Thursday, December 10, 2009

अबोल बोबडे बोल...

पार्श्वभूमी...

श्वेताचा चिमुकला 'शिव' तीन वर्षांचा झाला आणि त्याच्या शाळेचा पहिला दिवस उगवला. उगवतीबरोबरच हा दिवस श्वेताच्या घरात नाविन्य घेऊन आला. आपल्या चिमुरड्याच्या उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी म्हणून शिवचे आई-बाबाच अतिशय अस्वस्थ झाले होते... कसा असेल पहिला दिवस? रमेल का शिव शाळेत? रडणार तर नाही ना तो? ... या आणि अशा प्रश्नांनी डोक्यात गर्दीच केली होती जणू...

त्याचवेळी उत्सवमूर्ती शिव मात्र एका वेगळ्याच भावविश्वात रमला होता. 'शाळा' म्हणजे नक्की काय? ... हे ठाऊक नसलेला तो आपण शाळेत काय-काय करणार, हे आई-वडिलांना सांगत होता; स्वत:च्याच मनाशी चित्र रेखाटत होता.

सुंदर जीवनाच्या या पहिल्या दिवसासाठी शिवला पूर्णपणे तयार करणा-या श्वेताचं मन मात्र चिंतातूर होत होतं. झटपट निघून गेलेली तीन बर्ष आणि येऊ घातलेल्या प्रकाशमय कालखंडामधेच ती उभी होती त्याक्षणी जणू काही! अशाच मन:स्थितीमध्ये तिघेही शाळेत पोहोचले...

आपल्याच वयाच्या इतर चिमुरड्यांना बघून शिवचा उत्साह आणखीनच वाढला. तो सहज त्या सगळ्यांमध्ये मिसळला. आपली गोष्ट कुणाला ऐकवू लागला; तर इतर कुणाच्या गोष्टी स्वत: ऐकू लागला. आजूबाजूला मांडलेल्या खेळांमध्ये तो सहज रमायला लागला...

आपला हात सहज सोडून धावत गेलेल्या आपल्या चिमुरड्याचं भावविश्व अस्तित्वात येत असल्याचं पाहणा-या त्याच्या आईचं मन मात्र हळवं होत होतं. त्याला आपल्यापासून काहीकाळ दूर ठेवावं लागणार, ही कल्पनाही तिला असह्य होत होती. त्याच्या वर्गशिक्षिका, आपण घेतो तशी, त्याची काळजी घेऊ शकतील का, या प्रश्नाचं पूरक उत्तर काही केल्या श्वेताला मिळत नव्हतं. एक वेगळा अनुभव घेणा-या आपल्या लेकाचा आनंदी चेहरा त्या आईला सुखावत होताच; पण नविन विश्वात धुंद रमलेल्या पोटच्या गोळ्याला असलेली आपली गरज कमी झाली की काय? या वेड्या विचाराने तिची घालमेलही होत होती...

दिवसभर आपल्या आजूबाजूला हुंदडणा-या तिच्या पोराशिवायचे घरातले चार तास श्वेताला चार दिवसांप्रमाणे गेले. पण, त्याला शाळेत घ्यायला गेल्यावरचं चित्र मात्र काहीसं वेगळंच होतं. डोळ्यांसमोर नसलेल्या आईच्या आठवणीने शिव रडत होता. कधी एकदा घरी जाईन, असं त्याला होत होतं. आई दिसताच धावत येऊन तो तिला घट्ट बिलगला. कदाचित 'कुठे होतीस इतका वेळ?' असंच काहीसं त्याला म्हणायचं असावं!

... खरंतर अतिशय स्वाभाविक असा हा घटनाक्रम... वर्षानुवर्ष हे असंच चित्र जगातल्या सगळ्या शाळा पाहत असतील. पण त्या चिमुरड्यासाठी आणि त्याच्या आईसाठी मात्र हा एक वेगळाच अनुभव होता. या नाजूक आठवणी श्वेताने आपल्या "http://shweta963.blogspot.com/" या ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या. पण शिवचं काय? त्याने कसं व्यक्त व्हावं? आपल्या भावना आपल्या हळव्या आईसमोर त्याने कशा शब्दबद्ध कराव्यात?

... श्वेताचा ब्लॉग वाचल्यावर मला पडलेले हे प्रश्न! आणि म्हणूनच मी श्वेताला खालील पत्र लिहिलं... शिवच्या वयाचा असताना मी कदाचित माझ्या हळव्या आईला लिहू शकलो असतं, असं पत्र...

