Wednesday, May 27, 2026

                                                               विसरलेला आनंद

                                                                                                                               - शेखर धूपकर

आज एका मित्राची Instagram वरची गोष्ट... म्हणजे story(!) पाहिली. लोकलमध्ये त्याला बसायला जागा मिळाली, याचा इतका आनंद झाला होता पठ्ठ्याला! गेली चौदा वर्ष सलग डोंबिवली लोकलमध्ये, तिथूनच स्वतःला कोंबून विद्याविहारपर्यंतचा प्रवास हा मनुष्य करत आलाय. एका पायावर कसाबसा तोल सांभाळत पाऊण तास काढणाऱ्या या संत माणसाला 'बसायला मिळालं' हा आनंद सहनच होत नव्हता. खरंच, किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानतो नाही आपण!


त्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महाग... किंवा दुर्मिळ व्हायला लागल्या आहेत, म्हणून असेल असं कदाचित! गगनचुंबी इमारतीच्या बाविसाव्या मजल्यावरून ज्या दिवशी आजूबाजूचे भव्य प्रासाद स्वच्छ दिसतात, त्या दिवशी कमी प्रदूषण - AQI च्या आधारे सुख देऊन जातं. एखाद दिवशी रात्री सव्वानऊ वाजता कामावरून घरी येत असताना खालच्या मजल्यावरच्या काकू जेव्हा, "अरे! आज लवकर?" असं विचारतात, तेव्हा गालातल्या गालात हसू येतंच की! त्या दिवशी झोप लागण्यापूर्वी आपला बाबा घरी पोहोचला, म्हणून घरभर फिरत नाचणाऱ्या आपल्या मुलीच्या आनंदाला 'छोटा' म्हणणं मात्र अवघड वाटतं.


आनंद इतका दुर्मिळ झालाय का? की तो आपणच शोधू शकत नाही आहोत? हा एक प्रश्न आहे. दरवर्षी येणारा फेब्रुवारी महिना अठ्ठावीसच दिवसांचा असल्यामुळे, महिनाअखेरीला होणारी पैशांची जुळवाजवळ दोन दिवस कमी करावी लागेल, याचा आनंद? आठ किलोमीटर अंतराला आज फक्त पंचवीसच मिनिटं लागली, याचा आनंद? पावसापूर्वीचे काही दिवस सूर्यास्त नाही, तरी संध्याकाळच्या आकाशातल्या रंगीत छटा बघायला मिळाल्याचा आनंद... बायकोबरोबर घरीच निवांत कॉफी प्यायला वेळ मिळाल्याचा आनंद... आईच्या हातची बटाट्याची भाजी खायला मिळाल्याचा आनंद... पंपावर पेट्रोल भरायला रांग नसल्याचा आनंद... एकाच सिग्नलला दुसऱ्यांदा थांबावं लागलं नाही, याचा आनंद... दुर्गभ्रमंती करतानाचे महाविद्यालयाच्या काळातले घरातलेच फोटो पुन्हा काढून बघितल्याचा आनंद... आयला! हा आनंद खूपच महाग होत चाललाय, हे मात्र निश्चित!


की आपणच सहज हसायला, निवांत बसायला, घरचं खायला, फिरायला जायला, दुपारचं झोपायला, पुस्तक वाचायला, दूरदर्शनवर आवडती मालिका बघायला,... आणि स्वतःला वेळ द्यायला विसरलो आहोत? इतकं अवघड असावं का हे सगळं? जबाबदाऱ्या, भविष्य, पैसा हे सगळं आवश्यक आहेच; पण त्यांच्या मागे धावताना आजूबाजूचं बघायला आणि अनुभवायलाच विसरलो आहोत आपण. आनंद दुर्मिळ झाला नाहीये तर आपण वेळेचं भान विसरलो आहोत.


एखाद दिवशी निवांत उठावं, कामावर अचानक रजा टाकावी, मुलीलाही शाळेत पाठवू नये, बायकोला आणि तिला घेऊन एखादा चित्रपट बघायला जावं, त्यानंतर रस्त्यावरची पाणीपुरी खावी... फुकटची मसाला पुरी हक्काने मागून घ्यावी, तिथून चौपाटीवर जावं, निवांत बसावं, मावळतीच्या दिनकराला अनुभवावं, परत येताना तिथलीच पावभाजी हाणावी, पोरीला एखादा फुगा आणि बायकोला गजरा घेऊन द्यावा,  आई-बाबांसाठी आईस्क्रीम बांधून आणावं... आणि 'उद्या हे सगळं आठवत धावायचं आहेच', असं स्वतःला सांगत गाढ झोपी जावं. शेवटी सुख की काय म्हणतात, ते यापेक्षा वेगळं थोडंच असणारे!!!


- शेखर धूपकर