Sunday, June 20, 2010

माझा पहिला विमानप्रवास...


मूल गर्भात असताना मातेनं केलेल्या विचारांचा त्या नवजात अर्भकाच्या स्वभावावर फार मोठा ठसा उमटतो, असं म्हणतात. अभिमन्यूला जन्मापूर्वीच चक्रव्यूहात शिरण्याची विद्या ज्ञात होती; अशी कथा महाभारतातही नमूद आहे. अगदी याच धरतीवर विचार करायचा, तर माझ्या आईने माझ्या जन्माच्या वेळी 'भटकंती', 'केल्याने देशाटन' असलेच कार्यक्रम पाहिले असावेत... किंवा बाबांनी रोज कामावरून घरी आल्यावर आईला आपल्या 'डोंबिवली - सायन - डोंबिवली' प्रवासाचे किस्से अगदी रंगवून रंगवून सांगितले असावेत... कारण, त्याशिवाय फिरण्याची एवढी हौस मला आणखी कुठून येणार?

पुढे, जसा मी आई-वडिलांच्या हातावेगळा झालो, तसा केलेला कोणताही प्रवास हा कधीच योग्य रस्ता किंवा रूळ सोडून केल्याचं माझ्या स्मरणात नाही. थोडक्यात, पंचविशीपर्यंतचे सर्व प्रवास हे भूमार्गानेच झाले. आणि जमीन सोडून झालेला पहिला प्रवास म्हणजे माझी 'अमेरिकास्वारी'! पण त्यामुळे अमेरिकेला निघताना अमेरिकेपेक्षा महत्त्व ज्या विमानाने तिथं जाणार, त्या विमानालाच अधिक होतं. गंमत म्हणजे, विमानतळात प्रवेश करताना मंदारने मला आवर्जून "खिडकीतून हात बाहेर काढू नकोस रे!" अशा शब्दात निरोप दिला होता.

माझ्या मते, 'खिडकी' हा प्रवासाचा अविभाज्य घटक आहे. अगदी ऑनलाईन तिकीट खरेदी करतानाही आपण खिडकीजवळच्या जागेला प्राधान्य देतो. स्वाभाविक आहे म्हणा हे अगदी...! मुंबईच्या लोकलने नित्य प्रवास करणा-यालाही 'खिडकीची सीट' म्हणजे अगदी 'आजि म्या ब्रह्मच' वाटते. त्यामुळे कधी नव्हे ती खिडकीची जागा रिकामी असतानाही ती न मिळवणारा इसम हा 'दैव देतं अन कर्म नेतं' या उक्तीचं अथवा प्रेमभंगाचं उत्तम उदाहरण असू शकतो.

तर अशा या मनुष्यस्वभावाला अपवाद नसलेला मीही खिडकीची जागा मिळावी, म्हणून मनोमन प्रार्थना करत होतो. माझा लंडनपर्यंतचा प्रवास रात्रीच्या अंधारात होणार होता; तर त्या पुढचा दिवसा-उजेडी! त्यामुळे 'भारत - जपान - भारत' अशा विमानप्रवासाचा (दांडगा) अनुभव असलेल्या मानसीने मला 'लंडन - अमेरिका' विमानात खिडकीची जागा देण्याची विनंती करण्याबद्दल सूचना केली होती. रात्रीच्या प्रवासात खिडकीचा तसा (!?) काहीच उपयोग नाही; असं मतही तिने ठामपणे मांडलं होतं. कदाचित 'देशोदेशीचा अंधार एकसारखाच दिसतो' हा त्या ठाम मातामागाचा निकष असावा.

प्रत्यक्ष, या सर्व सूचनांवर माझ्यातल्या भ्याड व्तक्तीमत्त्वाने जोरदार मात केली आणि कसलीही विनंती न करता मिळालेले पासेस मुकाट हातात घेउन मी विमानाकडे माझी वाट मोकळी केली. जेट कंपनीच्या त्या भव्य विमानात प्रवेश केल्यावर मी सर्वप्रथम माझी जागा शोधण्याच्या कामी लागलो. आणि जागांवरील क्रमांकांपेक्षा ती दाखवणा-या त्या हवाई - सुंद-यांकडेच अधिक लक्ष गेल्यामुळे माझी जागा 'चुकवून' मी आणखी पुढे गेलो. माझ्या या चुकीची जाणीव माझ्याच चेहे-यावर स्पष्टपणे वाचलेल्या त्यापैकी एका (हवाई) सुंदरीने मला माझी (योग्य) 'जागा' (!) दाखवून दिली. प्रवाशांचा पाणउताराही इतक्या हसतमुखाने केला जाऊ शकतो; याचा अनुभव मी त्या रात्री घेतला. तीन बाय तीन बाय तीन अशी बैठकव्यवस्था असलेल्या त्या विमानात मला मधोमध जागा मिळाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या खिडक्या सारख्याच अंतरावर असल्याच्या विचाराने मी आनंद (!) मानून घेत होतो.