=========================================================

श्वेता,

तुझा ब्लॉग वाचला... अगदी पुन्हा-पुन्हा वाचला. उत्कट भावना जेव्हा शब्दरूप धारण करतात, तेव्हा त्या अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात. तुझं लिखाण असंच काहीसं आहे. त्यामुळेच ते फार सहजपणे वाचकाच्या हृदयाचा ठाव घेतं. शब्दरूप विचार, वाचताना, पुन्हा एकदा भावनांचा ओलावा व्यक्त करतात आणि अशा वेळी अशा भाऊक विचारांना मिळणारी प्रतिक्रिया तितकीच उत्कट असते; नाही का? ... माझं हे पत्रही तसंच काहीसं आहे...

खरंतर कितीही 'भावना पोहोचल्या' असं म्हटलं, तरी एक 'आई' म्हणून तुझी मन:स्थिती पूर्णपणे समजून घेणं, कदाचित माझ्यासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. पण कदाचित शिवचं तीन वर्षांचं वयही त्याच्या सगळ्या भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी परिपक्व नाही. त्यामुळे, तुझा हात सहजपणे सोडून त्याने त्याच्या विश्वामध्ये दंग व्हावं, याचा अर्थ त्याला असलेली तुझी गरज कमी होणं, असा लावला जाउ नये.

जर संपूर्ण घटनाक्रम नीट विचारात घेतला, तर शिवने तुझा हात सहज सोडला खरा; तो धावत जाऊन त्याच्या नव्या मित्रांमधे मिसळलाही खरा! पुढे त्यांच्याशी खेळण्यात त्यांचं रमणंही स्वाभाविकच आहे. पण त्याचं हे वागणं 'आपली आई आपल्या सोबतच आहे', या वैचारिक दिलाशावर आधारलेलं होतं. ज्यावेळी त्याच्या त्या आधाराला हादरा बसला आणि 'आपली आई कुठे दिसत नाही' याची जाणीव त्याला झाली, तेव्हा तोच शिव त्या सगळ्यांमध्ये एकटा पडला. माझ्या मते, तू त्याला घ्यायला गेल्यावर त्याने तुला मारलेली घट्ट मिठी त्याच्या रडण्यापेक्षाही अधिक बोलकी होती.

शिवचं रडणं किंवा मिठी मारणं, हे त्याला शब्दांमध्ये बांधता न आलेल्या भावनांचं व्याक्तरूप होतं.

खरंतर त्याला असलेली तुझी गरज कधीच संपणारी नाही. किंवा त्याच्या काळजीने त्याला कायम तुझ्या डोळ्यांसमोर ठेवणं, ही बिलकुल व्यवहार्य गोष्ट नाही.

शिवला आयुष्यात पुष्कळ प्रगती करायची आहे; उंच आकाशात स्वच्छंदी भरा-या घ्यायच्या आहेत. तूच जर त्याचे पंख होत राहिलीस, तर तो स्वत: कधी उडणार? शिवाय, तुझ्या सोबत नसण्याने त्याला असलेली तुझी गरज कधीच कमी होणार नाही; तर ती वाढेल. आणि त्याची ही गरज तू त्याचे पंख होऊन भागवण्यापेक्षा त्याच्या पंखांचं बळ होऊन भागवावीस. त्याने स्वबळावर घेतलेल्या प्रत्येक भरारीने तू सुखावशीलच, याची मला खात्री आहे.

खरंतर, हे सगळं तुला समजवावं, इतकं आयुष्य मी तरी कुठे पाहिलंय गं? पण तुझ्यातली आई जशी तुझ्यातून व्यक्त झाली, तसाच माझ्यातला अशाच एका हळव्या आईचा मुलगा व्यक्त होतोय... कदाचित! तुझं लिखाण मला त्या वयात घेऊन गेलं, जे वय मला आठवतही नाही. पण शिवची प्रत्येक कृती ही माझ्या 'त्या' वयातल्या वागण्याची प्रतिकृती असेल असं वाटतं आणि माझी आई ही तेव्हा तुझ्यासारखीच हळवी झाली असेल, याची खात्री आहे...

तुझा लेख वाचताना 'आठवत नसलेल्या' आठवणींनी माझ्या मनाचा (आणि डोळ्यांचाही!) ताबा घेतला होता. तू जवळ नसताना शिवचंही असंच काहीसं झालं असेल... नाही का?

मला गंमत वाटते, ती वयनिहाय परस्परविरोधी परिणामांची... शिवला शब्दांतून व्यक्त होणं जमत नसेलही; पण तो रडून मोकळा होऊ शकला. आणि, मला आज शब्दांतून व्यक्त होणं पुरेसं जमतं खरं; पण शिवसारखं रडता मात्र येत नाही... मोकळं होता येत नाही! 'ते' वय म्हणजे खरोखरच एक जमेची बाजू आहे बघ...

हळव्या आईचा अव्यक्त मुलगा,
शेखर
(Shekhar S Dhupkar)

No comments:

Post a Comment