Wednesday, February 9, 2011

जगून तर पाहू...!!!

"कॉलेजची दोन वर्ष सरली... इतकं टापलंय तिला. एकदा विचारुया का सरळ!!!", हे आणि असले विचार प्रत्येक कॉलेजकुमाराच्या मनात कधी ना कधी येतातच. पुष्कळवेळा ते सत्यात उतरवण्यासाठी अतोनात धडपडही केली जाते. बऱ्याचदा ते तसे उतरतात; कित्येकदा नाही उतरत! वेगवेगळ्या वयात, समाजात, संस्कृतीत, परिस्थितीत अथवा मनस्थितीत असे बरेच मोह आपल्याला होत असतात. ...!!! 'मोह'... आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा कशाही बद्दल वाटणारं आकर्षण! काही मोह इतके मोहक असतात की, आपल्याला प्रयत्न केल्याशिवाय राहवत नाही. काही मात्र नुसतेच, दुरून डोंगर साजरे असतात. आता 'मोह' नेहमीच वाईट का? तर, कदाचित तसं नसावं. म्हणजे, मोह नक्की कसला होतो? आणि त्या मोहापायी आपण नक्की काय प्रयत्न करतो, यावर ते अवलंबून असणार.

सकाळी उठून धावपळ करून तीच नेहमीची आठ-चौदाची लोकल पकडायची; खाजवलेली पाठ नक्की आपलीच होती का आणि ती आपणच खाजवली का, हे ही समजू नये, एवढ्या गर्दीतून रोज ऑफिसपर्यंतचा प्रवास करायचा; दिवसभर मानेवर खडा ठेवून काम करायचं; बायकोनं दिलेला डबा रोज ठरलेल्या वेळी खायचा, भाजी टाकायची नाही; संध्याकाळी कितीही इच्छा नसली, तरी पुन्हा तेवढ्याच गर्दीच्या हवाली स्वत:ला करून देत घरी यायचं; अंगात त्राण उरलेले नसल्यामुळे कोणताही गोंगाट सहन होत नसूनही समोर सुरु असलेली 'डेली सोप' मुकाट गिळायची आणि अकरा-साडे अकराला स्वत:ला दिवाणावर झोकून द्यायचं.... वर्षानुवर्ष असंच करत राहिल्यावर एखाद दिवस झाला कामाच्या दिवशी घरी पडून राहण्याचा मोह, तर तो बेजबाबदारपणा ठरू शकतो का?

ऑफिसमध्ये दररोज मरमर काम करायचं; दिवसाच्या शेवटी एखादी 'थँक्यू'ची ई-मेल आणि वर्षाच्या शेवटी एखादं प्रमोशन एवढीच अपेक्षा मनात बाळगायची; दिवसभर काहीही काम न करणा-या शेजारच्या मिश्राच काम शेवटी आपणच जबाबदारी ओळखून हसत हसत करून द्यायचं; आदल्या दिवशी जास्तीची दाऊ पिऊन अचानक तब्ब्येत बिघडलेल्या त्याच्या सुट्टीमुळे आपलं, मुलीला, शाळेच्या गेदरिंगला येतो, म्हणून दिलेलं वचन अचानक मोडायचं आणि वर्षाच्या शेवटी त्याच मिश्राला प्रमोशन मिळालेलं पाहूनही त्राग्यापलीकडे आपण काहीच करायचं नाही.... कायमच्या या वैतागाला कंटाळून महिनाभर नोकरी सोडून घरच्यांबरोबर राहण्याचा मोह झालाच, तर त्याला निष्काळजीपणा म्हणावा का?