पुढे... ठरलेल्या वेळेनुसार त्या विमानाने उड्डाण केले. लक्ष दिव्यांच्या सोनेरी प्रकाशामध्ये न्हाऊन निघालेल्या मायानगरीचं ते 'विहंगम' दर्शन तितकंच विलोभनीय होतं. उजव्या खिडकीला बसून अशाही वेळी टाय-कोटातील एका सद्गृहस्थाच्या झोपेची मला मनोमन कीव (की चीड?) आली. आठ-दहा हजार फुटांवर पोहोचल्यावर त्या हवाई-सुंद-यांची लगबग पुन्हा सुरू झाली. गंमत म्हणजे, तशी लगबग करणा-यांमध्ये काही पुरुषही होते. 'हवाई - सुंदरी' सारखा 'त्या' पुरुषांना नक्की कोणता पूरक शब्द असावा, असा एक प्रश्न मला तेवढ्यात चाटून गेला.

त्यातलाच एक जण हातातल्या चिमट्याने पांढ-या सुतारफेण्या वाटत असल्याचं माझ्या ध्यानात आलं. ते नक्की काय असावं, हे समजण्यापूर्वीच तो माझ्यासमोर स्मितहास्य करत उभा राहिला. ते (त्याच्या हातातलं) स्वीकारावं की नाकारावं, हे न कळून मी ही त्याला प्रति-स्मित केलं. पण तेवढ्याने समाधान न झालेल्या त्याने तो चिमटा माझ्या "आता मुकाट घेतूस; की... ... ..." इतक्या नजीक आणला. नाईलाजाने मग मी ही त्यातली सुतारफेणी स्वीकारली. माझ्या दोन बाजूंना दोन सत्तरी ओलांडलेले आजोबा बसले होते. त्यांची नक्कल करण्याचं मी मनाशी पक्कं केलं. परंतू, डावीकडचे आजोबा निद्रादेवीची आराधना करत होते; तर उजवीकडचे माझ्याकडे माझ्याइतक्याच 'ढ' आणि आशाळभूत चेहे-याने पाहत होते. तेवढ्यात मला पुढच्या रांगेतील एक गो-या काकू तो पांढरा पदार्थ उलगडून (स्वत:च्या) चेहे-यावर थापत असल्याचे लक्षात आले. अहो! कोमट पाण्यात बुचकळलेल्या टॉवेलच्या घड्या होत्या त्या...! ... मग, लगेच मोठ्या हुशारीने त्या गूढाची उकल मी उजव्या आजोबांना करून दिली आणि त्यांचे आशीर्वाद मिळवले.

आम्ही दोघंही त्या दिव्यातून बाहेर पडतो न पडतो, तो च आणखी एक दिव्य समोर उभे ठाकले. पण, हे दिव्य स्वत: भलतेच मोहक होते. त्यामुळे, तिने ग्लासातून नक्की काय आणले असावे, या (चावट!) प्रश्नानेच माझा घसा कोरडा पडला. पण यावेळी मात्र परिणामांचा विचार न करता त्या मोहक हातांनी (ग्लासातून) पाजलेले ते सोडा-लेमन मी गोड मानून रिचवले. त्यानंतरचा काही वेळ मात्र 'पुढे काय?' हे कोडं सोडवण्यात गेला. समोरच्या चलत-नकाशाने सध्या आपण पाकिस्तान-अफगाणिस्तान असल्या उन्मत्त राष्ट्रांवरून उडत असल्याचे निर्देष दिले. त्यामुळे, 'मुकाट झोपावे' असा एक सुज्ञ विचार माझ्या मनात डोकावून गेला. पण ही राष्ट्रे जगात कुणालाच स्वस्थ झोपू न देण्यात पटाईत असल्यामुळे मी ही 'जागते रहो' करत स्वस्थ बसून होतो.

