Sunday, June 28, 2015

कोई लौटा दे मेरे…

                                                                                                                   - शेखर श. धूपकर

परवा संध्याकाळी… नव्हे रात्रीच, एका निनावी क्रमांकावरून मला फोन आला. "काय अण्णा? ओळखलंस का?" … "अण्णा"… कित्येक वर्षांनी ही हाक माझ्या कानावर पडली होती. आठवणींची पानं निदान बारा-एक वर्षांनी मागं चाळली  गेली. पण "ओळख… ओळख…" म्हणणारा तो इतका आपुलकीचा आवाज कसलाच संदर्भ देत नव्हता.

"अरे, मी आदित्य… आदित्य बर्वे". मी स्तब्ध झालो. इतक्या आठवणी आणि इतक्या घटना डोळ्यांसमोरून झरझर सरकल्या! बर्व्याशी निवांत गप्पा झाल्या. त्या गप्पांनी मधल्या एका तपाचा आणि हातून निसटून चाललेल्या आत्ताच्या क्षणाचा विसर पाडला होता. 'अड्ड्यावर भेटू' म्हणत पुन्हा आम्ही वर्तमानात आलो. फोन संपला होता; पण मन कुठेतरी त्या कालयंत्रात अडकून परतायचं विसरलं होतं.

त्या रात्री निजल्यावरही फक्त आदित्य, आमचं संभाषण, ते दिवस… हे सगळंच डोक्यात सुरु राहिलं आणि मध्यरात्र उलटून गेल्यावर, खूप उशीरा कधीतरी, न झोपलेला मी खडबडून जागा झालो. मला आलेली ही जाग झोपमोड करणारी नव्हती; तर माझे डोळे सताड उघडणारी होती. आपण बारा वर्षांपूर्वी जगात असलेल्या आणि सध्या जगत असलेल्या परस्पर विरोधी आयुष्यातली तफावत दाखवून देणारी जाग होती ती!

'किती सुंदर दिवस होते नाही ते!', असं आपल्याला कायमच वाटतं आणि पुढेही वाटत राहील; पण 'आपण आपल्यालाच तर विसरत चाललो नाहीत ना?' असा जाब विचारणारी जाग मला त्या रात्री आली. मी पूर्णपणे निरुत्तर होतो; आणि माझी तशी अवस्था मला हतबल करत चालली होती.

खरंच किती सुंदर दिवस होते ते! आम्ही सगळे मित्र नुकतेच वेगवेगळ्या कंपन्यांमधे रुजू झालो होतो. मोबाईलची क्रांती तेव्हा व्हायची होती; पण म्हणून आम्हाला संपर्कात रहाण्याची कोणतीच अडचण तेव्हा येत नसे. सोमवार ते शुक्रवार नवं काम, नवं जग आणि नव्या स्पर्धेला आपलंसं करता-करताही शनिवार-रविवारचे बेत ठरत. हे बेत कुठल्या ना कुठल्या किल्ल्यावर ट्रेक करण्याचेच असत!

ट्रेक्सही कसे… तर, महामंडळाच्या लाल डब्याला तेव्हा आर्थिकदृष्ट्या पर्याय नव्हता; आणि तसा शोधण्याची गरजही आम्हाला वाटत नसे. पायथ्याच्या गावी पोहोचल्यावर गावातल्या फोनवरून घरी निरोप दिला जायचा आणि मगच चढाईला सुरुवात व्हायची. ट्रेक्स म्हणजे सर्व बंधनांतून मुक्तता असे. जुनी-नवी पण गुणगुणण्या जोगी मराठी-हिंदी गाणी,त्यापूर्वी केल्या गेलेल्या ट्रेक्सच्या गप्पा, किल्ल्यातल्या पडक्या मंदिरात किंवा वाड्यात स्वयंपाक आणि मुक्कामाच्या सोयी, उपलब्ध असल्यास नैसर्गिक तळ्यात मनसोक्त विहार… खरंच किती स्वच्छंदी दिवस होते ते…!

ज्या शनिवार-रविवारी ट्रेक्स नसत, तेव्हा एखाद्याच्या घरी जमून गाण्यांच्या मैफिली, गप्पांचे अड्डे, पत्त्यांचे डाव रंगत. आजच्या सारख्या हॉटेलमधल्या ओल्या-सुक्या पार्ट्यांची ऐपत आणि पद्धत त्यावेळी श्रमपरिहार किंवा मित्रांच्या कट्ट्याला पर्याय झाले नव्हते; पण त्या भेटींमधे अतोनात समाधान असे.

