक्त' अशासाठी की ती कर्तव्यपूर्ती निरपेक्षपणे सुरू असते. कुणाकडेही कसलीही वाच्यता न करता...!
मुलाला आईशी जोडणा-या नाळेच आणखी एक टोक देव आपल्याला दिसू देत नाही. 'स्वामी तिन्ही जगांचा...' म्हणत आईला देवघरात नेऊन ठेवणारे कवीही वडिलांकडे थोडं दूर्लक्षच करतात. कामावरून उशीरा घरी आल्यावर उशाशी बसून डोक्यावर हात फिरवणारे बाबा आपल्यालाही ब-याचदा उमजत नाहीतच की!

आपल्याला आयुष्यात करावी लागलेली धडपड आपल्या मुलाला किंवा मुलीला करावी लागू नये म्हणून झटणारे आणि तरीही आपल्याला न लाभलेलं सुखासीन आयुष्य त्याला लाभावं, यासाठी प्रार्थना करणारे बाबा हे कोणत्याही दैवतापेक्षा नक्कीच सरस ठरतात.

मला गंमत तर या गोष्टीची वाटते की, ज्या आपल्या मुलासाठी बाबा एवढे श्रम करत असतात, त्याच्या प्रगतीचे आनंददायक क्षण त्यांना प्रत्यक्ष क्वचितच अनुभवता येत असतात. त्याने उच्चारलेला पहिला शब्द, टाकलेलं पाहिलं पाऊल, मिळवलेलं पाहिलं यश, त्याच्या शाळेचा पहिला दिवस या सगळ्याचं कौतुक बाबांनाही असतंच की! पण कामावरून घरी आल्यावर आईच्या डोळ्यांतून ते पाहत असताना दिवसभराचे श्रम विसरणार नातं म्हणजे 'बाबा'!

मुलीसाठी घोडा होणारे बाबा ती लग्नघरी निघाल्यावर हळवे होत नसतील कशावरून? निघताना 'आधी आईच्या पाया पड' म्हणत पटकन डोळे टिपताना त्यांनाही विरह जाणवत असेलच ना!
... पुरूष असल्याची जाणीव म्हणा, पितृत्वाची भूमिका म्हणा किंवा आपोआप घडून आलेला कर्तव्यदक्ष, करारी आणि जबाबदार पालक म्हणा... वरवर कधीकधी निष्ठूर वाटणारा 'बाबा' किती पोलादी आयुष्य जगत असतो...!

नात्याने घडवून आणलेला स्वभाव असेल किंवा आयुष्यभराची लागलेली सवय असेल, 'बाबा' बाहेरून पोलादीच राहणार. आपल्यालाच त्या आतल्या हळव्या झ-याची जाणीव करून घेतली पाहिजे. त्यांना खर्चिक वाटेल...; विनाकारण वाटेल...; पण आपणच त्यांना त्या सुखासीन आयुष्याची ओळख करून दिली पाहिजे. आपण लहानपणी केलेले हट्ट त्यांनी पुरवले. मग आता ते करत नसलेले हट्ट आपण पुरवून त्यांना आनंद का बरं नाही द्यायचा?

'पोरानं अमेरिका फिरवून आणलं आम्हाला', असं जगाला भरभरून सांगणारे माझे बाबा, मी अमेरिकेला निघालो होतो, तेव्हा म्हणाले होते, "जर्मनीला जायचं स्वप्न पाहिलं होतं एके काळी. तू अमेरिकेला जाऊन पूर्ण करतोयस हो रे!" ...
त्यांना मी नुसताच वाकून नमस्कार केला होता तेव्हा...; पण मनाशी मात्र पक्कं केलं होतं, 'बाबा जर्मनीला जाणं, हा आपला हट्ट आहे आता.'
... अर्थात, प्रत्येक विमानाला 'ए.सी.' हा असतोच! त्यामुळे तेव्हा वाद होणार नाही, याची मात्र मला पक्की खात्री आहे...

- शेखर श. धूपकर
(Shekhar S Dhupkar)

14 comments:

  1. खुपच सुंदर आणि भावस्पर्शी,हळुवार लिहीले आहेस बघ...जास्त काहीच लिहीत नाही..कारण प्रत्येक ओळ्न ओळ वाचताना पापण्या ओलावल्या...[ः(]

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लिहिले आहे... मनाला स्पर्शून गेले!

    ReplyDelete
  3. apratim likhan re baba tuze... wachun man bharun aala..
    asech mastt lihit raha :)

    ReplyDelete
  4. apratim!!..hats off to you shekharda!

    ReplyDelete
  5. Khup cha Sunder lihla aahes....asach chan lihat ja aane share karat ja.

    Once again...tula kasa kay suchata re....really hats off.

    ReplyDelete
  6. dolyan paani aanalas re shekhar tu...
    asa watatay, aatta phone karun babanshi bolaw aani tu jeje lihil aahe,te te mhanaav tyanna...

    ReplyDelete
  7. Thank you all.
    I, myself, must have read this article several times. These are expressions from each of us. I have bundled them into words.

    keep reading...
    More to come! :-)

    ReplyDelete
  8. you have really bundled everyone's feelings into words...nice words!!

    ReplyDelete
  9. वाह! पूर्ण लहानपण डोळ्यासमोर तरळून गेलं !

    "स्वार्थ - मोह - लोभ ही बहुदा सामान्य व्यक्तिमत्त्वाला लागणारी कीड आहे; पण त्यातल्या असामान्य नात्याला लागणारी नव्हे!"
    यासाठी आता काय म्हणू !! मस्त! अप्रतिम!!

    ReplyDelete
  10. फारच सुन्दर लिहिता तुम्ही. भावना आणि त्यांना मापक शब्दात मांडणारं तुमचं शब्द सामर्थ्य वाखाणण्याजोगं आहे

    ReplyDelete
  11. फारच सुन्दर लिहिता तुम्ही. भावना आणि त्यांना मापक शब्दात मांडणारं तुमचं शब्द सामर्थ्य वाखाणण्याजोगं आहे

    ReplyDelete