इतक्यात, समोरच्या सीटच्या मागच्या बाजूला असलेल्या स्क्रीनवर आपण आपल्या आवडीचे मराठी-हिंदी चित्रपट पाहू शकतो, असा शोध मला लागला. नुकताच प्रदर्शित झालेला 'साडे-माडे-तीन' हा चित्रपट मी निवडला. एवढ्यात जेवणाचं ताट माझ्या समोर आलं. काबूलच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे-तीन वाजता चित्रपट पहात जेवण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग! एरवी जेवताना टी.व्ही. न लावण्याचा कायदा घरी कडकपणे पाळला जातो.

थोड्याच वेळात, त्या जेवणामुळे मला झोप येऊ लागली; आणि सुमारे चार तासांच्या आराधनेनंतर मी डोळे उघडले, तेव्हा नकाशा जर्मनीपाशी पोहोचला होता. बाहेर भयाण काळोख आणि डाव्या आजोबांची झोप यांना क्षणाचीही उसंत नव्हती. मी मात्र नियमाने उठून प्रातर्विधी - मुखप्रक्षाळण वगैरे उरकून घेतले. काही क्रिया जमिनीपासून अकरा हजार फूट उंच अवकाशात करण्यात खरंच मोठी मजा आहे, तुम्हाला सांगतो...!

माझा दिवस जरा लवकरच उजाडल्याची जाणीव चेहे-यावर जराही दिसू न देता, एका हवाई - सुंदरीने माझ्या न्याहारीची सोय केली. त्यावेळी अकरा हजार फुटांखाली रशियाची जमीन असल्याचं नकाशा दाखवू लागला होता. 'खरं-खोटं' करण्याचा प्रश्नच इथे उद्भवत नव्हता. दहा फूट दूर खिडक्यांमधून बाहेर काळोखाशिवाय काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे खालचा भूभाग रशियाचाच असावा, अशी मी स्वत:चीच समजूत काढून दिली.

काही वेळाने बाहेर तांबडं फुटू लागलं; सहप्रवाशांच्या झोपा पूर्ण होऊ लागल्या; नकाशावर लंडन 'दिल्ली अब दूर नाही' च्या आवाक्यात जाणवू लागलं. आणि खरोखरच काही वेळात त्या महाकाय यंत्राने जमिनीच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.

वस्तुत: अंधारात झालेला हा प्रवास पुरेसा मनोरंजक होता. तो अजिबात रटाळ वाटला नाही. पुढे हिथ्रो विमानतळावर चार तासांच्या विश्रांतीनंतर अमेरिकेच्या विमानात माझा प्रवेश झाला. योगायोगाने मला खिडकीची जागा मिळाली होती. त्यामुळे विमान उड्डाणाच्या वेळी लंडनची काही लोभस दृश्ये नजरेत साठवता आली. पण त्यानंतरचा प्रवास मात्र अतिशय कांटाळवाणा वाटला. सहप्रवाशांची कांती आणि खिडकीबाहेरील दृश्ये अति-उजळपणामुळे रुक्ष भासली. या रटाळपणावर मात करण्याकरता मी पु.लं. च्या 'अपूर्वाई' मध्ये मान घातली. गोठलेला अथांग अटलांटिक महासागर पार करता करता अपूर्वाईचं आणखी एक पारायण घडून आलं.

पुढे अमेरिकेच्या हद्दीत आल्यावरही पांढरा शुभ्र भूभाग आणि त्याला छेदत जाणारे लांबच लांब रस्ते दृष्टीस पडत होते. बोस्टन, न्युयोर्क, वॉशिंगटन डी. सी. असली माहितीतली नावं पार करत त्या विमानाने 'राली' च्या दिशेने मार्गक्रमण सुरी ठेवलं. पावसाळी हवामानामुळे जमिनीवर उतरण्यास आमच्या विमानाला उशीर झाला खरा; पण पुढील काही क्षणातच समृद्ध, श्रीमंत, मोहक अशा या अमेरिकेमध्ये माझं पाहिलं पाऊल पडलं...

- शेखर श. धूपकर
(Shekhar S Dhupkar)