कॉलनीमधल्या छोट्या पोरांना पाहून झाला एखाद दिवस क्रिकेट खेळण्याचा मोह; सोपा बॉल येताना पाहून झाला त्याला लगावून देण्याचा मोह; त्याने आपल्याच शेजारच्यांच्या खिडक्यांचा वेध घेतलेला पाहून झाला पळून जाण्याचा मोह; तर चुकलं कुठे? एखाद दिवस हो... एखाद दिवस... फक्त! 'लोक काय म्हणतील!' या धृवपदाखाली आपण आयुष्यातले कित्येक क्षण वाया घालवत असतो. आजूबाजूचं कुणीतरी पाहील म्हणून आपण गाडीवरची पाव भाजी टाळतो; 'काय वाटेल तिला!', म्हणत लाडक्या मैत्रिणीला जेवायला घेऊन जाण्याचा विचार आपण गुंडाळून ठेवतो; संदीप खरेच्या कवितांना चारचौघांत उत्स्फूर्त दाद द्यायची म्हटलं, तर 'म्यानर्स' आडवे येतात; मनापासून आवडत असली, तरी वय आठवून 'फ्रूटी' पिणं आपल्याला पटत नाही... खरंतर हे आणि असे बरेच मोह आपल्याला वेळोवेळी होत असतात. पण आपण त्यांना बळी पडत नाही.

सिगरेटचा एखादा झुरका किंवा दारूचा एखादा पेग क्षणिक समाधान मिळवून देत असेलही; पण त्या मोहांपेक्षा कित्येक असे मोह आहेत, जे दीर्घकाळ आनंद देऊ शकतात. जसं की आईच्या कुशीत जाऊन विसावणं.... कितीही वय झालं, तरी हे सुख कमी होऊच शकत नाही. एखाद दिवस जुनी सी.डी. आणून टोम आणि जेरीची पकडापकडी पाहा. सी.डी. संपूच नये, असं वाटत राहील. आणि तसं वाटलंच ना, तर आणा आणखी एक सी. डी.! काही मोह आवरू नयेतच! एखाद दिवस उगीच फोन उचलावा, समोर दिसेल तो अनोळखी नंबर फिरवावा आणि एखाद्या 'राँग' व्यक्तीशी चावटपणा करावा.... असेल थोडी आगाऊगिरी... पण कधीतरी काय हरकत आहे? जवळची चार-पाच कुटुंब एकत्र गप्पा मारत बसलेली असताना, येते एकदम हुक्की... घालावी (आपल्याच!) बायकोकडे पाहून शीळ; मारावी लाईन इतरांदेखत... मला सांगा, कधीतरी हे असं वात्रटपणे वागायला काय हरकत आहे? बसावं एखाद्या रविवारी संध्याकाळी बाबांबरोबर पत्ते कुटत... भिकार-सावकारचे डाव कितीही वेळ रंगू शकतात.... अगदी कंटाळा येईपर्यंत.... मांडावेत ते तसे... त्यातही बेभान होता येतं. जळालं एखादं पान तर करावा आरडा-ओरडा... भांडावं बाबांशी! ... काही मोह खरंच टाळू नयेत.

पहिला मुलगा झाल्यावर नाचावसं वाटलंच जर हॉस्पिटलमध्ये... तर कशाला थांबायचं? नाचावं निवांत! भर मीटिंगमध्ये वाटला चहा बशीतून प्यावासा.... तर बिनधास्त प्यावा. स्वत:च्या गाडीतून जाण्याऐवजी वाटलं लाल डब्यानी जावंसं; शेवटच्या रांगेत बसून वाटलं खिडकीतून डोकं बाहेर काढावसं; तर सूचना वाचत बसू नये. एखाद्याचं लिखाण वाचून वाटल्या शिव्या घालाव्याश्या, तर त्या घालाव्यात! असले मोह आनंद देणारे असतात. त्यांना बगल देऊ नये!

कसं आहे ना... वेळ ही अशी गोष्ट आहे की, ती कधी थांबत नाही आणि कुणाला थांबूही देत नाही. पण आपण त्या घड्याळाच्या काट्याबरोबर धावता धावता थोडं 'जगलं'ही पाहिजे. वेळ निघून गेल्यावर, आनंद न उपभोगाल्याच दु:ख पश्चात्तापाशिवाय काहीच देत नाही. आयुष्याच्या शेवटी आपल्याच आयुष्याचा अलबम डोळ्यांखालून घालताना, असं नको वाटायला की, 'खूप काही मिळवलं खरं; पण जगायचंच राहून गेलं; मिळवलेलं उपभोगायचं राहून गेलं!'. ... पटतंय ना? ... खरं सांगा, पटतंय ना? ... अहो! मग करा की तसं मान्य... वागा की तसं... द्या बरं टाळी... :-)