Wednesday, May 19, 2010

लग्न-'गाठी' (आणि गुंते!)


एखाद्या विषयावर लिखाण करायचं, म्हणजे त्याआधी विचारांची बैठक हवी. सूज्ञपणे... विचारांची परिपक्वता ही अनुभवांवर अवलंबून असते. थोडक्यात काय तर, प्रवासवर्णन हे एखाद्या ठिकाणाला भेट दिल्यावर नोंदवलेल्या अनुभवांचा गोषवारा असतं; किंवा राजकीय दंगलींची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष झळ सोसल्यानंतर उत्स्फुर्तपणे मांडलेले विचार अधिक प्रभावी असतात.
आता या सगळ्याचा अर्थ असा नक्कीच नाही की, प्रत्येक लिखाण हे कोणत्या-ना-कोणत्या अनुभवांचच प्रतीक असावं. शाळेमधे शिकताना 'रेल्वेच्या फलाटाच मनोगत' स्वानुभवातून लिहिणं निव्वळ अशक्य आहे. अशावेळी येतो, तो कल्पना-विलास!
पण म्हणून, लिखाण हे फक्त अनुभवांची व्यक्तता किंवा कल्पनाविलास या दोन प्रकारांतच मोडावं का?

खरं सांगायचं तर, लिखाण हे विचारांचं व्यक्तरूप असतं. अशा विचारांना नियमांच्या चौकटीत बसवता येत नाही; तयार साच्यांतून घडवता येत नाही किंवा तो न करता स्वस्थही बसता येत नाही. माझ्या या लिखाणाचा गाभा हा मी न घेतलेल्या अनुभवांचा आहे. त्यामुळे तो परिपक्व नसेलही कदाचित, पण उत्स्फूर्त नक्कीच आहे. अगदी स्पष्टच सांगायचं, तर 'लग्न' या विषयावर माझे विचार व्यक्त करण्याची हिंमत करायचं मी ठरवलं आहे. (लग्नानंतर हिंमतही उरत नाही आणि आपण काही ठरवूही शकत नाही; असं 'अनुभवी' पुरूष सांगतात!)

'लग्न जमवणं' ही दिर्घप्रक्रीया आहे. काहीजण बालपणीच सुरू करतात, अशा अर्थाने नाही म्हणते मी! पण, अगदी 'चट मंगनी, पट बिहा' सुद्धा बऱ्याच विचारांती घडून येत असतात. आता या विचारप्रक्रियेमध्ये कोणकोण सामील असतं? ... या प्रश्नाचं उत्तर कालखंड, भूगोल, संस्कृती अशा कित्येक परिमाणांवर अवलंबून असतं.
अर्थात, प्रेमविवाहाला यातली कोणतीच परिमाणं परिणामकारक ठरताना दिसत नाहीत. मुळात, 'प्रेमविवाह' हा या लेखाचा भाग असूच शकत नाही. "त्याने तिला पाहिलं, तिने त्याला पाहिलं; त्यानंतर लगेच (?) त्या दोघांना ते एकमेकांसाठी जन्मल्याचा साक्षात्कार झाला... आणि घरचा विरोध झुगारून (किंवा मोडून काढून) त्यांनी लग्न केलं", हे सांगायला लांबलचक लेखाची गरज ती काय!!! अर्थात पहिल्या भेटीत (किंवा नजरभेटीत) ज्यांना असा साक्षात्कार होत नाही; त्यांना तो एकमेकांची आर्थिक आणि शारीरिक परिस्थिती पाहून लवकरच होतो, हे नमूद करण्याची गरज नक्कीच नाही. (त्यात, 'आर्थिक परिस्थिती' ही पुरुषात बघण्याची बाब असते; हे सूज्ञांनी समजून घ्यावे.) ... असो! थोडक्यात, प्रेमविवाहाच्या बाबतीत विचारप्रक्रियेला कमीत कमी महत्त्व असतं; कारण विचार न करता ठरलेली बहुतेक लग्न या प्रकारात मोडतात, असं माझं आपलं एक अननुभवी परंतू प्रांजळ मत आहे.