बारा वर्षांपूर्वी जसे मित्र होते, तसेच नातेवाईकही असत. काका-मामा-आत्या-मावशी ही लोकंही कुटुंबाचा आणि आयुष्याचा एक अविभाज्य भाग असत. मुद्दाम आमच्यासाठी मेजवान्यांचे बेत आखले जात. मग तशी कुटुंब एकत्र येऊन हास्य-विनोद करत भरपेट होत. चुलत-मामे-आत्ते-मावस भावंडं तेव्हा एकमेकांच्या घरी असत. सुट्ट्यांंमधे धुडगूस चाले. लग्न-मुंजींचे प्रसंग त्यांच्या ओळखी करून घेण्याची निमित्त्य तेव्हा झाले नव्हते.

बारा वर्षात आयुष्य एवढं बदलावं? आई-बाबांबरोबर सुट्टीच्या दिवशी एखादं नाटक किंवा 'आयुष्यावर बोलू काही' इतकं अवघड होत नसे. इतकंच कशाला? रात्रीची जेवणंही एकत्र होत. वाढदिवस हे स्वत: बाहेर जाण्याऐवजी आप्त-स्वकीय घरी जमून साजरे होत. अशा प्रसंगी पिझ्झा-पाश्त्या ऐवजी आईच्या हातची गरम गरम पुरणपोळी सुखद वाटे. तसे त्याकाळी कालनिर्णयवरचे सगळेच सण साजरे होत. आनंदाच्या चौकटी सर्वव्यापी होत्या.

दूरदर्शन प्रामुखाने सातच्या बातम्या आणि फावल्या वेळात मनोरंजनाचं पूरक समाधान होता. सतराशे साठ वाहिन्यांवरून चालणाऱ्या डेली सोप्स तेव्हा दैनंदिनीची गरज होऊन बसल्या नव्हत्या. प्रत्येकाने डोकं खुपसून बसायला मोबाईल नव्हते; पण त्यामुळे भावनिक धागे घट्ट विणलेलेल होते.

पहिला पाऊस 'भिजून' अनुभवला जायचा; गप्पांच्या भेटी अडीच रुपयाच्या कटिंगवर भागत; पुण्यातली पर्वती आणि मुंबईची दादर-चौपाटी ही लहानग्यां सोबत संध्याकाळ घालवण्यासाठी पर्वणी असत. मैदान, त्यावर क्रिकेट आणि दोन डावांच्या मध्ये बर्फाचा गोळा तेव्हा इतिहासजमा झालं नव्हतं. चालत-फ़िरणं, रस्त्यात भेटलेल्यांची विचारपूस करणं असं सगळं आजच्या इतकं दुर्मिळ झालं नव्हतं. प्रत्येकाला काही ना काही छंदं आणि ते जोपासायला वेळ उपलब्ध होता.

बाप रे! बारा वर्षांच्या या तपश्चर्येने माझ्याकडून काय काय हिरावून घेतलंय? बरं; त्या बदल्यात या तपाने काय दिलं? तर कदाचित फक्त ताप, चिडचिड, धावपळ! मित्र, कुटूंब, नातलग, छंद, वेळ हे सगळं पैशाने कसंबरं 'रिप्लेस' होईल? बर; हा वाढलेला पैसा तरी सुख-समाधान मिळवून देतोय का? मला सांगा, दिवाळीच्या फ़राळाची ताटं व्हॉटसेपच्या 'फॉरवर्ड्स'नी कशी बरं शुभेच्छा देतील? आजी-आजोबांचे आशीर्वाद आणि हातावर ठेवलेली शंभराची नोट तोंडाला फासल्या जाणाऱ्यां केकसमोर कसे बरं फिके वाटतील?

परवा झालेली झोपमोड मला स्वत:ची ओळख करून देऊन गेली. उशीरा का होईना, पण त्या रात्री मी गाढ झोपलो. बदल आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जातात खरे; पण पैसा आणि धावत्या जगात होणारी रखड हातून गेलेले जगायचे क्षण पुन्हा परत मिळवून देत नाहीत; … ते विकतही घेता येत नाहीत.

त्याच रात्री मी  ठरवलं… पुन्हा चार पावलं मागं जायचं. आयुष्यातली दोन भौतिक ध्येय कमी करायची; पण 'जगायचं'. स्वत:साठी वेळ काढायचा; छंद जोपासायचे; लेख लिहायचे; प्रसिद्ध करायचे; तुमच्या कमेंट्स मिळवायच्या; त्यांवर चर्चा करायच्या; विवाद करायचे; आणखी नवे विचार मांडायचे; पुन्हा लेख… जगायचं… पुन्हा जगायचं!