Thursday, December 10, 2009

आटपाटनगराची गोष्ट

सूचना: सदर कथेतील घटना तथा घटनाक्रम निव्वळ काल्पनिक असून त्यांचा वस्तुस्थितीशी काडीचाही संबंध नाही... आणि तो लावण्याचा प्रयत्नही केला जाऊ नये.

नेहमीसारखाच आजही सकाळी वेळेवर उठलो. का कुणास ठाऊक, पण कंपनीच्या बसने जाण्याऐवजी आज स्वत:च्या गाडीने हाफिसात जाण्याची हुक्की मला आली. मग, 'फॉर अ चेंज' म्हणत मी गाड़ी काढली आणि निघालो. वास्तविक माझं घर आणि ऑफिस यांच्यामधे संपूर्ण पुणं वसलेलं आहे. थोडक्यात, पिम्परीतल माझं घर पुण्याच्या पश्चिमेला, तर हडपसरला असलेलं ऑफिस पुण्याच्या पूर्वेला आहे. आता, पुण्यामधे गाडी चालवणं, हे चंद्रावर पाथफ़ाइंडर चालवण्यापेक्षा अवघड आहे, असं मत पुण्यातून चंद्रावर न गेलेला आणि 'पाथफ़ाइंडर' हे नेमकं कसलं 'मॉडल' आहे, हे माहिती नसलेला प्रत्येकजण मांडू शकतो. परंतू, गाडी चालवणं ही आवडीची बाब असल्यामुळे मी अशा मतांचा फारसा पुरस्कर्ता नाही आणि 'पुण्याचा' असल्यामुळे इतरांची मतं मी फारशी ग्राह्याही धरत नाही.

... असो! तर मी राहत्या वसाहतीतून गाडी हमरस्त्यावर आणली आणि काहीतरी चुकत असल्याची जाणीव मला झाली. काय? ... ते कळेना! मी गाडी तशीच पुढे चालवत राहिलो आणि नाशिकफाट्याच्या मुख्य चौकात सिग्नलला येऊन थांबलो.

या वेळेपर्यंत मी फारच बेचैन झालो होतो. काही सुचेनासं झालं होतं... आणि अचानक मला साक्षात्कार झाला की घरून निघाल्यापासून मी एकही होर्न ऐकला नव्हता. पण हे कसं शक्य झालं? म्हणजे... रस्त्यावरचं आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असलेली सोय म्हणजेच 'होर्न'! ... आणि तो कोणीच वाजवू नये??? मी उगीच माझ्या गाडीचा होर्न वाजवून पाहिला. आजुबाजुच्या चार-पाच वाहनचालकांनी दचकून 'असा काय हा!!!' अशा आविर्भावात माझ्याकडे दृष्टीक्षेप टाकला. त्यांच्याकडे पाहताना मला असं आढळलं की सगळी वाहनं अगदी शिस्तीत, एका रांगेत आणि सुरक्षित अंतर ठेऊन उभी आहेत. रांगेतली पहिली वाहनं रस्त्यावर आखलेल्या पांढ-या पट्ट्यांच्या अगोदर थांबली आहेत. वस्तुत: माझी गाडी त्या पांढ-या रेषेपासून बरीच पुढे उभी होती. अगदीच स्पष्ट सांगायचं, तर गाडी थांबवण्याची मला इच्छाही नव्हती. परंतू चौकात वाहतूक पोलीस उभा असल्याचं लक्षात आल्यावर गाडी थांबवल्यामुळे मी चौकाच्या पुरेसा मधोमध पोहोचलो होतो.


इतक्या वेळात एकाही भिका-याने किंवा त्याच्या पोराने मला तो कालपासून उपाशी असल्याची माहिती पुरवली नव्हती. एका रात्रीत असा काय बरं बदल घडला असावा? ... याच विवंचनेत असताना चौकातील वाहतूक-पोलीस माझ्या दिशेने येताना मला दिसला. मी पटकन पाकिटात लायसंस असल्याची खात्री करून घेतली. तो नसता, तरी त्याच पाकिटातली पन्नासाची नोट लायसंसऐवजी उपयोगी पडते, या प्रमेयाची सिद्धता सर्वज्ञात आहेच! त्यातून मी सिग्नलचा मान राखून गाडी थांबवली होती. मग याची चाल चुकली कशी?

"आपण आपली गाडी कृपा करून त्या रेषेपाठी उभी करण्याची तसदी घ्याल का?"... असलं काहीतरी बोलला तो... आणि मला एक स्मितहास्यही करून दाखवलं. मी त्याला 'सिग्नल सुटतोच आहे!' हे गिरवलेलं उत्तर दिलं. यावर "तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का रे ए... (फुल्या-फुल्या-फुल्या)" असं वरच्या पट्टीतलं अनावश्यक न बोलता त्याने मला पुन्हा एकदा गाडी मागे नेण्याची नम्र विनंती केली.

मला गहिवरून यायचंच शिल्लक राहिलं होतं. मी गाडी मागे घेताच इतर वाहनाचालाकान्नी मला चक्क धन्यवाद दिले!!! ... आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली होती. माझा अस्वस्थपणा शिगेला पोहोचला होता. जोरजोरात होर्न वाजवण्यासाठी माझा हात शिवशिवत होता. वाहतूक पोलिसाला पाहून सिग्नल पाळल्याचा मला मनोमन पश्चात्ताप होत होता.

सिग्नलला थांबल्यापासूनच्या काही क्षणांमधे घडलेल्या या घटना मन सुन्न करणा-या होत्या. इतक्या वेळात मला या ही गोष्टीची जाणीव झाली होती की, रस्त्यांवर, कोणाही अनोळखी व्यक्तीला आणखी काही अनोळखी व्यक्तींनी विनाकारण दिलेल्या शुभेच्छांचे फलक नव्हते; कमीत कमी कपडे घालून कपाळावरच्या टिकलीची जाहिरात करणा-या अथवा तत्सम अभिनेत्रींची छायाचित्रे नव्हती; भर रस्त्यात गाडी लावून स्वत: चार पेग 'लावायला' गेलेल्या बेजबाबदार चालकाचे उदाहरण नव्हते किंवा वाहनांना अडथळा करणारे चारचौघांमध्ये सुरु असलेले भांडण नव्हते.

... आता मात्र मला दरदरून घाम फुटला होता. हा बदल कसा झाला, यापेक्षा तो झालाच का?... या प्रश्नाने मी अस्वस्थ झालो होतो. इतक्यात माझ्याच गाडीवर मागच्या बाजूने दुसरी गाडी आदळल्याचा आवाज झाला आणि पाठोपाठ "अबे ए...! अंधा है क्या? सिग्नल दिख नाही रहा है क्या?" सोबत माझ्या आई-वडिलांचा उद्धार कर्णकर्कश होर्न्समधून ऐकायला मिळाला आणि मी भानावर आलो.

इतर प्रगत देशांसारखीच सुबक व्यवस्था आपल्याकडेही असावी, अशी नम्र इच्छा बाळगणारा मी काही क्षण त्या भावाविश्वालाच वस्तुस्थिती समजून बसलो होतो. पण त्या आदर्शवादाला जोरदार दणका बसून मी आता वास्तवात परतलो होतो. एक सुस्कारा सोडून मी गाडी सुरू केली आणि 'फोर अ चेंज' वाहतुकीचे सर्व नियम पाळत ऑफिसला पोहोचलो...

- शेखर श. धूपकर
( Shekhar S Dhupkar )

1 comment:

  1. Apratim shabd mandani.. Wachakach nikhal manoranjan...
    Asach lihit raha..

    ReplyDelete