पारंपारिक विवाहपद्धतीमध्ये कित्येक विचार आणि तो करणारे गुंतलेले असतात. यामध्ये ज्याचं लग्न, त्यांना प्राथमिक भूमिका बजावायला मिळतेच असं नाही. मुळात या प्रकारच्या लग्नामध्ये बरेच जण विचार करत असतात खरे; पण त्या उमेदवारांच्या विचारांना योग्य न्याय मिळतोच, असंही नाही.
हा सूर तक्रारीचा वाटत असला, तरी जी लग्न जाती, पोटजाती, कुंडली अथवा मंगळ - अमंगळ आदी अनाकलनीय तत्त्वांवर अवलंबून असतात; त्यांना पूर्ण समर्थन करणंही, तितकंच अनाकलनीय ठरेल. वयामध्ये फारसा फरक नसावा; दोघांचं शिक्षण एकमेकांना पूरक असावं; खाण्या-पिण्याचा तथा राहणीच्या सवयी ढोबळमानाने एकसारख्या असाव्यात, या आणि अशा विचारांची खोली स्वागतार्ह असली, तरी अशा सर्व परिमाणांवर बाजी मारणारा एखादा होतकरू वर (तितक्याच!) होतकरू वधूला पूरक असेल किंवा पसंत करेलच, असं नाही.
आता, समोरून अशी नापसंती येणं, म्हणजे आपल्यात अथवा आपल्या कुलोत्पन्नात काही वावगं आहे, या विचाराने अस्वस्थ होण्याचं काहीच कारण नाही. समोरची व्यक्ती 'जीवनाचा साथीदार' म्हणून आपल्याला मंजूर असेल, तरी त्या व्यक्तीचे विचार तसे असतीलच, असं नाही. पण त्यापेक्षाही अशा एकाहून अधिक नकारांमुळे घरांमध्ये निर्माण होणारे ताणतणाव हे या महत्त्वाच्या निर्णयाला मारक ठरू शकतात.

दोन पिढ्यांपूर्वीची लग्नव्यवस्था आजएवढी गुंतागुंतीची नसेलच कदाचित... आट्यापाट्या खेळणा-या मुलांची लग्न भातुकली खेळणा-या मुलींशी ठरत म्हणे... अगदी आपल्या आधीच्या पिढीतही किती मुली उच्चशिक्षित होत्या किंवा लग्न ठरेपर्यंत भल्यामोठ्या पगारांच्या नोक-या करत होत्या? किती टक्के मुलं स्वत:चं राहतं घर, गाडी, एखादी परदेशवारी अशी स्वत:ची ओळख करून देत होती?

वरचे प्रश्न हे कोणत्याही गाढ्या अभ्यासांती विचारले गेले नसले, तरी आजच्या लग्नपद्धतीमध्ये झालेले अतोनात बदल, आधीच्या पिढ्या 'आमच्यावेळी असं नव्हतं' असं म्हणत कबूल करतील. मुळात महिना २०-२५ हजार रुपये मिळवणा-या आजच्या उच्चशिक्षित आणि पुढारलेल्या मुली आपला नवरा आपल्या एखाद पाऊल पुढे असावा, अशा विचाराच्या असतात. त्यासाठी आवश्यक असलेला वयातला फरकही ब-याचदा त्यांना मान्य नसतो.
माझे हे विचार म्हणजे एकांगी आरोप वाटत असले, तरी एकाच वयात समान शिक्षण घेऊन नोकरीला लागलेल्या दोन व्यक्तींमध्ये कितपत फरक असू शकेल?

याशिवाय सध्या मुलींच्या भावी सासू-सास-यांबद्दलही अटी असतात म्हणे! थोडक्यात काय... तर भावी साथीदाराबद्दलच्या अपेक्षा अवास्तव होत चालल्या आहेत. त्यांना पुन्हा जाती-पोटजातींच्या अटींची साथ आहेच. त्यापुढे इतक्या गाळण्यांतून यश मिळवलेले उमेदवार एकमेकांना पसंत करतीलच, असं नाही. कुणाला साथीदाराची व्यसनं मान्य नसतात; तर कुणाला राहणी... कुणाला समोरच्याच्या भूतकाळातील प्रेमभंग रुचत नाही; तर कुणाला भविष्यातील स्वप्ने...
याशिवाय दोन्ही कुटुंबांतून मान आणि अपेक्षांच्या अपेक्षा ठेवणारे असतातच. थोडक्यात काय, तर लग्नपद्धतीमध्ये अडथळेच फार दिसतात!
वरील सर्व मुद्दे हा कदाचित एकांगी दृष्टिकोण असेलही; पण विचारांना परिपक्वता ही अनुभवांतूनच येते. पण या बाबतीत मात्र अनुभवांनंतर फेरविचाराला जागा नाही.
त्यामुळे आई-वडील आणि थोरांच्या अनुभवांचा फायदा उमेदवारांना करून दिला जावा. त्याचवेळी अवास्तव आणि निरर्थक गाळण्या दूर करून डोळसपणे लग्नसंस्थेकडे बघितले जावे. शेवटी काय हो... रक्ताचं नसूनही सर्वात जवळचं नातं असतं हे... त्याच्या घडणीमध्ये अडथळ्यांपेक्षा मार्गदर्शनाची भूमिका व्यक्त व्हावी. आणि इच्छा मात्र एकच... अनुभव घेण्यापूर्वी केलेला हा एक निव्वळ कल्पनाविलास ठरू नये; तर तो वस्तुस्थितीतही उतरावा...

- शेखर श धूपकर
(Shekhar S Dhupkar)